कापूस उत्पादकतेत चीनची आघाडी

Cotton-Production
Cotton-Production

जळगाव - कापूस लागवडीत जगात क्रमांक एक असलेल्या भारताची सरत्या कापूस हंगामातील उत्पादकता पाकिस्तान, इजिप्त, कझाकिस्तानसारख्या देशांपेक्षा कमी राहिली असून, ती प्रतिहेक्‍टरी ५३३ किलो रुई एवढी आहे. जगात सर्वाधिक १६७६ एवढी कापूस उत्पादकता चीनने साध्य केल्याची माहिती समोर आली आहे. 

देशात मागील हंगामात (२०१७-१८) १२२ लाख हेक्‍टरवर कापसाची लागवड झाली होती. तर सुमारे ४०९ लाख गाठींचे उत्पादन अपेक्षित होते. परंतु महाराष्ट्र, तेलंगणासारख्या आघाडीच्या कापूस उत्पादक राज्यांमध्ये गुलाबी बोंड अळीने कहर केल्याने उत्पादकतेवर परिणाम झाला. फक्त उत्तरेकडील (नॉर्थ झोन) व गुजरातेत उत्पादन बरे आले आहे. या कारणांमुळे देशाची उत्पादकता ६०० किलो रुई प्रतिहेक्‍टरीवरून घसरून ती ५५० किलो रुई प्रतिहेक्‍टरीपर्यंतही पोचू शकलेली नाही.

पाकिस्तानात २४ लाख हेक्‍टरपर्यंत क्षेत्र होते. त्यांची उत्पादकता ६६६ किलो रुई प्रतिहेक्‍टरी राहिली आहे. तेथे कापूस वाणांचे तंत्रज्ञान स्वातंत्र्य असल्याने उत्पादकता मागील पाच वर्षे व्यवस्थित राहिल्याची माहिती जाणकारांनी दिली. तर कापूस उत्पादन, लागवड यासाठी मागे असलेल्या व लहान देश म्हणून जगभर ओळख असलेल्या कझाकिस्तान, इजिप्त या देशांची कापूस उत्पादकताही भारतापेक्षा अधिक राहिली आहे. 

चीनने आपल्या सरळ वाणांसंबंधी केलेल्या सकारात्मक कार्यवाहीमुळे उत्पादकता चांगली राखली असून, ती १६७६ किलो रुई प्रतिहेक्‍टरी एवढी आहे. चीनपाठोपाठ ऑस्ट्रेलियाची उत्पादकता बोलगार्ड ३ तंत्रज्ञानामुळे १६७० किलो रुई प्रतिहेक्‍टरी राहिली आहे. ब्राझीलमध्येही सरळ वाणांमधील प्रभावी संशोधनातील सातत्याने १६२९ किलो रुई प्रतिहेक्‍टरी, अशी उत्पादकता साध्य झाली आहे. विशेष म्हणजे कापड उद्योगात अग्रगण्य असलेल्या तुर्कीची उत्पादकता १६७४ किलो रुई प्रतिहेक्‍टरी राहिली आहे.

देशात महाराष्ट्रात कापसाबाबत प्रतिकूल स्थिती असली तर जागतिक कापूस उत्पादकतेला फटका बसतो. महाराष्ट्राची उत्पादकता २०१६-१७ च्या हंगामापेक्षा कमी झाली आहे. २०१७-१८ मध्ये हेक्‍टरी सुमारे ५० किलो रुई प्रतिहेक्‍टरी, अशी कापूस उत्पादकता घसरली आहे. ३५ मिलीमीटर लांब धाग्याचा कापूस देशात अपवादाने मिळतो. तो अमेरिका, ऑस्ट्रेलियातून मिला किंवा सूतगिरण्यांना आणावा लागतो. 
- राजाराम पाटील, कार्यकारी संचालक, लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणी, शहादा (जि. नंदुरबार)

लांब धाग्याचा कापूस उत्पादनाचा काही देशांना लाभ
अमेरिका, ऑस्ट्रेलिया व तुर्की या देशांमध्ये पिमा व गिझा प्रकारच्या कापसाचे उत्पादन घेतले जाते. ते जगात इतरत्र होत नाही. त्याचा लाभ या देशांना निर्यातीसाठी होतो. भारतात दरवर्षी किमान सहा ते सात लाख पिमा व गिझा प्रकारच्या गाठी वस्त्रोद्योगात घेतल्या जातात. लांब धाग्याचा (३५ मिलीमीटर) कापूस म्हणून पिमा व गिझाची ओळख आहे. त्याचे मोठे उत्पादन हे तिन्ही देश दरवर्षी घेतात व त्याची मोठी निर्यात ते जगात करतात. भारतात फक्त मध्य प्रदेशात डीसीएच ३२ या गाठींमध्ये ३४ ते ३५ मिलीमीटर लांब धागा मिळू शकतो. सरळ वाणांच्या माध्यमातून त्याचे उत्पादन तेथे घेतात. या कापसाच्या खंडिला (३५६ किलो रुई) सध्या ५५००० ते ५८००० रुपये दर आहे. परंतु, त्यासंबंधीचे क्षेत्र व उत्पादनही अतिशय कमी आहे, अशी माहिती मिळाली.

जागतिक उत्पादकतेवर परिणाम
जागतिक कापूस उत्पादकता ७८४ किलो रुई प्रतिहेक्‍टरी, एवढी निश्‍चित होती. मागील हंगामात अमेरिकेतील इरमा वादळ, भारतातील प्रमुख कापूस उत्पादक राज्यांमधील गुलाबी बोंड अळीचे संकट आदींमुळे जागतिक कापूस उत्पादकतेसंबंधी घसरण झाली आहे. भारतीय कापूस व्यापार, व्यवसाय यासंबंधीच्या संघटनांच्या अंदाजानुसार जागतिक कापूस उत्पादकता आठ ते १० टक्‍क्‍यांनी घटली आहे. नेमके आकडे हंगामाच्या अखेरिस म्हणजेच ३० सप्टेंबर २०१८ नंतर समोर येतील, असे सांगण्यात आले.

चीन, बांगलादेश मोठे आयातदार
जगात सर्वांत मोठे कापूस निर्यातदार म्हणून अमेरिका, ऑस्ट्रेलिया हे देश आघाडीवर आहेत. अमेरिका, ऑस्ट्रेलिया व युरोपात सूतगिरण्या, कापड उद्योगासाठी हवे तेवढे मजूर, तशी यंत्रणा नाही. अधिक मजूर आशिया खंडात वस्त्रोद्योगाला मिळतात. त्यामुळे चीन, भारत व बांगलादेशात मिल, वस्त्रोद्योग मोठा आहे. अर्थातच चीन व बांगलादेश हे आघाडीचे कापूस आयातदारही आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com