सेंद्रिय भातशेतीसोबतच राबविली थेट विक्रीची संकल्पना

सेंद्रिय भातशेतीसोबतच राबविली थेट विक्रीची संकल्पना

पुणे जिल्ह्यातील भोयरे (ता. मावळ) येथील रोहिदास संतू लखिमले यांनी भातशेतीत सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करतानाच थेट विक्रीचा पर्याय राबविला. सोबतच अन्य पन्नास शेतकऱ्यांसह गटाची स्थापना करीत सेंद्रिय शेती, यांत्रिकीकरणाला बळ दिले. हे सर्व शेतकरी प्रतवारी, पॅकिंग करत इंद्रायणी तांदळाची थेट ग्राहकांना विक्री करत आहेत. त्यातून पूर्वीच्या तुलनेत एकरी २० ते ४० हजार रुपये अधिक मिळत आहेत.

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका हा प्रामुख्याने भात उत्पादक पट्टा म्हणून ओळखला जातो. पारंपरिक पद्धतीने भाताची शेती करतानाही मुळातच रासायनिक पद्धतीचा अवलंब येथे कमी होतो. मात्र, अलिकडे लागवड आणि काढणीच्या काळात मनुष्यबळाची कमतरता मोठ्या प्रमाणात भासत असून, त्यावर शेतकरी यांत्रिकीकरणातून, गटशेतीतून मार्ग काढत आहेत. येथील भोयरे गावातील रोहिदास लखमिले यांनी सेंद्रिय पद्धतीचा पुरस्कार, यांत्रिकीकरण, चार सुत्री पद्धतीने लागवड यांचा वसा घेतला आहे. आपल्याबरोबरच अन्य शेतकऱ्यांनाही सोबत घेत आंदरमावळ सेंद्रिय शेतकरी गटाची स्थापना केली आहे. त्यातून थेट ग्राहकांना तांदूळ विक्रीचा पर्याय राबवला जाते. पर्यायाने गटातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये चांगली वाढ मिळवली आहे. 

भोयरे येथे रोहिदास आणि भास्कर लखिमले या बंधूंची एकत्रित २२ एकर शेती आहे. त्यात भात (६ एकर), ऊस (७ एकर), भुईमूग (१ एकर) अशी प्रमुख पिके असतात. रब्बीमध्ये घेवडा घेतात. सन २००६ पासून भात हे पीक पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने घेत आहेत. सेंद्रिय पद्धतीने पिकांचे व्यवस्थापन करण्यासाठी रोहिदास यांनी आवश्यक ती प्रशिक्षणे घेण्यास सुरवात केली. त्यात गांडुळखत, बायोडायनॅमिक खते अशा सेंद्रिय खतांची निर्मिती- वापर, विषमुक्त शेती, सेंद्रिय किंवा जैविक कीडनाशकांचा वापर याविषयी आत्तापर्यंत राज्यांतर्गत पंधरा आणि राज्याबाहेर दहा प्रशिक्षणे घेतली आहेत. यातून शिकलेल्या बाबी शेतामध्ये राबवण्यास सुरवात केली. हळूहळू २०१२-१३ पर्यंत स्वतःच्या वाट्याची अन्य पिकेही सेंद्रिय पद्धतीखाली आणली. सेंद्रिय उत्पादन घेण्यासोबतच त्याच्या विक्रीसाठीही स्वच्छता, प्रतवारी, पॅकिंग अशा घटकांवर लक्ष केंद्रित केले. 

पीकपद्धतीत सुधारणा 
प्रशिक्षणामुळे नवी दृष्टी मिळाली. त्यातून शेतामध्ये नव्या पद्धतीचा अवलंब सुरू केला. गेल्या चार वर्षांपासून पारंपरिक भात लागवडीऐवजी चार सूत्री लागवड पद्धतीचा वापर करतात. भाताच्या पुनर्लागवडीसाठी मनुष्यबळाची कमतरता जाणवत असल्याने गेल्या दोन वर्षांपासून यंत्राचा वापर सुरू केला. चार सूत्री पद्धतीमुळे पिकांची जोमदार व निरोगी वाढ होऊन, पूर्वीच्या तुलनेमध्ये उत्पादनामध्ये सात ते आठ क्विंटलने वाढ झाल्याचे रोहिदास सांगतात. मात्र, काही शेतीमध्ये वाहत्या पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने रोपे मरण्याचे प्रमाण अधिक राहते. अशा ठिकाणी एका चुडामध्ये अधिक रोपांची लागवड करावी लागते.

थेट विक्रीला मिळाले यश
चार वर्षांपूर्वी ते बाजारसमितीमध्ये भाताची विक्री करत, त्यामुळे सेंद्रिय भात असूनही दर अन्य भाताप्रमाणेच (प्रतिकिलो ३० ते ३५ रुपये) कमी मिळत असे. त्यावर मात करण्यासाठी त्यांनी थेट तांदूळ विक्री करण्याचा निर्णय घेतला. पूर्ण पॉलिश आणि ब्राऊन राईस अशा दोन प्रकारामध्ये ते विक्री करतात. प्रतवारीनंतर एक, दोन, पाच, पंचवीस किलो अशा वजनामध्ये पॅकिंग करतात. सेंद्रिय ब्राऊस राईसला प्रतिकिलो ६० रुपयांपर्यंत दर मिळू लागला. आता पुणे व मुंबई येथील अनेक ग्राहक कायमस्वरूपी जोडले गेले आहेत. पुणे शहरातून ब्राऊन राईसला चांगली मागणी असल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदवले.

