कोल्हापुरात भाजीपाल्यातील तेजी कायम

राजकुमार चौगुले 
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहातही भाजीपाल्याची तेजी कायम राहिली. पंधरवड्यापासून बहुतांशी भाजीपाल्यातील तेजी या सप्ताहातही कायमच असल्याची स्थिती होती. हिरवी मिरची, गवारीचे दर सातत्याने तेजीत राहिले.

कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहातही भाजीपाल्याची तेजी कायम राहिली. पंधरवड्यापासून बहुतांशी भाजीपाल्यातील तेजी या सप्ताहातही कायमच असल्याची स्थिती होती. हिरवी मिरची, गवारीचे दर सातत्याने तेजीत राहिले.

हिरव्या मिरचीस दहा किलोस १८० ते २५० रुपये दर मिळाला. हिरव्या मिरचीची दररोज २०० ते ३०० पोती आवक झाली. गवारीची दररोज चाळीस ते पन्नास पोती आवक होती. गवारीस दहा किलोस २०० ते ५०० रुपये दर होता. भेंडीची ८० ते ९० रुपये दर होता. भेंडीस दहा किलोस १०० ते ३०० रुपये दर मिळाला. सातत्यपूर्ण पावसामुळे अनेक प्लॉट खराब झाले. ज्या वेळी पाऊस सुरू होता, त्या वेळी पावसामुळे भाजीपाल्याची काढणी ठप्प होती. यामुळे भाजीपाल्याच्या आवकेत घट झाली होती. 

गेल्या आठवड्यापासून पावसाने उघडीप दिल्याने भाजीपाल्याची आवक नियमित होईल अशी अपेक्षा होती. परंतु सातत्याने पाणी साचून अनेक भाजीपाल्यांचे प्लॉट खराब झाले. यामुळे सुरू स्थितीतच भाजीपाला खराब झाला. परिणामी, भाजीपाल्याचे प्लॉटचे प्लॉट शेतकऱ्यांना काढावे लागले. याचा विपरित परिणाम भाजीपाल्याच्या आवकेवरही झाला आहे. नियमित भाजीपाल्याच्या तुलनेत सुमारे पंचवीस टक्‍क्यांनी आवक घटल्याने दराची तेजी मोठी आहे. ज्या शेतकऱ्यांचे प्लॉट पावसाच्या तडाख्यातून वाचले आहेत, अशा शेतकऱ्यांना वाढीव दराचा लाभ होत असल्याची स्थिती आहे. बाजार समितीतून मिळालेल्या माहितीनुसार ही स्थिती आणखी पंधरा दिवस तरी कायम राहण्याची शक्‍यता आहे. जोपर्यंत शेतकरी भाजीपाल्याची नव्याने लागवड करून नवा माल येणार नाही, तोपर्यंत भाजीपाल्याचे दर तेजीतच राहण्याची शक्‍यता व्यापारी सूत्रांनी व्यक्त केली. 

फळभाज्यांबरोबर पालेभाज्यांची तेजीही कायम आहे. कोथिंबिरीची दररोज चौदा ते पंधरा हजार पेंढ्या आवक झाली. कोथिंबिरीस शेकडा १००० ते २७०० रुपये दर होता. मेथीस शेकडा साडेचार ते पाच हजार पेंढ्या आवक झाली. शेकडा ८०० ते १७०० रुपये दर मिळाला. पालक, पोकळा, शेपू या भाज्यांनाही शेकडा १००० रुपयांच्या वर सातत्याने दर मिळाला. पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाल्याने आणखी महिना तरी सर्वच पालेभाज्यांची तेजी कायम राहण्याचा अंदाज बाजार समितीतून व्यक्त  करण्यात आला. 

आठवडे बाजारही तेजीत 
घाऊक बाजारातील तेजीचा परिणाम किरकोळ बाजारावरही स्पष्ट दिसून आला. शहरासह जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजारांत भाजीपाल्याची चणचण कायम राहिली. यामुळे किरकोळ बाजारातही भाजीपाला चढ्या दरानेच विकला गेला. यामुळे अपवाद वगळता सर्वच भाजीपाल्याचे दर किलोस ६० रुपयांच्यावर होते. पालेभाज्यांची पेंढी पंधरा ते वीस रुपयांना विकली जात होती.