प्रयोगशील कांदाशेतीत अोळख मिळवलेले निमोण

प्रयोगशील कांदाशेतीत अोळख मिळवलेले निमोण

नाही नदी, नाही नाला, नाही खळाळत पाणी
माझ्या गावच्या पाण्याची, आहे रीतच अडाणी...

प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांच्या कवितेतील या अोळी जणू निमोण गावासाठीच आहेत, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. खळाळंत पाणी तर दूरच, पण वर्षानुवर्षं पाऊसही या गावावर रुसतो. तरीही गावच्या मातीची उमेदच जगावेगळी आहे. कांदा उत्पादकांचं गाव म्हणून निमोणनं ख्याती निर्माण केलीय. नाशिक जिल्ह्यात चांदवड या दुष्काळी तालुक्‍यातील हे दुष्काळी गाव. पावसाळ्यात जेमतेम पाऊस पडतो. त्यावर कसंबसं तग धरणारं हे गाव. 

स्वतःची अोळख तयार केली  
प्रतिकूलतेतही उभं राहताना स्वत:ची ओळख निर्माण करताना निमोणचा शेतकरी अत्यंत चांगल्या प्रतीचा कांदा पिकवतो. पिकविल्यानंतरही प्रतवारी करूनच विक्रीला नेणार, ही त्याची ओळख आहे. कुठलीही बारमाही सिंचनाची सोय नसतानाही शेतीत कायम वेगवेगळे प्रयोग करण्याची धडपड त्याच्यात दिसून येते. 

कांदा, भाजीपाला आणि पशुपालनही 
निमोणची लोकसंख्या सुमारे तीन हजारांपर्यंत
गाव शिवारात सुमारे ३५० कुटुंबे 
मुख्य व्यवसाय शेती आणि त्यातही मुख्य पीक कांदा.  
हंगाम व पाण्याच्या सोयीनुसार भाजीपाला पिके
एकूण क्षेत्रापैकी तीन हजार एकरांवर कांदा, तर उर्वरित पंधराशे एकरांवर अन्य पिके आहेत.
गावातील प्रत्येक शेतकऱ्याचे सरासरी क्षेत्र ८ एकर. पैकी पाच ते सहा एकरांवर कांदा. 
पन्नास टक्के शेतकरी पशुपालन व दुग्धव्यवसाय. त्यातून दूध व शेतीला शेणखत उपलब्ध होते.  

 अल्पावधीत कांदा बाजारात 
ऑगस्टमध्ये नागपंचमी ते ऑगस्ट अखेरपर्यंत श्रावणसरी असतात. त्या कोसळल्यानंतरच्या गारव्यावरच लागवडीची तयारी केली जाते. त्या आधी सरी वाफे पाडून शेत तयार केलेले असते. 

श्रावण महिन्यात अत्यंत कमी पाणी दिले जाते. 
तोपर्यंत विहिरींमध्ये पाणीसाठा झालेला असतो. लागवडीपासून 
ते काढणीपर्यंत पिकाला कमी पाण्याची सवय ठेवली जाते. जोडीला शेणखताचा चांगला वापर होतो. यामुळे लागवडीपासून सुमारे ८० दिवसांत कांदा सशक्त व काढणीसाठी तयार होत असतो. 

बाजाराचा अभ्यास   
पोळा सणापूर्वी या कांद्याची लागवड होत असल्याने त्यास पोळकांदा म्हणतात. त्याची हेक्टरी उत्पादकता रब्बी कांद्यापेक्षा कमी असते. ऑक्‍टोबरमध्ये हा कांदा बाजारात येतो. या काळात देशभरात कांद्याची कमतरता असते व त्यामुळे चांगला दर मिळतो. त्यामुळे उत्पादकता कमी असली, तरी त्याचे अर्थकारण बिघडत नाही. बाजारात चढ-उतार नेहमीच असतात. एखाद्या वर्षी तोटा जरी झाला, तरी दर वर्षी निष्ठेने पीक घेण्यात निमोणच्या शेतकऱ्यांचा हातखंडा आहे. मग काही वर्षे नफ्याचीही मिळतात. 

