निर्यातक्षम केळी उत्पादन  हाच सर्वज्ञ मंडळाचा ध्यास

निर्यातक्षम केळी उत्पादन  हाच सर्वज्ञ मंडळाचा ध्यास

केळी उत्पादनात अग्रेसर असलेल्या तांदलवाडी (ता. रावेर, जि. जळगाव) गावातील सर्वज्ञ कृषी विज्ञान मंडळ आपल्या गावासह परिसरातील शेतकऱ्यांना माफक दरात दर्जेदार कृषी निविष्ठा उपलब्ध करून देते. शेतकऱ्यांपर्यंत केळी उत्पादन वाढीचे नवे तंत्रज्ञान मंडळातर्फे पोचविले जाते. मंडळाने केळी निर्यातीसाठी पुढाकार घेतल्याने चांगले दरही मिळू लागले आहेत.

केळीचे आगार असलेल्या रावेर तालुक्‍यात तांदलवाडी हे गाव तापी नदीकाठावर आहे. गावशिवारात काळी कसदार जमीन असून, केळीची मोठ्या प्रमाणात लागवड आहे. या भागात कापूस हे दुय्यम पीक आहे. रब्बीत गहू, मका लागवड असते. काही वर्षांपूर्वी केळीचा दुय्यम दर्जा, करपा रोगाचा प्रादुर्भाव आदींमुळे शेती अडचणीत आली होती. किफायतशीर दर मिळत नव्हता. या अडचणीवर मात करण्यासाठी गावातील तरूण शेतकरी एकत्र आले आणि त्यांनी केळीमध्ये सुधारित तंत्रज्ञान आणि उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करायचे ठरविले. सर्वांच्या प्रयत्नातून गावात २००९ मध्ये सर्वज्ञ कृषी विज्ञान मंडळाची स्थापना झाली.

मंडळाची झाली सुरवात   
सर्वज्ञ कृषी विज्ञान मंडळाच्या माध्यमातून केळीचा चांगला दर्जा, योग्य बाजारपेठ, फसवणूक न होता मुबलक आणि दर्जेदार कृषी निविष्ठा, नवे तंत्रज्ञान कसे मिळेल यावर भर देण्यात आला. मंडळाच्या स्थापनेसाठी प्रयोगशील शेतकरी प्रेमानंद हरी महाजन आणि प्रशांत वसंत महाजन यांनी पुढाकार घेतला. हे दोन्ही तरुण शेतकरी मंडळाचे मार्गदर्शक आहेत. मंडळाची अकरा जणांची कार्यकारिणी आहे. व्यवहारांचे ऑडिट केले जाते. सुरवातीला गावातील एका इमारतीत मंडळाचे कार्यालय आणि कीडनाशके, बी-बियाणे विक्रीचे केंद्र सुरू झाले. सध्या श्रीकांत वसंत महाजन हे अध्यक्ष आणि राहुल प्रभाकर महाजन हे उपाध्यक्ष आहेत. डॉ. वैभव ज्ञानेश्‍वर पाटील हे सचिवपदाची जबाबदारी सांभाळतात. राहुल युवराज महाजन, स्वप्निल पितांबर पाटील, सुनील सीताराम महाजन, विनोद काशीराम महाजन, सविताबाई महाजन, तिलकराज विठ्ठल चौधरी, विनीत जगदीश महाजन व गोवर्धन वाघ हे मंडळाचे सदस्य आहेत. ‘शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालविला उपक्रम` हा मंत्र मंडळाने जपला आहे. 

नवीन तंत्रज्ञानाचा प्रसार 
केळी उत्पादन वाढीसाठी मंडळातर्फे विविध उपक्रम राबविले जातात. वर्षातून दोनदा निर्यातक्षम केळी उत्पादन, खत नियोजन, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनाबाबत मंडळातर्फे मोफत चर्चासत्रांचे आयोजन केले जाते. मंडळाने जमीन सुपिकेतेबाबत जागृती, सेंद्रिय कृषी निविष्ठांच्या वापरावर भर दिला आहे. खत वापराबाबत प्रात्यक्षिकांचे आयोजन केले जाते. 

मंडळाचे सदस्य, पदाधिकारी राष्ट्रीय केळी संशोधन संस्था आणि देशभरातील इतर केळी विषयक संस्थांच्या संपर्कात असतात. तेथे दौरे करून नवे तंत्रज्ञान समजून घेतले जाते. शेतीतील नवे तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी प्रेमानंद महाजन, प्रशांत महाजन आणि सदस्यांनी अलीकडेच इस्त्राईलमधील जागतिक कृषी प्रदर्शनाला भेट दिली होती. 

