शिवारात केवळ अस्वस्थता अन्‌ हतबलता

शिवारात केवळ अस्वस्थता अन्‌ हतबलता

सोलापूर जिल्ह्यावर यंदाही दुष्काळाचे संकट ओढावले आहे. जून महिन्यात झालेल्या पावसानंतर तब्बल अडीच महिन्यांपासून विश्रांती घेतली. गेल्या आठवड्यात पावसाने पुन्हा सुरवात केली; पण अवघ्या एकाच रात्रीत तो पुन्हा गायब झाला. आता तर रोज नुसतेच ढगाळ वातावरण असते. अधून-मधून पाऊस पडतो, पण त्यात जोर नाही. जिल्ह्यातील पारंपरिक दुष्काळी तालुके सांगोला आणि मंगळवेढ्यात यंदाही पावसाने प्रदीर्घ विश्रांती घेतल्याने पाण्यासाठी होरपळून निघत आहेत. या तालुक्‍यातील काही गावांच्या शिवारात फेरफटका मारला असता, या भागातील शेतकऱ्यांमध्ये केवळ अस्वस्थता आणि हतबलताच दिसून येते.

रब्बी हंगामाचा जिल्हा असल्याने सोलापूर जिल्ह्यात खरिपाच्या हंगामात फारशी पेरणी होत नाही. पण गेल्या काही वर्षांत खरिपाकडेही शेतकरी वळला आहे. माळशिरस, सांगोला, मंगळवेढा, माढा, बार्शी, अक्कलकोट या भागांत खरीप पिके केली जातात. विशेषतः सूर्यफूल, तूर, मूग, मटकी आणि अलीकडे सोयाबीन आणि उडदाचे क्षेत्रही वाढते आहे. जिल्ह्यात यंदा जूनच्या सुरवातीला पावसाने जोरदार हजेरी लावली. जवळपास १०० मिलिमीटरच्याही पुढे पाऊस गेला. पण त्यात सातत्य राहिले नाही. जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ४८५ मिलिमीटर आहे. त्यापैकी आतापर्यंत अडीच महिन्यांत अगदी पावसाळा संपत आला, तरी फक्त २०७ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. तर पेरणीसाठी कृषी विभागाने १ लाख ९० हजार हेक्‍टरचे उद्दिष्ट ठेवले. जवळपास त्याच्या दुपटीने पेरणी झाली आहे. यंदा कधी नव्हे ती २०० टक्के पेरणी झाली. पण पिकांची आजची स्थिती विचारात घेता, अवघ्या काही टक्‍क्‍यांवर हे क्षेत्र पोचले आहे. अशा पद्धतीने पिके काळवंडून, करपून गेली आहेत.

एकीकडे पाऊस, दुसरीकडे लाइटवाले
सूर्यकांत चव्हाण या तरुण शेतकऱ्याशी चाललेली चर्चा पाहून त्यांच्याच शेताशेजारचे संभाजी जाधव, दत्तात्रय माने, बंडू चौगुले हेही तिथे आले. संभाजी यांनी सहा एकरांपैकी २ एकर बाजरी केली आहे. बंडूची ६ एकरांपैकी तीन एकर मका, अर्धा एकर डाळींब आहे. तर दत्तात्रय माने यांनी एक एकरवर सूर्यफूल केले आहे. ते म्हणाले, ‘‘बाजरीच्या ताटांना कणसंच लागली नाहीत, लागली त्या कणसांमध्ये दाणे नाहीत. सूर्यफुलात नुसतेच फुल दिसते, आत बी मात्र नाही, मका तर पार होरपळून गेला आहे. दर वर्षी आमच्या नशिबाला हेच हाय बघा. कशाचं काय, लाइटचा तर कायमच प्राब्लेम असतो. डीपीतलं आइल पळवलं जातंय. वायरमनला सांगितलं, पण होच म्हणतोय, एकीकडं पावसानं आणि दुसरीकडे हे लाइटवाले आम्हाला हैरान करत आहेत. कसली शेती करायची साहेब अन्‌ काय?’’ असं सांगून पिकांची स्थिती सांगत होते. दर वर्षी बाजरीची सात-आठ पोती व्हायची, पण यंदा शेरभरही निघणार न्हाई, असं बंडू चौगुले म्हणाले.

