सेंद्रिय ऊस, हळद, खपली गव्हाला मिळविली हमखास बाजारपेठ 

सेंद्रिय ऊस, हळद, खपली गव्हाला मिळविली हमखास बाजारपेठ 

सांगली जिल्ह्यात मिरज तालुक्‍याचा पूर्व भाग द्राक्ष, तर काही प्रमाणात उसासाठी प्रसिद्ध आहे. म्हैसाळ उपसा सिंचन योजना सुरू झाल्याने हा परिसर सिंचनाबाबत तसा समृद्ध झाला आहे. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे आर्वतन वेळेवर सुरू न झाल्यास परिसरात पाणीटंचाई सातत्याने भेडसावते. अशा स्थितीत या भागातील शेतकरी पाण्याचा जपून वापर करताना दिसतो. यामुळे शेतकरी कमी पाण्यावर येणारी पिके घेण्यास प्राधान्य देतात.
 
जयकुमार यांची शेती  
तालुक्‍यातील आरग (जि. सांगली) येथील जयकुमार पाटील यांची वडिलोपार्जित सुमारे २० एकर आहे. एकत्र कुटुंब असताना द्राक्षाची बाग होती. त्यांचे बंधू द्राक्षशेती करतात. वेगळे झाल्यानंतर जयकुमार यांच्या वाटणीला १० एकर शेती आली. त्यापैकी सहा एकर शेती माळरान तर उर्वरित चार एकर काळी जमीन आहे. त्यामध्ये सुरवातीला द्राक्षपीक घेतले; मात्र अपेक्षित यश मिळाले नाही. पाण्याची कमतरता असल्याने त्याला अनुकूल; मात्र नगदी पिकांचा शोध त्यांनी सुरू झाला. त्यात खपली गहू, मूग ही पिके आश्वासक वाटली.  

सेंद्रिय शेतीच्या वळणावर  
सन १९९३ च्या दरम्यान प्रयोग परिवाराचे श्री. अ. दाभोळकर आणि वैजनाथ शेटे यांच्यासोबत भेट झाली. त्याचे रूपांतर पुढे मैत्रीत झाले. शेती करताना नेहमी पुढील दहा वर्षांचा विचार केला पाहिजे. सेंद्रिय शेती केली तर त्यात यशस्वी होऊ शकतो, असा सल्ला त्या वेळी जयकुमार यांना मिळाला. 
हाच सल्ला त्यांना नवचैतन्य देणारा ठरला. त्या जिद्दीने ते कामाला लागले. सन १९९५-९६ पासून सेंद्रिय शेतीकडे ते वळले. सुरवातीच्या काळात एक एकर क्षेत्रावरच ही शेती सुरू केली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने क्षेत्रात वाढ होत गेली. सन २००७ पासून शंभर टक्के सेंद्रिय शेती सुरू झाली. 

सेंद्रिय शेतीतील आव्हाने  
जयकुमार सांगतात की सेंद्रिय मालाची विक्री हेच आव्हान होते. मपण त्यावर मात करायचे ठरवले. 
माझ्याकडे हळद पीक आधीपासूनच होते. त्यामुळे मार्केटमधील व्यापारी ओळखीचे होते. याचा फायदा गूळ, हळद, गहू, मूग विक्रीत झाला. परराज्यांत मालाची विक्री कशी करता येईल, याचा विचार नेहमी करायचो. त्यात प्रयत्नांतून यश मिळाले. पूर्वी उसाचे उत्पादन एकरी ३० टनांच्या आसपास मिळायचे. आता त्यात फार वाढ म्हणता येत नसली, तरी ते ४५ ते ५० टनांपर्यंत स्थिर आहे. 

घरी वापरासाठी बांधावर मूग होता. पण एक ते दीड एकरांवर तो घेतला तर विक्री सोपी होईल आणि उत्पन्नातही भर पडेल हा विचार केला. त्यादृष्टीने चार वर्षांपासून दीड एकर मूग घेत आहे. बंगळूर येथील कंपनीला त्याची थेट विक्री होत आहे. 

ॲग्रोवनचे नियमित वाचन 
 ॲग्रोवनमध्ये शेतकऱ्यांचे संशोधन, अनुभव वाचण्यास मिळतात. त्यातून व शास्त्रज्ञांचे लेख यातून नेहमीच मोठी ऊर्जा मिळते. हाच धागा पकडून माझी शेतीतील वाटचाल सुरू आहे. 

जयकुमार यांची शेती 
हळद- २ एकर 
ऊस लागवड- अडीच एकर (को ८६०३२) 
ऊस खोडवा- अडीच एकर  
मूग- दीड एकर 
मूग काढणीनंतर त्या शेतात दीड एकर खपली गहू  

शेतीची वैशिष्ट्ये 
जमिनीचे सपाटीकरण, शेताला चारही बाजूंनी बांध घातले. यामुळे जमिनीची 
धूप थांबली 
पिकांचे अवशेष शेतातच गाडले जातात 
दरवर्षी दोन एकरांसाठी शेणखताचा वापर 
हळद आणि उसाची फेरपालट 
जैविक खतांचा वापर 
माळरान शेतात काळ्या मातीचा वापर 

एकरी उत्पादकता 
खपली गहू (तयार)- ११ क्विंटल 
हळद- १५ ते १८ क्विं.  
मूग- ३ क्विं.  
ऊस- ४५ ते ५० टन  
     
मिळणारे दर 
गहू दलिया किंवा सुजी - ११० रुपये प्रतिकिलो 
गूळ- ५० रु. प्रतिकिलो (होलसेल) व 
६० रु.     किरकोळ  
हळद पावडर- २०० रु. प्रतिकिलो (किरकोळ) 
मूग- १०० रु. प्रतिकिलो 
    
विक्री
हळद - मुंबई, गुजरात, बंगळूर  
गूळ - मुंबई, गुजरात, अहमदाबाद 
 मूग - बंगळूर 
    
गूळ विक्रीचे नियोजन 
सप्टेंबर ते नोव्हेंबरपर्यंत ग्राहकांशी संपर्क 
मागणीनुसार निर्मिती 
दरवर्षी ५० ते ६० टन ऊस गुळासाठी तर उर्वरित     ऊस कारखान्याला दिला जातो.
सध्या खपली गव्हाचा रवा, शेवयांना मोठी मागणी आहे. त्यामुळे भविष्यात या उत्पादनांची यंत्रणा उभी करण्याचा मानस आहे. त्यादृष्टीने परराज्यांतील बाजारपेठा, मागणी, दर यांचा अभ्यास सुरू आहे. 
     
वार्षिक विक्री 
गूळ - ८ ते१० टन 
मूग - ३ क्विंटल 
हळद पावडर - १५ क्विं.  
खपली गहू - १२०० किलो 

दुधाचे उत्पन्न 
चार म्हशी आहेत. दोन्ही वेळेचे दूध सुमारे ५ ते ७ लिटर मिळते. घरातून विक्री होते. त्यास ४५ रुपये प्रतिलिटर दर मिळतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com