कापसाच्या दरात मोठी घसरण होण्याची शक्यता नाही

Cotton
Cotton

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या किमती कमी झाल्या असल्या तरी दीर्घ कालावधीचा विचार करता दरात मोठी घसरण होण्याची शक्यता नाही. भारतातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना यंदा कापसातून चांगला मोबदला मिळण्याची शक्यता असली तरी यंदा कापसाची लागवड घटण्याची चिन्हे आहेत. गेल्या वर्षी बीटी कापसावर बोंडअळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले. त्यामुळे यंदा कापसाचा पेरा घटण्याची शक्यता आहे.

कापसाच्या दरात गेल्या काही दिवसांत दिसून आलेली तेजी आता काहीशी कमी झालेली दिसते. आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिका आणि चीन या प्रमुख देशांत कापसाचे दर काही प्रमाणात रोडावले आहेत. कापसाच्या दराच्या बाबतीत मूलभूत घटकांव्यतिरिक्त निसर्ग आणि सरकार यांची भूमिका कळीची ठरत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरात घट होण्याची प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे -
    अमेरिकेतील पश्चिम टेक्सास भागात पावसाचे आगमन झाल्यामुळे कापसाच्या पिकासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे यंदा पीकपाणी चांगले राहील, अशी भावना बळावली आहे. त्याचा परिणाम कापूस बाजारावर झाला.

    फंड हाऊसनी कापसाच्या सट्टा स्थितीमध्ये बदल केला.

    चीनमध्ये कापूस उत्पादनात घट होईल आणि पर्यायाने कापसाचा साठा सरासरीपेक्षा कमी राहील, असे चित्र निर्माण झाल्यामुळे मे महिन्याचा दुसरा आठवडा ते जूनअखेर या कालावधीत कापसाचे दर चढे राहिले. पंरतु आता कापसाचे भाव वेगाने कमी झाले. 

चीनने २०१७-१८ च्या हंगामासाठी अमेरिकेतून ६ लाख १० हजार टन कापूस आयात करण्याचे करार केले. प्रत्यक्षात ५ लाख ७ हजार टन कापूस आयात करण्यात आला. चीनने २०१८-१९ या हंगामासाठी अमेरिकेतून ३ लाख ७० हजार टन कापूस खरेदी करण्याचे करार केले आहेत. परंतु सध्या अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापारयुद्ध सुरू असल्यामुळे चीन अमेरिकेकडून करणार असलेल्या कापूस आयातीत कपात होण्याची शक्यता आहे. चीनने अमेरिकेतील कापसावर २५ टक्के शुल्क लावल्यामुळे अमेरिकेसाठी कापूस चीनला निर्यात करणे किफायतशीर व व्यावहारिक ठरणार नाही. त्यामुळे सुमारे ८० हजार ते १ लाख टन कापसाच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चीन आणि अमेरिका यांच्यात चर्चा आणि वाटाघाटीचे फलित काय निघते यावर पुढची गणिते अवलंबून आहेत. येत्या काही दिवसांत यासंबंधीचे चित्र स्पष्ट होईल.

अमेरिकी कृषी विभागाच्या (यूएसडीए) अंदाजानुसार २०१८-१९ मध्ये कापसाचा जागतिक पातळीवरील साठा गेल्या वर्षीच्या तुलनेत ६ टक्के घटण्याची शक्यता आहे. चीनने आपल्याकडील कापसाचा प्रचंड साठा कमी करण्यासाठी सरकारी धोरणांमध्ये बदल केल्यामुळे जागतिक कापूस साठा कमी होणार आहे.

अमेरिकेत वायदे बाजारात कापसाच्या किमतीत घसरण झाली असून हजर बाजारातही दर उतरले आहेत. परंतु कापसाच्या दरातील घसरण मर्यादित असून दीर्घ कालावधीचा विचार करता मोठी पडझड होण्याची शक्यता नाही. त्याची प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे -
    भारतात कापसाचा साठा मर्यादित आहे. नवीन हंगाम तीन महिन्यांनंतर सुरू होईल.
    भारतात पाऊस आणि कापूस पेरणीचा अहवाल अजूनही समाधानकारक नाही. कापूस पेरा घटण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत.
    देशातील बहुतांश मिल्समध्ये केवळ ६० दिवस पुरेल इतकाच कापसाचा साठा आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये कापसाची कमतरता जाणवण्याचे संकेत मिळत आहेत.
    अमेरिकी डॉलर आणखी मजबूत झाला आहे. त्यामुळे निर्यातीत वाढ होईल आणि आयात रोडावेल. त्यामुळे उपलब्ध कापूस साठ्यावर दबाव येणार आहे.       
भारतातील जीनर्सना खात्री आहे की, यंदाच्या हंगामात कापसाच्या दरात मोठी तेजी राहण्याची शक्यता आहे. परंतु सरकारची धोरणे आणि निसर्गाची वाटचाल या बाबी महत्त्वपूर्ण ठरतील, यात शंका नाही.
(लेखक कापूस बाजार विश्लेषक असून `कॉटनगुरू`चे प्रमुख आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com