जलयुक्त शिवाराच्या कामांमुळे टंचाईग्रस्त गावांना मिळतेय पाणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 जून 2017

पैठण, जि. औरंगाबाद -  उन्हाळ्यातील पाणीटंचाई म्हटले, की त्यावर मात करण्यासाठी जायकवाडी धरणाचा पाणीसाठा, असा अलिखित नियमच तयार झाला आहे. परंतु यंदा मात्र हे चित्र बदलल्याचे पाहावयाला मिळत असून तालुक्‍यात शासनाने केलेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या कामांमुळे टंचाईग्रस्त गावांना पाणी मिळत आहे. एकूण ३३ खासगी विहिरींचे अधिग्रहण त्यासाठी करण्यात आले आहे. त्यामुळे जलयुक्त शिवार ही योजना तालुक्‍याला लाभदायक ठरली आहे. 

पैठण, जि. औरंगाबाद -  उन्हाळ्यातील पाणीटंचाई म्हटले, की त्यावर मात करण्यासाठी जायकवाडी धरणाचा पाणीसाठा, असा अलिखित नियमच तयार झाला आहे. परंतु यंदा मात्र हे चित्र बदलल्याचे पाहावयाला मिळत असून तालुक्‍यात शासनाने केलेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या कामांमुळे टंचाईग्रस्त गावांना पाणी मिळत आहे. एकूण ३३ खासगी विहिरींचे अधिग्रहण त्यासाठी करण्यात आले आहे. त्यामुळे जलयुक्त शिवार ही योजना तालुक्‍याला लाभदायक ठरली आहे. 

शिवारातील खासगी विहिरींत जलयुक्तची कामे झाल्याने शेतजमिनीतील पाणी पाझरल्यामुळे ही किमया साधली आहे. तालुका प्रशासनाने अधिग्रहण केलेल्या खासगी विहिरीतून तब्बल चार लाख दहा हजार लिटर पाण्याचे टॅंकर अर्ध्या तालुक्‍याची तहान भागवत आहे. यापूर्वी दुष्काळी परिस्थितीत तालुक्‍यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच टॅंकर सुरू करावे लागत होते.  प्रारंभीच्या काळात सुरू झालेल्या टॅंकरने कधी शंभरीचा आकडा पार केला, हे तीव्र टंचाईमुळे लक्षातही येत नसे, अशी परिस्थिती तालुक्‍याने टंचाई काळात अनुभवली. त्यामुळे आता टंचाईस चांगला पर्याय मिळाल्याचा अनुभव तहसील प्रशासन व पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभाग यंत्रणेस आला आहे. 

अधिग्रहण शेती शिवारातील वाहेगाव, दादेगाव, पारुंडी, वडजी, नांदर, हर्षी, दादेगाव (बु), वडजी-चौंढाळा, पारुंडी शिवार, कापूसवाडी, नांदर शिवार गाव, दावरवाडी, गेवराई मर्दा व विहामांडवा या गावांच्या खासगी विहिरांचा त्यात समावेश आहे. 

एकूण ४३ टंचाईग्रस्त गावांना ४२ टॅंकरने पाणी सुरू केले आहे, अशी माहिती जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे सहायक अभियंता सुधाकर काकडे यांनी दिली. तसेच तालुक्‍यात आतापर्यंत जलयुक्त शिवार योजनेत  अंदाजे ९०० कामे मार्गी लागली असल्याचे तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब पायघन यांनी सांगितले.

अधिकारी, लोकप्रतिनिधी व स्वयंसेवी संस्थांचा पुढाकार
गेल्या वर्षात शासनाच्या निर्देशानुसार तालुक्‍यात जलयुक्त शिवार योजनेचा प्रारंभ झाला. २०१५-१६ या वर्षातील कामे पूर्ण झाली असून मोठ्या प्रमाणात अनेक गावांत जलयुक्त शिवार योजनेतून कृषी विभागाने बांधबंदिस्ती, नाला खोलीकरण, मातीनाला, नदी खोलीकरण, जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन व जलसंधारण विभागाने पाझर तलाव, कोल्हापुरी बंधारे दुरुस्ती, सिमेंट बंधारे दुरुस्ती इत्यादी जलस्त्रोत वाढविणारी कामे केली आहेत. यासाठी आमदार संदीपान भुमरे, तहसीलदार महेश सावंत, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भास्कर कुलकर्णी, तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब पायघन व जानकीदेवी बजाज संस्था, पाणी फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थांनी विशेष लक्ष दिल्यामुळे टंचाईसाठी ही कामे उपयोगी पडली आहेत.