आखाती देशांत केळीची निर्यात  
 गेल्या काही वर्षांत तांदलवाडी गावामध्ये गुणवत्तापूर्ण केळी उत्पादन वाढले. केळीची गुणवत्ता टिकून रहावी तसेच निर्यात वाढावी यासाठी मंडळाचे मार्गदर्शक प्रेमानंद महाजन आणि प्रशांत महाजन यांनी गावामध्येच आधुनिक पॅक हाऊस उभारले. हे पॅक हाऊस बड्या निर्यातदार कंपन्यांना उपलब्ध करून दिले जाते. कंपनी महाजन यांना कमिशन देते. महाजन हे शेतकऱ्यांकडून कोणतेही कमिशन घेत नाहीत. थेट निर्यातदार ते शेतकरी असे व्यवहार केळी निर्यातीसाठी होतात. यामुळे मागील दोन वर्षे तांदलवाडीमधील केळीची आखाती देशांत निर्यात झाली.

२०१७ मध्ये १५० कंटेनर (एक कंटेनर २० मेट्रिक टन क्षमता) तर यंदा जानेवारी ते जून दरम्यान ३५० कंटेनर केळीची निर्यात झाली. निर्यातीच्या केळीला जादा (ऑन) दर मिळाले. सरासरी १३०० रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळू शकले. योग्य व्यवस्थापनातून केळीची रास ३० किलो प्रति घडपर्यंत पोचली आहे. जून मध्ये लागवड आणि एप्रिल-मे मध्ये काढणी होते.  कारण मे मधील वेगवान वाऱ्याचा फटका केळी बागांना बसतो. यामुळे केळीची गुणवत्ता खराब होते, त्याचा दरावर परिणाम होतो, असे मंडळाचे सदस्य सांगतात. 

मंडळाचे विविध उपक्रम
तांदलवाडीत दरवर्षी मार्च ते ऑगस्टदरम्यान अकरा लाख उतिसंवर्धित केळी रोपांची लागवड. यंदाही एवढीच लागवड असून, याचबरोबरीने ८० हजार कंदांची लागवड.
 मंडळाच्या प्रयत्नातून हतनूर, रायपूर, रणगाव, कठोरा, सिंगत, सोनोदा, मांगलवाडी, बलवाडी, उदळी आदी गावांच्यामध्ये सुधारित पद्धतीने केळी लागवड वाढली.
 करपा निर्मूलनासाठी मंडळाचे एकात्मीक प्रयत्न. गेल्या चार वर्षांपासून करपा रोग नियंत्रणासाठी शिफारशीनुसार फवारण्या आणि पीक व्यवस्थापनाचे काटेकोर नियोजन.
केळीचा दर्जा चांगला राखण्यासाठी चार वर्षांपासून फ्रूट केअर तंत्रज्ञानावर भर. याचबरोबरीने मल्चिंग पेपर, स्कर्टींग बॅगचा वापर. ही सामग्री मंडळाच्या कृषी निविष्ठा विक्री केंद्रातून योग्य दरात उपलब्ध.
 कीडनाशके, रासायनिक खते, सेंद्रीय खते, गादी वाफे तयार करण्याचे ट्रॅक्‍टरचलित यंत्र तसेच फवारणीचे पंप मंडळातर्फे उपलब्ध.
 धैंचा, ताग, सोयाबीन, ज्वारी, कापूस बियाणांची उपलब्धता. 
 कृषी निविष्ठा केंद्रामध्ये एक व्यवस्थापक, एक विक्री अधिकारी, हेल्पर व संगणक परिचालक.
 धैंचा, तागाचे बियाणे मुबलक प्रमाणात आणि चांगल्या दर्जाचे मिळावे यासाठी मंडळाचा खंडवा (मध्य प्रदेश) येथील पुरवठादाराशी करार. 
 खतांची वाहतूक माफक दरात करण्यासाठी मालवाहू चालकांशी मंडळाचा समन्वय.
 येत्या काळात बैलजोडीचलित कृषी अवजारे व मालवाहू गाडी खरेदीचे नियोजन.
 खत साठवणुकीसाठी भाडेतत्वावर तांदलवाडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे गोदाम उपलब्ध.
 शेतकऱ्यांना बॅटरीचलित फवारणीचे पंप २० रुपये प्रतिदिन या दरात भाडेतत्त्वावर उपलब्ध. गादीवाफे तयार करण्याचे यंत्रही माफक दरात भाडेतत्त्वावर उपलब्ध.
 गावात यंदा पाच लाख केळी रोपांसाठी मल्चिंग पेपर आणि तीन लाख घडांसाठी स्कर्टींग बॅगचा वापर. 
 २०१६-१७ मध्ये मंडळाची आर्थिक उलाढाल तीन कोटी रुपये. २०१७-१८ मध्ये साडेतीन कोटींची उलाढाल.

प्रशांत महाजन ः ९८९०८१०३५७

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com