पॉलिहाउसमधील ढोबळीला लाभले रंग यशाचे

श्‍यामराव गावडे 
सोमवार, 2 जानेवारी 2017

उसाच्या पट्ट्यात २० गुंठे पाॅलिहाउस उसाचेही एकरी १०० टनांपुढे उत्पादन 
आडसाली उसाचे एकरी १०० टनांपर्यंत उत्पादन तानाजी इंगळे (पुणदी, जि. सांगली) घेतातच. मात्र, शेतीत वेगळे काही करताना उसापेक्षा कमी कालावधीत काही पटींनी अधिक उत्पन्न देणारे पीक त्यांनी शोधले. २० गुंठ्यात पाॅलिहाउसमध्ये रंगीत ढोबळी मिरचीचे गुणवत्तापूर्ण उत्पादन घेत उसापेक्षा चांगल्या पटीत उत्पन्न मिळवले. यंदाही एकरी २५ टन उत्पादनाच्या उद्दिष्टासह त्यांनी या पिकाचे उत्कृष्ट व्यवस्थापन केले आहे. 

सांगली जिल्ह्यात कृष्णा नदीकाठावर असणारे पुणदी गाव (ता. पलूस) किर्लोस्करवाडीच्या औद्योगिक कारखान्यापासून सहा किलोमीटरवर आहे. हा भाग ऊस पिकाचा म्हणून ओळखला जातो. गावातील तानाजी यशवंत इंगळे यांचे पत्नी व दोन मुले असे चौकोनी कुटुंब. वडिलाेपार्जित सव्वा एकर जमीन त्यांच्या वाट्याला आली. थोडी असली तरी ही शेती ते चांगल्या प्रकारे करू लागले. हे करीत असताना गावपातळीवर इलेक्‍ट्रीक उपकरणे दुरुस्तीचेही कामही करायचे. पुढे ते काम बंद केले. स्वतःच्या शेतीच्या जोडीला काही जमिनी खंडाने केल्या. चांगल्या नियोजनामुळे शेतीतून चांगली शिल्लक राहू लागली. त्यातूनच चार एकरांपर्यंत जमीन खरेदी केली. 

ऊस शेतीत बदल 
पाच एकर क्षेत्र झाल्यावर इंगळे यांनी पारंपरिक ऊसशेतीत बदल केला व नवीन वाट चोखाळली. त्यासाठी शेतीचे सुरवातीपासून नियोजन केले. यात मातीपरीक्षणाला प्राधान्य दिले. त्यातून जमिनीला गरजेएवढीच अन्नद्रव्ये देऊ लागले. जमिनीतील सेंद्रिय कर्ब महत्त्वाचा असतो. हे महत्त्व लक्षात घेऊन तो वाढण्यासाठी ताग, धैंच्या या हिरवळीच्या खतांचा वापर सुरू केला. 

उत्पादन वाढले 
पारंपरिक पद्धतीत सुधारणा करताना रोप लावण, रुंद सरी पद्धतीही अवलंबली. तीन फूट सरीवरून ती सहा फुटांपर्यंत नेली. सुरवातीला उसाचे एकरी असलेले ८० टनांपर्यंतचे उत्पादन पुढे ९७, १०० टनांपर्यंत पोचवण्यात इंगळे यशस्वी झाले. यंदा तर त्यांनी एकरी १२३ टनांपर्यंत बाजी मारली आहे.  ऊस व्यवस्थापनात प्रामुख्याने को ८६०३२ वाणाचे आडसाली लागवड व खोडवा पीक घेतात. दोन रोपांतील अंतर दीड ते दोन फूट असते. ‘वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट’ यांच्या शिफारशीनुसार अन्नदव्यांचा वापर होतो. 

हिरव्या ढोबळी मिरचीचा प्रयोग 
उसाचे एकरी उत्पादन चांगले असले तरी त्यातून मिळणारे उत्पन्न हे एकावेळी मिळणारे आहे हे लक्षात आले. दरम्यान, इंगळे यांची दोन्ही मुले विजय व अमोल पदवीधर होऊन वडिलांना शेतीकामांत मदत करू लागली. नव्या पिढीचे विचारही नवेच असतात. त्यांनी हिरव्या ढोबळी मिरचीचे पीक घेण्याचे ठरवले. त्यानुसार दोन वर्षांपूर्वी ५० गुंठ्यांत खुल्या क्षेत्रात हे पीक घेतले. त्यातून ३० टन उत्पादन मिळाले. किलोला ४० ते ६५ रुपयांपर्यंत दर मिळाला. साधारण सव्वा आठ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. 

