तंत्र बागायती  गहू लागवडीचे...

डॉ. भरत रासकर, ज्ञानदेव गाडेकर
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

वेळेवर पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात करावी. या कालावधीत पेरणी केल्यास गव्हाचे उत्पादन चांगले येते. पेरणी दोन ओळींत २२.५ सें.मी. अंतर ठेवून करावी. पेरणी ५ ते ६ सें.मी. खोल करावी. त्यामुळे उगवण चांगली होते.

बागायती गव्हासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी, भारी व खोल जमिनीची निवड करावी. मध्यम जमिनीत मातीपरीक्षणानुसार भरखते आणि रासायनिक खतांचा वापर केल्यास उत्पादन चांगले मिळते. शक्‍यतो हलक्‍या जमिनीत गहू लागवड टाळावी.

गव्हाच्या मुळ्या जमिनीत ६० ते ७५ सें.मी. खोलवर जातात. म्हणून भुसभुशीत जमिनीची निवड करावी. जमिनीची चांगली मशागत करावी. शेवटच्या कुळवणीअगोदर चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत मिसळावे. पूर्वीच्या पिकांची धसकटे व इतर काडीकचरा वेचून शेत स्वच्छ करावे.

वेळेवर पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात करावी. या कालावधीत पेरणी केल्यास गव्हाचे उत्पादन चांगले येते. बागायती गव्हाची पेरणीसुद्धा उशिरा करता येते. परंतु, वेळेवर पेरणी केलेल्या गव्हापेक्षा उत्पादन कमी येते. पेरणी १५ नोव्हेंबरनंतर उशिरा केल्यास प्रत्येक पंधरवड्यास हेक्‍टरी २.५ क्विंटल उत्पादन कमी येते.

प्रतिहेक्‍टरी १०० ते १२५ किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाणास तीन ग्रॅम थायरमची प्रक्रिया करावी. त्यानंतर १५ मिनिटांनी प्रतिदहा किलो बियाण्यास २५० ग्रॅम ॲझोटोबॅक्‍टर आणि २५० ग्रॅम पीएसबी जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी, यामुळे उत्पादनात १० ते १५ टक्के वाढ होते.

पेरणीवेळी जमिनीत पुरेशी ओल असावी. योग्य ओल नसल्यास प्रथम जमीन ओलवावी. वापसा आल्यावर जमीन कुळवावी.

पेरणी दोन ओळींत २२.५ सें.मी. अंतर ठेवून करावी. पेरणी ५ ते ६ सें.मी. खोल करावी. त्यामुळे उगवण चांगली होते. जिरायत गव्हाची पेरणी दोन ओळींत २२.५ सें.मी. अंतर ठेवून करावी.

पेरणी उभी-आडवी अशा दोन्ही बाजूने न करता एकेरी करावी, म्हणजे आंतरमशागत करणे सोईचे होते.

बियाणे झाकण्यासाठी कुळव उलटा करून चालवावा म्हणजे बी व्यवस्थित दबून झाकले जाते. जमिनीचा उतार लक्षात घेऊन गव्हासाठी २.५ ते ४ मीटर रुंद आणि ७ ते २५ मीटर लांब आकाराचे सारे पाडावेत.

खतव्यवस्थापन
बागायती पिकासाठी हेक्‍टरी १० टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत द्यावे. 
प्रतिहेक्‍टरी १२० किलो नत्र, ६० किलो स्फुरद आणि ४० किलो पालाश द्यावे. निम्मे नत्र व संपूर्ण स्फुरद आणि पालाश पेरणीच्या वेळी द्यावे. उरलेले निम्मे नत्र पेरणीनंतर तीन आठवड्यांनी खुरपणी झाल्यावर पहिल्या पाण्याच्या वेळी द्यावे. 

पाणीव्यवस्थापन
पेरणी शेत ओलवून वापसा आल्यावर करावी. पेरणीनंतर साधारणपणे दर १८ ते २१ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
मध्यम ते भारी जमिनीत पीक तयार होण्यासाठी ४ ते ५ वेळा पाणी द्यावे लागते. 

पीकवाढीच्या महत्त्वाच्या अवस्था
मुकुटमुळे फुटण्याची अवस्था - पेरणीनंतर १८ ते २१ दिवस
कांडी धरण्याची अवस्था - पेरणीनंतर ४० ते ४५ दिवस
फुलोरा आणि चीक भरण्याची अवस्था - पेरणीनंतर ६० ते ६५ दिवस
दाणे भरण्याची अवस्था - पेरणीनंतर ८० ते ८५ दिवस