पन्नास हजार हेक्टरवर भातशेती संकटात 

पन्नास हजार हेक्टरवर भातशेती संकटात 

रायगड : शेजारील मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या महानगरांमुळे रायगड जिल्ह्यात सुबत्तेचे वारे वाहत असले तरी भात उत्पादक शेतकऱ्यांची होरपळ कमी झालेली नाही. अलीकडच्या काळात उत्पादन खर्च वाढल्याने शेतकऱ्यांना भातशेती परवडेनाशी झाली आहे. उत्पन्नातून खर्चही भागत नाही, अशा दुष्टचक्रात भात उत्पादक शेतकरी आहेत. त्यातच यंदा पावसाने मोठी ओढ दिल्याने खरिपातील सुमारे पन्नास हजार हेक्टरवरील भातशेती संकटात आहे. आणखी पाच ते सात दिवसांत पावसाने हात न दिल्यास शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट आवासून उभे राहणार आहे. पावसाअभावी रोपांचेही मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. 

रायगड जिल्ह्यात खरिपात प्रामुख्याने भातशेती होते. जिल्ह्यातील मोठे क्षेत्र म्हणजेच सुमारे १ लाख २३ हजार हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड होते. यंदा त्यापैकी १ लाख १० हजार हेक्टरवर भात लागवड होईल असे अपेक्षित आहे. सध्या जिल्ह्यात पन्नास टक्के क्षेत्रावर भात लागवड पूर्ण झाली आहे. सुरवातीच्या पावसामुळे पेरण्या व्यवस्थित पार पडल्या. भाताची उगवणही नीट होती. मात्र, ५ जुलैपासून जिल्ह्यात पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे आता शेतीत पाणी नाही. त्याचा प्रतिकूल परिणाम पेरण्यांवर झाला आहे. पेरण्या खोळंबल्या आहेत. त्याशिवाय केलेल्या पेरण्या आणि रोपेसुद्धा अडचणीत येण्याची शक्यता आहे. आणखी पाच ते सात दिवस पाऊस न झाल्यास रोपांचे नुकसान तर होईलच शिवाय पेरण्याही करपण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. दुबार पेरण्यांशिवाय शेतकऱ्यांपुढे दुसरा पर्याय उरणार नाही. त्यामुळे बियाणे, खते, मजुरीवरील खर्च वाया जाणार आहे. तसेच दुबार पेरणीमुळे हा खर्च आणखी वाढणार आहे. 

जिल्ह्यात भातशेती सोडून फारशी इतर नगदी पिके घेतली जात नाहीत. काही प्रमाणात आंबा, काजूच्या फळबागा तसेच सुपारी आणि नारळ लागवड होते. परिसरातील भातशेती तुकड्या-तुकड्यात होते. दहा, वीस, तीस गुंठे अशी भात शेती होते. क्वचित काही मोजक्या शेतकऱ्यांचेच मोठे क्षेत्र भाताखाली आढळते. माणगाव तालुका परिसरात वर्षातून दोनदा भात शेती केली जाते. इतरत्र फक्त खरिपातच भात शेती होते. त्यामुळे भात उत्पादक शेतकरी हा शेतमालक असला तरी वर्षातील उर्वरीत आठ महिने त्याला मजुरीला जावे लागते. त्यावरच शेतकऱ्यांचे अर्थकारण चालते. त्यामुळे रायगडमधील पीककर्ज वसुलीचे प्रमाण शंभर टक्के आहे. वीजबिलाची थकबाकी शून्य टक्के आहे. तसेच शेजारी मोठी महानगरे, वाढणारे शहरीकरण आणि औद्योगीकरण यामुळे जिल्ह्यातील घरटी एखादा तरी माणूस मुंबई, ठाणे, नवी मुंबईत कामाला असल्याचे दिसून येते. यातून या भागात सुबत्ता दिसून येते. 

शहरीकरण आणि औद्योगीकरणामुळे शेत मजुरांच्या समस्येवर बोलताना पेण तालुक्यातील शेतकरी कृष्णा राणे म्हणाले, ‘‘की अलीकडच्या काळात जिल्ह्यात मजूर समस्या गंभीर बनली आहे. शहरांमध्ये लहान-मोठी कामे करणारे शेतात काम करायला तयार नसतात. शेतीकामांसाठी मजूर मिळत नाहीत. भात पेरणीसाठी दिवसाला तीनशे रुपये मजुरी द्यावी लागते. कापणीचा दर चारशे रुपये आणि मळणीसाठी पाचशे रुपयांशिवाय मजूर मिळत नाही, अशी अवस्था आहे. त्याशिवाय मजुरांना दोनवेळचे जेवण द्यावे लागते ते वेगळेच. एकंदर बियाणे, खते, लागवडीपासून ते कापणी, मळणीपर्यंत मजुरीवर होणाऱ्या खर्चाचा विचार करता एक किलो तांदूळ सतरा ते अठरा रुपयांना पडतो. मात्र, बाजारातील दर बारा रुपयांच्या वर जात नाही, अशा दुष्टचक्रात रायगडमधील भातशेती अडकली आहे.’’ 
 

सरकारी मदतीची प्रतीक्षाच
पावसाळ्यात एकदा का होईना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा सामना करावा लागतो. पावसाच्या जोरदार तडाख्यामुळे पिकांची, फळबागांची मोठी हानी होते. मात्र, तरीही जिल्ह्यातील शेतकरी सरकारी मदतीपासून वंचितच राहतो, अशी खंत उरण तालुक्यातील शेतकरी रामचंद्र भोईर यांनी व्यक्त केली. कोकणासाठी हवामान आधारीत फळ, पीकविमा योजना स्वतंत्रपणे राबवावी, अशी मागणीही त्यांनी केली. 
दिवसेंदिवस भातशेतीचा खर्च वाढत चालला आहे. शेती परवडणेनाशी झाली आहे. मात्र, कुटुंबाला वर्षभरासाठी लागणाऱ्या भातासाठी का होईना शेतकऱ्यांना भात शेती करावी लागते. येत्या आठवड्यात पाऊस झाला नाही, तर दुबार पेरणी करावी लागणार. 
- नामदेव आगोंडे, शेतकरी, ता. पनवेल 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com