टोमॅटोतील मंदी का लांबली? 

Tomato
Tomato

देशात आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओरिसा, महाराष्ट्र, प. बंगाल, बिहार व गुजरात ही प्रमुख टोमॅटो उत्पादक राज्ये आहेत. देशातील निम्म्याहून अधिक उत्पादन या राज्यांतून येते. यात महाराष्ट्र आणि गुजरात ही वर्षभर टोमॅटो पिकवणारी राज्ये असल्यामुळे मंदीची झळ त्यांनाच अधिक बसते. अन्य राज्यांत हंगामी उत्पादन होते. राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाकडील आकडेवारीनुसार देशात २०१५-१६ मध्ये ७.६ लाख हेक्टर क्षेत्रावर टोमॅटोची लागवड झाली होती. आधीच्या वर्षीच्या तुलनेत लागवड क्षेत्रात मोठी वाढ नसली तरी उत्पादकता मात्र खूप वाढली. त्यामुळे एकूण उत्पादनात १५ टक्के वाढ मिळाली. त्याचा परिणाम म्हणून गेल्या वर्षभरात टोमॅटोचे भाव दबावात राहिले. 

देशांतर्गत बाजारात टोमॅटो आणि कांद्याचा खप आणि मागणी जवळपास सारखीच आहे. कांद्याच्या तुलनेत टोमॅटोचे पीक हे अधिक भांडवली खर्चाचे आहे. टोमॅटो उत्पादक प्रमोद देवरे (जि. नाशिक) यांच्या म्हणण्यानुसार, साधारपणे साठ टन एकरी उत्पादनासाठी पाच रु. प्रतिकिलो खर्च येतो. यात टोमॅटो स्ट्रक्चरवरील व्याज व घसारा, मजुरी आणि अन्य पीक खर्चाचा समावेश आहे. यामुळे टोमॅटोला किमान दहा रु. किलो बाजारभाव मिळाला पाहिजे. मात्र, गेल्या वर्षभरातील चित्र निराशा करणारे आहे. 

सहसा टोमॅटोमधील मंदी एक-दोन महिन्यांच्यावर टिकत नाही; पण अलीकडच्या काळातील सर्वाधिक मोठी मंदी चालू मोसमात दिसली. ऑगस्ट २०१६ पासून सुरू झालेली मंदी २० फेब्रुवारी २०१७ पर्यंतही सुरू होती. गेल्या सहा महिन्यांतील सरासरी विक्री दर १ ते ५ रु. किलो या दरम्यान राहिले. तेजी येईल या अपेक्षेने उत्पादनाचे चक्र सुरू राहिले. दुबार पीक घेतल्यास टोमॅटोचा हंगाम सहा-सात महिने चालतो. पीक आणि स्ट्रक्चरवरील खर्च लक्षात घेता, मध्येच उत्पादन थांबविणे शक्य नसते. या अपरिहार्यतेमुळे टोमॅटो उत्पादकांची मोठी कोंडी झाली.

याची सर्वाधिक झळ उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बसली आहे. यंदा चांगल्या पाऊसमानामुळे झालेली उत्पादनवाढ, महाराष्ट्रातील आडतबंदीमुळे ठप्प झालेला बाजार, नोटाबंदीनंतर खपात झालेली लक्षणीय घट आणि पाकिस्तान व बांगलादेशातील बॉर्डरबंदी अशा अडथळ्यांच्या शर्यतीत टोमॅटोचा बाजार पार विस्कटून गेला. वास्तविक देशाच्या विशाल बाजारपेठेसाठी १० ते १५ टक्के उत्पादनवाढ ही काही विशेष गोष्ट नाही. पण, ज्या ज्या वेळी पुरवठा वाढतो, त्यावेळी खपवाढीला खीळ घालणाऱ्या घटना घडल्या की खूप वेगाने बाजार खाली येतो. हा अनुभव या वेळीही आला. तसेच टोमॅटोचे भाव वाढल्यावर त्यास ठळक प्रसिद्धी देणारी मुख्य प्रवाहातील माध्यमे भाव उतरल्यावर नेहमीप्रमाणे मूग गिळून गप्प राहिली. राज्यकर्ते निवडणुकांत मश्गूल होते. आडतबंदी, नोटाबंदी आणि बॉर्डरबंदी या संकटांत प्रशासनाचे जे साह्य मिळायला हवे होते, ते मिळाले नाही.

गेल्या पंधरवड्यात बाजारात सुधारणा झाली असून, भाव ८ ते १३ रु. किलोच्या दरम्यान आहेत. सातत्यपूर्ण मंदीनंतर गुजरातमधील पुरवठा कमी झाला आहे. पुढील काळात टोमॅटोच्या बाजारभावाची दिशा अनेक गोष्टींवर अवलंबून असेल. आतापर्यंत हवामान पिकासाठी खूप अनुकूल राहिले आहे. यंदा पाऊसमान चांगले असल्यामुळे पाण्याची उपलब्धताही चांगली आहे. कृषी मंत्रालयाने २०१६-१७ साठीच्या पहिल्या पाहणीत १८९ लाख टन टोमॅटो उत्पादनाचे अनुमान दिले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पादनात सुमारे एक टक्का वाढ आहे.

थोडक्यात गेल्या वर्षी असलेली उत्पादनवाढ यंदाही कायम राहील. एवढी मंदी येऊनही उत्पादन का कमी होत नाही, याबद्दलची कारणे पुढीलप्रमाणे :

  1. गेल्या दहा वर्षांत उत्पादन घेण्याच्या शेतकऱ्यांच्या कौशल्यात वाढ.
  2. उत्पादनाचे अन्य स्राेत उपलब्ध नसणे किंवा अन्य व्यापारी पिकांचे उत्पादन घेण्याचे कौशल्य नसणे.
  3. दीर्घकालीन मंदीचा अंदाज येत नसल्याने तेजीच्या अपेक्षेने गुंतवणूक सुरू ठेवणे.
  4. पिकाची तोडणी आठ-दहा महिने सुरू राहते. त्यामुळे स्ट्रक्चर बांधणी व पायाभूत सुविधवेधेवरील खर्च मध्येच तोडता न येणे. अर्थात वरील निरीक्षणे ही केवळ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची आहेत. 

सारांश, मोठ्या मंदीनंतरही बाजारात सुधारणा स्वाभाविक असली तरी खूप मोठी तेजी येईल, असे चित्र सध्याच्या परिस्थितीवरून दिसत नाही. उष्म्याचा वाढता कहर, तपमानातील चढ-उतारामुळे वाढणारी रोगराई यामुळे उत्पादन नियंत्रित झाले, तर मात्र चांगल्या तेजीची अपेक्षा करता येईल, इतकेच. 

(लेखक शेतमाल बाजार अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com