गटातील पन्नास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले
गटातील शेतकरी नाचणी, तांदूळ, वरई, मोहरी, कडधान्ये अशी पिके घेतात. उत्पादन विक्रीसाठी भीमथडी, कृषी महोत्सव, तांदूळ महोत्सवामध्ये सहभाग घेतात. शेतीमालाची थेट ग्राहकांना विक्री करत असल्याने आत्तापर्यत पुणे, मुंबई येथील सुमारे दोन हजार ग्राहक या गटाशी जोडले आहेत.
   २०१५-१६ मध्ये रोहिदास यांनी स्वतःचा २ टन तांदूळ थेट विकला. त्यानंतर २०१६-१७ मध्ये गटातील शेतकऱ्यांचा सुमारे ७ टन तांदळाची विक्री झाली, तर २०१७-१८ मध्ये सुमारे ९ टन तांदळाची विक्री झाली. 
या पद्धतीमुळे गटाला प्रति किलो २० ते ३५ रुपयांचा अधिक दर मिळाला. 

आम्ही सेंद्रिय शेतकरी गट तयार केल्यामुळे थेट विक्रीला चालना मिळत आहे. भात शेतीमध्ये यांत्रिकीकरण व चारसूत्रीचा वापर करतो. भाताला फुटवे अधिक येत असून, उत्पादनात भरघोस वाढ झाली. पूर्वी भातापासून एकरी पंचवीस हजार रुपये उत्पन्न मिळत असे, ते वाढून आता ८५ हजार रुपयांपर्यंत पोचले आहे. 
- जालिंदर रामभाऊ आडीवळे, रायबा महादू भोईरकर

गटामध्ये एकमेकांच्या सहकार्याने सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करतो. चारसूत्री पद्धतीने गेल्या वर्षी केलेल्या भात लागवडीतून एका गुंठ्यात ९३ किलो ८०० ग्रॅम उत्पादन घेतले. त्यामुळे हुरुप वाढला आहे. सेंद्रिय उत्पादनाच्या विक्रीचेही गणित बसत आहे. 
- वासुदेव पांडुरंग लखिमले

पूर्वी ३५ ते ४० रुपये प्रतिकिलो दराने तांदूळ विकत होतो. आता गटाद्वारे तांदळाची थेट विक्री करत असल्याने ५० ते ६० रुपये प्रतिकिलो दर मिळतो. परिणामी, उत्पन्नात चांगली वाढ झाली. 
- तानाजी महादेव आडीवळे

सेंद्रिय शेतीगटाची बांधणी
दोन वर्षांपूर्वी कृषी विभागाच्या आत्माअंतर्गत सेंद्रिय शेतीची शेतकरी गटाची संकल्पना रोहिदास लखिमले यांनी पुढाकार घेत राबवली. परिसरातील भोयरे, कशाळ, कल्हाट आणि फळणे या गावातील भात उत्पादक पन्नास शेतकऱ्यांचा गट स्थापन केला. त्याला ‘आंदरमावळ सेंद्रिय शेती गट’ असे नाव दिले. यात प्रतिशेतकरी मासिक शंभर रुपयांची बचत केली जाते. या गटांतर्गत सेंद्रिय पद्धतीचे कटाक्षाने पालन केले जाते. शेतकऱ्यांच्या सेंद्रिय पद्धतीवर सहा शेतकऱ्यांची समिती लक्ष ठेवून असते. त्यात सेंद्रिय खताचे उत्पादन, वापर, निंबोळी अर्क, अन्य अर्क यांची वापराच्या नोंदी तपासल्या जातात. याबरोबरच माल वाहतूक, लेबल छापणे, शेतकरी अभ्यास दौरा असे विविध उपक्रम गटाद्वारे राबवले जातात. गटाला आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक राहुल घोगरे, सुधाकर मोरे, एस. एस. ताकवले यांचे मार्गदर्शन मिळते. 

यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवडीवर भर - भात लागवडीसाठी मनुष्यबळाची अडचण येत असे. आता गटातील शेतकरी कुंडलिक जोरी यांनी २.६ लाख रुपये खर्चून भात पुनर्लागवड यंत्र खरेदी केले. गेल्या वर्षी गटातील शेतकऱ्यांनी २७ एकरवर त्याचा वापर केला. या वर्षी १० एकरवर लागवड करण्यात आली. भाड्याने यंत्राचा वापर केल्याने मनुष्यबळाच्या तुलनेत खर्चात बचत झाली. यंत्रामुळे अंतर योग्य राहून प्रति चूड ४५ ते ४५ फुटवे आल्याचा अनुभवही शेतकरी सांगतात.
गेल्या दोन वर्षांपासून गटातील शेतकऱ्यांच्या तांदूळ विक्रीसाठी रोहिदास प्रयत्न करत आहेत. त्यातून शेतकऱ्यांनाही २० ते ३५ रुपयांपर्यंत फायदा होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com