लिंबासह भाजीपाला पिकांनी सुधारले अर्थकारण

लिंबासह भाजीपाला पिकांनी सुधारले अर्थकारण

अौरंगाबाद जिल्ह्यातील आंतरवली खांडी (ता. पैठण) येथील अण्णा रघुनाथ डिघुळे यांचे वय जवळपास सत्तरीचं. औरंगाबादच्या सरस्वती भुवनचे विद्यार्थी असलेल्या डिघुळे यांनी अकरावीपर्यंतचं शिक्षण घेतलं. नोकरीची संधी मिळाली नाही म्हणून ते कधी नाराज झाले नाहीत. आपली शेतीच बरी असं म्हणत त्यातच काहीतरी करायचं ठरवलं. लिंबाची कास धरत अन्य विविध पिकांची जोड त्याला दिली. पावकी...निमकी...दीडकीचं गणित लीलया करणाऱ्या अण्णांनी साधं, सरळ जगण्याचं सूत्र अवलंबिलं. चेहऱ्यावरचा आनंद कधी कमी केला नाही. सात एकर जमिनीचा विस्तार लगतच्या जामखेड, ब्राम्हणगाव व कडेठाण या तीन गावच्या शिवारात झाला आहे. फक्‍त ब्राम्हणगाव शिवारातच थोडीबहुत सिंचनाची सोय आहे. 

लिंबाची कास धरली 
साधारण १९७९- ८० च्या सुमारास लिंबाची बाग जवळपास एक एकरात घेतली. आजतागायत त्यात सातत्य आहे. एक बाग कधीतरी कमी उत्पादनक्षम होणार हे लक्षात आलं की दुसऱ्या तेवढ्याच क्षेत्रात लागवडीची तयारी ठेवली. सध्या उत्पादन देत असलेली बाग म्हणजे चौथा प्लॉट आहे. एकदाच हाती आलेली भली मोठी रक्कम टिकत नाही. अशावेळी थोडा का होईना हाती पैसा खेळता राहण्याचं माध्यम म्हणजे लिंबू. हेच अर्थकारण फायदेशीर ठरलं. 

बाग जगवण्याचा अट्टाहास 
बागेनं पहिलं उत्पादन १९८३-८४ च्या सुमारास देण्यास सुरवात केली. परंतु १९८६ मध्ये पाणीटंचाईमुळे बाग संपली. सन १९८८ मध्ये पुन्हा लावलेली एक एकरातील लिंबू १९९५ पर्यंत चालला. पुन्हा पाणीटंचाईमुळे त्याचे नुकसान झालेच. मग १९९७ मध्ये तिसऱ्यांदा लावलेली बाग जवळपास १६ वर्षे चालली. गेल्या वर्षी ती काढावी लागली. त्यापूर्वीच एक एकर बागेचे नियोजन केले असल्याने सद्यःस्थितीत उत्पादनात खंड पडलेला नाही. अलीकडील वर्षांत एक एकरात दरांच्या चढ उतारानुसार ४० हजारांपासून सव्वा लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत असल्याचा अण्णांचा अनुभव आहे. सिंचनासाठी ब्राम्हगव्हाण शिवारात विहीर आहे. 

थेट विक्रीवर दिला भर 
ना चोराचे भय, ना अन्य नुकसानीची शक्‍यता. शिवाय आठवड्याला किमान पैसे मिळण्याची शाश्वती. म्हणूनच आपण लिंबाच्या शेतीकडे वळलो ते कायमचेच. पंचक्रोशीतील अडूळ, पाचोड, चितेगाव, पिंपरी, चिकलठाणा, औरंगाबादेतील मोंढा नाका बाजार, पीरबाजार आदी ठिकाणी ठोक दर पडले की थेट हातावर लिंबू विकण्याचे काम अण्णांनी केले. 

अन्य पिकांची जोड
लिंबाच्या एक एकर बागेला टोमॅटो, वांगी, कपाशी, अलीकडे मिरची, पपईची जोड दिली आहे. तीन एकर कपाशी कायम तर दहा गुंठे टोमॅटो, वांगी, २८ गुंठ्यांत पपई, अर्ध्या एकरात मिरची आदी पिके त्यांनी घेतली आहेत. दोन वर्षे अर्धा एकरावर कांदाही घेतला. 

पूरक उत्पन्नाची जोड 
केवळ शेतीवर अवलंबून न राहता जवळच्या पुंजीतून अण्णांनी किराणा दुकान सुरू केलं. ते मागील वर्षांपर्यंत चालविलं. उधार आणायचे नाही आणि उधार द्यायचे नाही या सूत्राचा अवलंब केला. 

दुकान बंद करण्याचा निर्णय घेतला, त्या वेळी ना त्यांच्याकडे कुणाची उधारी होती ना त्यांची कुणाकडे असं ते अभिमानाने सांगतात. 

उपसा वाढल्याची खंत 
मोटेपासून शेतीला पाणी देण्याची सुरुवात करणाऱ्या अण्णांनी ठिबकपर्यंतचा प्रवास केला आहे. पूर्वी भूगर्भातील पाण्याचा उपसा कमी व्हायचा. आता मात्र तो जास्त होत असल्याची खंत त्यांना वाटते. पाणीटंचाईमुळे तीन वेळा लिंबाची बाग मोडावी लागण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. 
 
मालवाहू वाहनाची जोड 
अण्णांचे चिरंजीव ज्ञानेश्वर यांनी मालवाहू वाहनाची सुविधा उभारली आहे. आपल्या शेतमालाबरोबरच अन्य शेतकऱ्यांचा शेतमालही ते बाजारात घेऊन जात असल्याने थोडीबहुत मिळकत त्यातून सुरू झाली. त्यामुळे कुटुंबाच्या अर्थकारणात हातभार लागला आहे. 
 
उत्पन्नाचे स्राेत वाढवले
पिकांची विविधता हे एक अण्णांचे वैशिष्ट्य. सुमारे तीन-चार वर्षांपूर्वी अर्धा एकरात त्यांनी कांदा घेतला. त्यातून सुमारे ४० ते ५० हजार रुपये मिळाले. अनेक वर्षांपासून टोमॅटोचे पीक त्यांनी घेण्याचे सातत्य ठेवले आहे. भले तो दहा गुंठ्यांत असेल पण उत्पन्नाचा स्राेत निश्चित वाढवला. पोळा किंवा दसऱ्याच्या वेळी त्याची लागवड केली जाते. या टोमॅटोला चांगला भाव मिळण्याची संधी असते असा अण्णांचा अनुभव आहे. वांग्याची जोडदेखील दहा ते पंधरा गुंठे क्षेत्रात दिली जाते. हंगाम पाहूनच अल्पकालावधीची पिके घेतली जातात.  

दरांवर नजर अन्‌ विक्रीचे तंत्र
बाजारातील शेतमालाच्या दरांवर अण्णांची तीक्ष्ण नजर असते. त्यांचा अभ्यासपूर्ण शेतीचा वसा त्यांचे चिरंजीव ज्ञानेश्वर चालवित आहेत. बाजाराची गरज ओळखून मोजका माल न्यायचा म्हणजे आपल्याला दर हमखास मिळतोच असं अण्णांचा प्रदीर्घ अनुभव सांगतो. बाजारात भेटणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांनाही आपले गणित समजावून सांगून त्यांच्या मालाला दर कसा मिळू शकतो हे पटवून देण्याचं काम अण्णा सातत्याने करीत आले  आहेत. 

अण्णा रंगनाथजी डिघुळे, ९७६४८६६९०३

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com