२० गुंठ्यात पॉलिहाउस 
या प्रयत्नातून आत्मविश्वास वाढला. त्या पुढील वर्षी म्हणजे मागील वर्षी पॉलिहाउसमध्ये लाल व पिवळ्या रंगीत ढोबळी मिरचीची लागवड करण्याचे ठरले. २० गुंठे पॉलिहाउससाठी सुमारे १७ लाख रुपये खर्च आला. उत्तमपणे पीक जोपासना करण्याची इंगळे यांची वृत्ती होती. ती या प्रयोगातही कामी आली. सुमारे ६६०० रोपे लावली. सलग ११ महिने प्लॉट चालला. २० गुंठ्यांत २३ टन उत्पादन मिळाले. 

मार्केट, दर व ताळेबंद 
मुंबईच्या दादर मार्केटची बाजारपेठ मिळाली. प्रतिकिलो ३० रुपयांपासून ते कमाल १२० रुपयांपर्यंत दर मिळाला. मुंबईला जाणाऱ्या ट्रॅव्हल्समधून ५० किलोचे बॉक्‍स पाठवले जात. व्यापारी ते मुंबईत काढून घेत. हमाली, तोलाई, वाहतुक आदी रक्कम वजा करता प्रतिकिलो ४८ रुपयांपर्यंत सरासरी मध्य दर मिळाला. एकूण उत्पन्न साधारण ११ लाख रुपयांपर्यंत मिळाले. खर्च वजा जाता पाच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न हाती राहिले. या पिकात आपण नक्की चांगले उत्पादन घेऊ शकतो, याचा विश्वास आल्यानंतर यंदा २० गुंठ्यांत २५ टन उत्पादनाचे टार्गेट ठेऊन लाल- पिवळ्या मिरचीची लागवड केली आहे. सध्या ७० दिवसांचे पीक आहे. 

प्रयोगाचे केले विश्लेषण 
इंगळे म्हणाले, की ऊसशेतीतून १७ महिन्यांच्या काळात एकरी १०० टन उत्पादनातून फार तर एक लाख ७० हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. पॉलिहाउसमधील रंगीत ढोबळी ११ महिन्यांतच त्याच्या चार ते पाचपटीने उत्पन्न देऊ शकते. खुल्या शेतातील ढोबळीपेक्षा पॉलिहाउसमधील ढोबळीचा प्लॉट जास्त दिवस चालवता येतो. गुणवत्ताही चांगली मिळते. शिवाय उत्पादनही अधिक मिळाले. कीडनाशकांच्या फवारण्याही तुलनेने कमी लागल्या. ज्यावेळी खुल्या शेतातील हिरव्या मिरचीला किलोला ६० रुपये दर सुरू होता, त्या वेळी रंगीत मिरचीला १२० रुपये दर सुरू होता, असेही त्यांनी सांगितले. 

गुणवत्तावाढीसाठी 
घरी देशी गाय. तिचे शेण, मूत्र यांचा वापर. जीवामृतावर अधिक भर. ठिबक सिंचनाद्वारेही ते फिल्टर करून दिले जाते. झाडांच्या मुळाशी ओतले जाते. त्यामुळे पानांचा व फळांचा तजेलदारपणा वाढला, असे इंगळे म्हणाले. त्यांनी पिकवलेल्या लाल मिरचीचे वजन २०० ते ३०० ग्रॅम तर पिवळ्या मिरचीचे वजन २२५ ते ३०० ग्रॅमपर्यंत मिळाले. 

आर्थिक प्रगती साधली 
इंगळे यांनी कुटुंबाच्या मदतीने शेती फुलवताना कुटुंबाची आर्थिक प्रगतीही साधली आहे. शेती उत्पन्नातून जमीन खरेदी केलीच. शिवाय टुमदार घर साकारले. ट्रॅक्‍टर खरेदी केला आहे. दोन्ही मुलांव्यतिरिक्त पत्नी सौ. गोकुळा यांचीही शेतीत मोठी मदत होते.  

शेतीत कष्ट, प्रामाणिकपणा व प्रयोगशीलता या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यातून निश्‍चित यशस्वी होता येते. 
तानाजी इंगळे 
इंगळे यांच्या शेतीतील ठळक बाबी 
-दरवर्षी मातीपरीक्षण गरजेचे. 
-उसात रुंद सरी पद्धतीचा अवलंब 
-रोपे पद्धतीने लागवड 
-जीवामृत, शेणखताच्या वापरावर भर 
-संपूर्ण क्षेत्राला ठिबक सिंचन 
-सच्छिद्र पाइपांचा वापर 

तानाजी इंगळे- ९८६०७०७२८३, ९५६१९३९६६३ 

Web Title: capsicum farming