चार महिने जमिनीला विश्रांती 
जून ते नोव्हेंबर या काळात कांदापिकात आकंठ बुडालेला निमोणचा शेतकरी डिसेंबर ते मार्च या काळात मात्र फारसे कोणते पीक घेत नाही. पाणी नसल्यामुळे ते शक्‍यही होत नाही. या काळात जमिनीला विश्रांती मिळते. एप्रिलनंतर हा शेतकरी पुढील हंगामाच्या तयारीला लागतो. 

शेतकऱ्यांनी विकसित केले वाण  
कमी पाण्यात खात्रीशीर उत्पादन कसे काढता येईल, याचा शोध घेताना वाणबदल करण्याचे इथल्या शेतकऱ्यांनी ठरविले. चांगल्या प्रतीचा गोल, रंगीत, चवदार, दुभाळका नसलेले कांदे अशा निकषांवर आपल्याच वाणांतून शोध घेतला. त्यातून मागील आठ वर्षांत निवड पद्धतीने वाण विकसित केले. त्याला स्थानिक भाषेत ‘चायना'' असे म्हटले जाते. अन्य वाणाच्या कांद्याला जिथे किमान १०० दिवस काढणीस लागतात, तिथं हे वाण ८० दिवसांत काढणीला येत. कमी कालावधी, कमी पाणी व  कमी खर्चात त्याची लागवड होते. यामुळे उत्पादनात एकरी १० ते १५ क्विंटलने वाढ झाली. निंदणी, कीडनाशक फवारणी, मजुरीच्या खर्चात बचत झाली. या म्हणीनुसार बीज शुद्ध करण्यावर भर दिला. काही वर्षांपासून सातत्याने त्यात सुधारणा केली. आता विश्‍वासार्ह बियाणे तयार करण्यात यश मिळाले. 

शेतकरी गटाने केली निर्यात 
निमोणमधील शेतकऱ्यांनी गट तयार केला आहे. शासनाच्या "आत्मा'' यंत्रणेचेही सहकार्य त्यांना मिळते. गटाने मागील वर्षी सौदी अरेबिया देशाला दोन कंटेनर कांदा निर्यात करण्यात यश मिळवले. येत्या काळात मार्के.िटंग व निर्यात यावर गट भर देणार आहे. : भाऊसाहेब गोसावी,९८५०७१७१५२. 
अध्यक्ष- आई सप्तशृंगी शेतकरी गट, निमोण.
 : पंकज दखणे,  ९८५००३७३७६, गटसचिव

कांदा झाले  मुख्य पीक 
साधारण १९८० च्या  दशकापर्यंत पावसाच्या पाण्यावर येणारी बाजरी, मका, मूग, भुईमूग अशी पिके घेतली जायची. त्या वेळी फक्त १० ते २० टक्के क्षेत्रावरच कांदा असायचा. मात्र, अर्थकारण सुधारण्यासाठी वीस वर्षांपासून कांदा हेच मुख्य पीक झाले आहे. 

कमी पाण्यात उत्पादनाचे तंत्र 
निमोणला सुरवातीपासून पाण्याची अडचण. पावसाळ्यात पाऊस अत्यल्प. बारमाही वाहणारी नदी नाही. जुन्या काळातील दोन नद्या आहेत. त्यावर जलयुक्त शिवारच्या माध्यमातून पाझर तलावाची कामे झाली. पाऊस पडला, तरच बंधाऱ्यात पाणी साठते. तरच पुढे शेती चांगली होते. इथली बहुतांश शेती मुरुमाड आहे. पावसाळ्याच्या सुरवातीला थोडा पाऊस पडला, तरी जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत विहिरींना पाणी उतरते. त्या वेळी कांदापिकाची तयारी केलेली असते. रांगड्या भाषेत सांगायचे, तर विहिरींना नुसता घाम जरी आला, तरी इथला शेतकरी कांदा लागवडीचे धाडस करतो. अत्यल्प पाण्यातही चांगल्या प्रतीचा कांदा काढण्याचे कौशल्य इथल्या शेतकऱ्यांनी अवगत केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com