हिवाळ्यात जनावरांची काळजी घ्या

animal
animal

अतिथंडीमुळे होणारे दुष्परिणाम :
- अतिथंडीमुळे जनावरांचे स्नायू आखडतात. काही जनावरे लंगडतात. तसेच त्यांची त्वचा खरबरीत होते.
- बऱ्याच वेळा जनावरांचे पोट गच्च होऊन रवंथ कमी होते.
- सडावर भेगा पडून दूध काढताना रक्त येते किंवा जनावर दूध काढू देत नाही, अस्वस्थ होते.
- ऊर्जेची गरज वाढते त्यामुळे जनावरांना या काळात चाऱ्याची जास्त गरज असते. चारा कमी पडल्यास जनावर अशक्त दिसते.
- दुधाळ जनावर पान्हा व्यवस्थित सोडत नाही त्यामुळे दूध उत्पादनात घट होऊन दुधाच्या प्रतिवरही परिणाम होतो.
- शेळ्यांची करडे अाणि म्हशीची वासरं अतिथंडीमुळे गारठून मृत्युमुखी पडतात.
- हिवाळ्यात पाणी कमी पिण्यामुळे जनावरांच्या दूध उत्पादनात घट होते.
- गोठा लवकर कोरडा होत नाही. त्यामुळे दुर्गंधी उद्‌भवू शकते. दुधाळ जनावरांना दुग्धज्वर अाजार होण्याची शक्यता वाढते.

उपाययोजना :
- हिवाळ्यात उघड्या गोठ्याच्या चारही बाजूने, खिडक्यांना पोत्याचे पडदे तयार करून बांधावेत. हे पडदे रात्रभर किंवा जास्त थंडीमध्ये बंद ठेवावेत व सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत उघडे ठेवावेत. जनावरांना एकदम उघड्या गोठ्यामध्ये ठेवू नये. गोठ्यामध्ये जनावरांना उबदारपणा मिळेल यासाठी प्रयत्न करावेत. उबदारपणासाठी गोठ्यात जास्त वॅटचे बल्ब लावावेत. गोठ्यामध्ये जनावरांना बसण्यासाठी भाताचे किंवा गव्हाचे काड, भसा वापरून गादी तयार करावी.
- जनावरांना थंडीच्या काळात दुपारी ऊन असताना धुवावे. जनावरांना धुण्यासाठी शक्यतो गरम-कोमट पाण्याचा वापर करावा.
- सकाळचे व सायंकाळचे ऊन येईल अशी गोठ्याची रचना करावी.
- सडाची त्वचा मऊ राहावी, भेगा पडू नयेत, यासाठी ग्लिसरीनचा वापर करावा. सडाला भेगा पडल्यास तात्काळ उपचार करावेत.
- दूध दोहनावेळी कास धुण्यासाठी गरम-कोमट पाण्याचा वापर करावा.
- हिवाळ्यातील जास्तीच्या ऊर्जेची गरज भागवण्यासाठी जनावरांना पोषक चारा जास्त प्रमाणात उपलब्ध करून द्यावा. जास्त ऊर्जायुक्त खाद्य पदार्थांचा आहारात वापर करावा. संरक्षित स्निग्ध पदार्थांचा जनावरांच्या आहारात वापर करावा. जेणेकरून जास्तीच्या ऊर्जेची गरज पूर्ण होऊन जनावरातील अपचन टाळता येईल.
- जनावराने व्यवस्थित पान्हा सोडण्यासाठी कास धुन्यासाठी अाणि वासरांना धुन्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा. दुधाळ जनावरांना शक्यतो ज्याठिकाणी एकदम थंड वारे लागणार नाही अशा ठिकाणी ठेवावे.
- करडांना उबदारपणा मिळण्यासाठी लाकडी डालीखाली गव्हाचे काड, भाताचे तूस पसरवून किंवा पोत्यावर ठेवावे. शेडमध्ये जास्त वॅटचे बल्ब लावावेत किंवा रुम हिटरचा वापर करावा. सायंकाळी शेडमध्ये थंड हवेचा पिलांशी प्रत्यक्ष संपर्क येणार नाही याची काळजी घ्यावी. गायी-म्हशीच्या वासरांनांही ऊबदार ठिकाणी ठेवावे.
- हिवाळ्यात हवामान थंड असल्यामुळे तसेच पाणीही थंड असल्यामुळे जनावर पाणी कमी पिते. जनावरे भरपूर पाणी प्यावेत, यासाठी कोमट पाणी उपलब्ध करून द्यावे. शक्यतो दुपारच्या वेळी जनावरांना उन्हात राहता येईल अशी सोय करावी व दुपारच्या वेळेस पाणी पिण्यास द्यावे.
- बहुवर्षीय चारा पिकांची वाढ अति थंडीमुळे हळूहळू होत असल्यामुळे या काळात लसूणघास, बरसीम किंवा चवळी या हिवाळ्यात वाढणाऱ्या पिकांची लागवड करून चारा उत्पादन घ्यावे. आहारात कडबा किंवा मुरघासाचा वापर करावा.
- गोठ्यातील सांडलेले पाणी, मूत्र निघून जावे यासाठी गोठ्यातील जमिनीला उतार देऊन नाली काढावी व गोठा कोरडा करावा. सकाळी पडदे उघडून हवा खेळती राहील अशी सोय करावी.

संपर्क : डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, ९४२३८७०८६३
(पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com