‘ए ग्रेड’ कलिंगड उत्पादनात राजेंद्र झाले मास्टर

rajendra patil
rajendra patil

नंदुरबार शहराच्या पूर्वेला सुमारे १६ किलोमीटरवर होळ हे २१०० लोकवस्तीचे अवर्षणप्रवण गाव आहे.  गावच्या जमिनी तशा अत्यंत सुपीक, उपजाऊ. साधारणत २००९-१० पर्यंत गावात खरीप, रब्बी हंगाम अत्यंत चांगल्या पद्धतीने घेतला जायचा. पुढे मात्र दर वर्षी पर्जन्यमान कमी होत गेले. बागायती पिकांना उतरती कळा लागली. साधारण २०१३-१४ पर्यंत बागायतदारांची संख्या तुरळक राहिली आहे. गावचा रब्बी हंगाम संपल्यात जमा आहे. 

पूर्वीची शेती  
राजेंद्र यांची घरची वडिलोपार्जित आठ एकर शेती आहे. पावसाळा चांगला झाला, तर तीन-चार एकर शेती बागायती होईल, अशी स्थिती. राजेंद्र यांचे वडील देवाजी दंगल पाटील पारंपरिक पद्धतीने शेती करायचे. कापूस, मिरची, पावसाळी कांदा, तसेच रब्बीत हरभरा ही नेहमीची पीक पद्धती होती. शेतीची सूत्रे आपल्या हाती घेतल्यानंतर राजेंद्र त्यांनी त्यात सुधारणा करण्यास सुरुवात केली. 

प्रतिकूल परिस्थितीत प्रयोगशील शेती  
होळ गावातील अवर्षण परिस्थितीतही राजेंद्र डगमगले   नाहीत. अत्यंत मेहनतीने, कौशल्याने, तसेच पाण्याचे काटेकोर व्यवस्थापन करून शेती प्रयोगशील करण्यास सुरवात केली. सन २००३-०४ मध्ये त्यांचा नंदुरबार येथील कृषी विज्ञान केंद्राशी (केव्हीके) संपर्क आला. तेथील तज्ज्ञांच्या सल्ल्याने शेतीची दिशा बदलली. कापूस, मिरची, पावसाळी कांदा या पिकांना सुधारित तंत्रज्ञानाची जोड देत एकरी उत्पादकता वाढवली. पारंपरिक पद्धतीत कापसाचे एकरी ५ ते ६ क्विंटल उत्पादन मिळायचे. ते ११ ते १२ क्विंटलपर्यंत नेण्यात राजेंद्र यशस्वी झाले. सरासरी ४० क्विंटल प्रतिएकर पूर्वी मिरचीचे उत्पादन येत असे. त्याचे दुप्पट म्हणजे ८० क्विंटलपर्यंत उत्पादन नेले. पावसाळी कांद्याचे उत्पादन ६० क्विंटलवरून ८० ते ९० क्विंटल प्रतिएकरापर्यंत पोचविले. पूर्ण बागायती क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणले.

कलिंगडाचा प्रयोग 
सुधारित शेतीतही नेहमीच्या पिकांमध्ये दरांची समस्या होती. निविष्ठांचा वाढता खर्च होता. अपेक्षित प्रगती दिसत नव्हती. दिवसें-दिवस घटत जाणारी पाण्याची पातळी चिंतेत भर टाकत होती. सन २०१३-१४ मध्ये तर अवघे दोन एकर क्षेत्र सिंचनाखाली येईल, अशी अवस्था झाली. त्या वर्षी कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांसोबत चर्चा करून गावात प्रथमच कलिंगड लागवडीचा निर्णय घेतला. पाण्याची दुर्भिक्षता, घरावर असलेले कर्ज, तसेच एकरी किमान ४० हजार रुपये खर्च अपेक्षित असल्याने घरून या प्रयोगाला विरोध झाला. मात्र, राजेंद्र यांचा निर्णय ठाम होता. त्यांनी मावशीकडून उसनवारीने पैसे घेत दोन एकरांवर लागवडीचे नियोजन   केले. 

यशस्वी ठरला प्रयोग  
एकरी ३०० ग्रॅम संकरित बियाणे, मल्चिंग पेपर, कीडनाशके व अन्य असा सर्व दोन एकरांचा खर्च साधारण ७० हजार रुपयांपर्यंत आला. पहिल्याच वर्षी साधारण ७५ दिवसांत दोन एकरांतून पहिल्या गुणवत्तेचे ४३ टन उत्पादन मिळाले. खर्च वजा जाता सुमारे दोन लाख ३९ हजार रुपये उत्पन्न हाती आले. गावात पहिल्यांदाच कलिंगडचा प्रयोग असल्याने काढणीच्या दिवशी उत्पादनाचे गणित जवळून पाहण्यासाठी गावातील अनेक मंडळी शेतात उपस्थित होती. 

