ढगाळ वातावरणाचा स्ट्रॉबेरीला फटका 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जानेवारी 2017

सातारा : जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून ढगाळ वातावरण होऊ लागल्याने स्ट्रॉबेरी फळावर परिणाम होऊ लागला आहे. वातावरणात बदल नाही झाल्यास कमी कालवधीत लहान आकाराचीही स्ट्रॉबेरी पक्व होऊन उत्पादनात वाढ होऊन दरात घट होण्याची शक्‍यता असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. 

सातारा : जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून ढगाळ वातावरण होऊ लागल्याने स्ट्रॉबेरी फळावर परिणाम होऊ लागला आहे. वातावरणात बदल नाही झाल्यास कमी कालवधीत लहान आकाराचीही स्ट्रॉबेरी पक्व होऊन उत्पादनात वाढ होऊन दरात घट होण्याची शक्‍यता असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. 

राज्यात महाबळेश्वर तालुक्‍यात सर्वाधिक स्ट्रॉबेरीची लागवड केली जाते. मात्र मातृवृक्ष उशिरा आल्याने रोपे तयार होण्यास उशीर झाला. यामुळे स्ट्रॉबेरी हंगाम पुढे गेला आहे. तालुक्‍यातील शेतकऱ्यांना दिवाळीत मिळणाऱ्या चांगल्या दरापासून वंचित राहावे लागले होते. डिसेंबर महिन्यापासून स्ट्रॉबेरीचा हंगाम सुरू झाला असून, सुरवातीस दरही चांगले मिळाले होते. गेल्या आठ ते दहा दिवसांपूर्वी महाबळेश्वरमध्ये शून्य अंश सेल्सिअस तापमान झाल्याने स्ट्रॉबेरी फळावर काही प्रमाणात परिणाम झाला होता.

साधारणपणे स्ट्रॉबेरीला आठ ते दहा अंश सेल्सिअस तापमान फायदेशीर ठरते. तापमान कमी झाल्यास फळे चिरडण्याची किंवा आकारने लाहान राहण्याची शक्‍यता असते. या सकंटातून बाहेर पडताच ढगाळ वातावरण होऊ लागल्याने शेतकऱ्यांत अस्वस्थता वाढली आहे. ढगाळ वातावरणामुळे अपरिपक्व स्ट्राबेरीची (लहान आकाराची) फळे पिकतात. यामुळे ही फळे विक्रीसाठी शेतकऱ्यांना तोडावी लागतात. ही फळे आकाराने लहान राहिल्याने त्याचे वजन कमी येते, त्याचबरोबर त्याचा रंग फिका पडतो आणि चवीतही बदल होतो. 

तसेच कीड व रोगांचे परिणाम होण्याची शक्‍यता असते. याचा सर्वाधिक परिणाम स्ट्रॉबेरीच्या बाजारभावावर होतो. जास्त उत्पादन बाजार पेठेत आल्याने दराची घसरण होत असते. तसेच ही फळे तोडल्यामुळे फळाचे रोटेशनही खंडित होते. यामुळे बाजारपेठात स्ट्रॉबेरीची आवक अचानक कमी जास्त प्रमाणात होते. गेल्या चार दिवसांपासून अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण होऊ लागल्याने स्ट्रॉबेरीची आवक वाढू लागली आहे. आवक जास्त होऊ लागल्याने दरात घट होते. घट झालेले दर पुन्हा लवकर चढत नसल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित पैसे मिळत नाहीत. अजूनही काही प्रमाणात ढगाळ वातावरण असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अशीच परिस्थितीत राहिल्यास शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे. 

उशिरा हंगामामुळे स्ट्रॉबेरीच्या क्षेत्रात घट झाली असताना, पुन्हा ढगाळ वातावरण होऊ लागल्याने स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कोरेगाव, सातारा, वाई, जावळी तालुक्‍यांतील स्ट्रॉबेरी पिकाची काही प्रमाणात अवस्था आहे.