प्यायला टॅंकरने पाणी
सांगोल्यानजीकच असणाऱ्या साळुंखे वस्तीवर रस्त्याच्याकडेला भारत साळुंखे यांची पाच एकर शेती आहे. यंदा त्यांनी दोन एकर मका, तीन एकर सूर्यफुल केले आहे. विहीर, बोअर आहे; पण पाणी नाही. ते म्हणाले, ‘‘गेल्या चार वरसापासनं हेच भोगतोय, सूर्यफुलाला फुलं लागलीती, पण बी कुठं हाय, नुसतंच फोकळ हाये, आवंदा २० हजारांचा खर्च केला हाय, पाव्हण्यारावळ्याकडनं उसनवारी करून भागवलंय, पण त्याचं कसं द्यायचं, याची चिंता हाय. आता शेतात प्यायला पाणी न्हाई. वस्तीवर टॅंकरने पाणी आणतोय. सगळ्यांचीच ही गत हाय, कसं व्हणार.’’

मंगळवेढ्यातही पुन्हा कोरडच!
सांगोल्याबरोबर शेजारच्या मंगळवेढ्यातही याहून फारशी वेगळी परिस्थिती नाही. मंगळवेढा-पंढरपूर रस्त्यावर अंबादास घुले यांची साडेतीन एकर शेती आहे. त्यात त्यांनी अर्धा एकर मका, एक एकर ज्वारी आणि अडीच एकर सूर्यफूल केले आहे. सूर्यफुलाची अवस्था एकदमच बिकट आहे. फुले चांगली लागली आहेत, पण त्यात बी भरलेले नाही. याबाबत त्यांच्या पत्नी सौ. वंदना घुले म्हणाल्या, ‘‘आम्ही आता कसं करायचं. सध्या प्यायलाही पाणी नाही. मध्ये पीकविमा भरायला गेलो, दिवसभर रांगंत उभं राहिलो, पण नंबरच लागला नाही. आता तर पार हातचं गेलं आहे. सरकारानं मदत द्यायला पाहिजे.’’ असे सांगून त्यांनी आपली व्यथा मांडली.

दुष्काळी मदत अद्याप नाही
गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामात सोलापूर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती होती. दुष्काळी जिल्ह्याच्या यादीत सोलापूरचे नाव मात्र घातले नव्हते, पण हिवाळी अधिवेशनात पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि जिल्ह्यातील आमदारांच्या दबावामुळे जिल्ह्याचा समावेश झाला. त्यानंतर तालुकानिहाय सर्व्हे, पाऊसमान, याचा अहवाल तयार झाला. शासनाकडे तो गेलाही, पण अद्याप ही मदत मिळालेली नाही. याविषयी सांगोल्यातील शेतकऱ्यांना विचारता, ‘‘सरकार काय नाही, फकस्त नादी लावयाचं काम करतंय, काही बी दिल, असं वाटत नाही,’’ अशी प्रतिक्रिया दिली.

उडीद, बाजरीवर नांगर
सांगोल्यापासून अवघ्या पाच-सहा किलोमीटरवरील वाढेगाव येथील सूर्यकांत चव्हाण यांची साडेतीन एकर शेती आहे. अगदी तरुण शेतकरी, दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून शेतीत ते लक्ष घालताहेत, पण एकदाही फायदा झाला नाही, असे ते आवर्जून सांगतात. दर वर्षी नुसतं राबराब राबायचं आणि हात तरीही कोरडेच. बायका, मुलं असं सगळं घर कसं चालवायचं, याची चिंता लागलीय, असे ते म्हणाले. साडेतीन एकरांमध्ये दीड एकर बाजरी, एक एकर डाळींब आणि एक एकर ज्वारी केली आहे. विहीर, बोअर आहे, पण पाणी आणि विजेचा प्रश्‍न आहे. बाजारीच्या ताटांना कणसे भरलीच नाहीत, तर डाळिंबाला तडे चालले आहेत. एक एकर घरच्यापुरती ज्वारी केली आहे, पण त्यातही दाणे भरलेले नाहीत. आता बाजरी थेट नांगरून टाकण्याचे ठरवले आहे. शेतात पिकतच नसेल, तर शेती करून काय करणार? यंदाचा खर्चही १०-२० हजारांच्या घरात गेलाय, आता केवळ दुसऱ्याकडे मोलमजुरी करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही, असे सूर्यकांत सांगतात.

पावसाअभावी आधीच आम्ही अडचणीत आलो. त्यात आता दोन दिवसांपासनं पाऊस पडतोय, पण कसला पाऊस न काय, त्याच्यात काहीच अवसान नाही. आता आला तरीबी त्याचा फायदा नाही, पुढच्या पिकाला तर कुठंचं होतंय आन काय? सरकारनं दुष्काळ जाहीर केला पाहिजे.
- दत्तात्रय माने,  वाढेगाव, ता. सांगोला, जि. सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com