कलिंगड शेतीत सातत्य-ठळक बाबी  
गेल्या पाच वर्षांपासून राजेंद्र यांनी कलिंगड पिकात ठेवले सातत्य
आपल्या गावात पाण्याची दुर्भिक्षता असल्याने गेल्या दोन वर्षांपासून पाणी असलेल्या गावात नातेवाइकांकडे भाडेपट्टीने कलिंगड शेती
सहा बाय दीड फुटावर लागवड. 
लागवडीनंतर १२ ते १५ दिवसांपासून ‘फर्टिगेशन’ला प्रारंभ. ते साधारणत: ५५ दिवसांपर्यंत. 
पिकाच्या ३५-४५ दिवसांच्या फुले व फळधारणेच्या कालावधीत जैविक रोग-कीड

नियंत्रणावर भर
कलिंगडात पाणी व्यवस्थापन हा घटक अत्यंत महत्त्वाचा. त्या दृष्टीने बेड तयार झाल्यानंतर, बेसल डोस मिश्रित केल्यानंतर मल्चिंग पेपर अंथरला जातो. त्यानंतर बेड पूर्णपणे ओलवून घेतला जातो. 
लागवडीपासून ३० ते ३२ दिवसांपर्यंत काटेकोर पाणी व्यवस्थापन ठेवले जाते. शासकीय वाढीच्या व ३२-४५ दिवसांच्या कालावधीत उत्कृष्ट निचरा होणाऱ्या जमिनीत चार लिटर प्रतितासाच्या ड्रीपर्सद्वारे एक ते दीड तास पाणी. 
फळधारणा झाल्यानंतर पाण्याची मात्रा वाढवली जाते. फळ पोषणाच्या सुरवातीच्या अवस्थेत दीड ते दोन तास व २५० ग्रॅम वजनाची फळे झाल्यावर दोन ते अडीच तास व शेवटच्या टप्प्यात सरासरी चार तास पाणी देण्यात येते. 
 फ्रूट सेटिंगच्या वेळी पिकास पाण्याचा ताण असणे आवश्यक, असे राजेंद्र सांगतात. 

 ‘ए ग्रेड’चे उत्पादन 
राजेंद्र एकरी २२ ते २५ टन उत्पादन घेतात. यातील केवळ दोन ते तीन टन माल ‘बी ग्रेड’चा. उर्वरित ‘ए ग्रेड’चा असल्याचे ते सांगतात.
एके वर्षी दोन एकरांतील ५० टन मालात केवळ १६ टन माल ‘बी ग्रेड’चा होता.  

व्यापाऱ्यांकडून बांधावर खरेदी 
राजेंद्र यांनी आपल्या परिसरातील कलिंगड उत्पादकांचा छोटा गट तयार केला आहे. माल काढणीच्या काही दिवस आधी बेटावद, सूरत आदी भागातील व्यापाऱ्यांशी संपर्क साधला जातो. त्यानंतर व्यापारी जागेवर येऊन खरेदी करतात. किलोला साडेसात रुपयांपर्यंत दर मिळतो. यंदा मात्र आवक सर्वत्र वाढल्याने दर घटले. ते साडेपाच रुपयांपर्यंत मिळाले, असे राजेंद्र म्हणाले. 

कर्जमुक्त झाले  
प्रगतितशील शेती करण्यापूर्वी किंवा कलिंगड शेती सुरू करण्याआधी पाटील यांचे कुटुंबीय कर्जबाजरी होते. आता त्यांनी टप्प्याटप्प्याने आपली आर्थिक परिस्थिती सक्षम केली आहे. सर्व कर्ज फेडून नव्या तंत्राचा ट्रॅक्टर घेतला आहे. नंदुरबार शहरात प्लॉट घेतला आहे. आपल्या प्रगतीत केव्हीकेचा मोलाचा वाटा असल्याचे ते नमूद करतात. उत्पादन व व विक्रीचे कौशल्य आपल्यापुरतेच सीमित न ठेवता त्यांनी अनुभवाचा फायदा आपल्या परिसरातील शेतकरी, आप्तेष्ट व आपले सोबती यांनाही करून दिला आहे.

छायाचित्रण व पूरक व्यवसाय 
कुटुंबाला हातभार म्हणून राजेंद्र विविध कार्यक्रमांत छायाचित्रण व्यवसायही करतात. त्याचबरोबर इलेक््रटीक वायडिंग क्षेत्रातही ते वाक्‌बगार आहेत. या दोन्ही व्यवसायातून त्यांनी अर्थार्जनाची जोड दिली आहे.  

राजेंद्र पाटील, ९४२३७२५८६४
आर. एम. पाटील, ९८५०७६८८७६,
(लेखक कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार येथे विषय विशेषज्ज्ञ आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com