दुष्काळातही विस्तारला देशी गोपालन व्यवसाय

Varsha-Nichal
Varsha-Nichal

कायम दुष्काळी खानापूर तालुक्यातील अडसरवाडी (जि. सांगली) येथील निचळ कुटुंबाने बाजारपेठ व ग्राहकांची गरज अोळखून पारंपरिक देशी गोपालन व्यवसायाची वृद्धी केली. हिरानंदिनी गो शाळा उभारली. दुधाबरोबर तूप, ताक, गोमूत्र, अर्क, धूपकांडी, दंतमंजन आदींचे उत्पादन घेत बाजारपेठही मिळवली. नैसर्गिक शेती, ऊस व गूळविक्री आदी विविध प्रयत्नांतून शेतीतील प्रगती दुष्काळातही सुरू ठेवली आहे.

सांगली जिल्ह्यातील खानापूर हा दुष्काळी तालुका. या भागात द्राक्षाचे क्षेत्र अधिक आहे. येथील शेतकरी परदेशात द्राक्षनिर्यातीसाठीदेखील अोळखले जातात. खानापूरपासून जवळ असलेल्या अडसरवाडी (ता. खानापूर) येथे निचळ कुटूंब राहते. बाळासाहेब निचळ (दादा) ही कुटुंबातील व्यक्ती पंचक्रोशीत प्रसिद्ध होती. सहा महिन्यांपूर्वी त्यांचे निधन झाले. सध्या त्यांची मुलगी वर्षा व पुतण्या नवीन व अन्य शेतीची जबाबदारी पाहतात. 

कुटुंबाची शेतीपद्धती 
निचल कुटूंब गलईचा (सोने, चांदी) व्यवसायात कार्यरत आहे. एकत्र कुटुंबात १७ सदस्य आहेत. चार सदस्य केरळ येथे हा व्यवसाय सांभाळतात. पूर्वी सात एकर शेती होती. व्यवसायातून टप्प्याटप्प्याने विकत घेत ती आज ५० एकर झाली आहे. खिलार गायींचा पारंपरिक व्यवसाय आहे.  देशी गाई दावणीला असल्यानं शेती सेंद्रिय आहे. या भागात पाणीटंचाई आहे. टेंभू योजनेचे पाणी येईल, अशी कुटुंबाला प्रतीक्षा आहे.  

संकटांशी सामना 
द्राक्षाची सात एकर बाग होती. उपलब्ध पाण्याचा काटेकोर वापर करून द्राक्षशेती केली जायची. उत्पन्नही चांगले मिळायचे. सन २००४ पासून लागोपाठ अवकाळी पावसाने व गारपिटीने होत्याचं नव्हतं केल. त्यात कर्जाचा डोंगर उभा राहिला. म्हशी, जर्सी गायी विकून कर्ज भागवलं. त्या वेळी बाळासाहेब हताश झाले. साधारण २०१० मध्ये खानापूर शहरात असलेलं वास्तव्य सोडून शेतात राहण्याचा निर्णय घेतला. दरम्यान गलईचा व्यवसाय बंद केला. शेती मात्र हिंमतीने टिकवली. तीच वाढवण्याचा निर्णय घेतला.

देशी गोपालन व्यवसायवृद्धी 
दरम्यान, मित्र बालाजी शिरतोडे यांनी बाळासाहेबांना देशी गोपालन व्यवसायाचीच वृद्धी करण्याचा सल्ला दिला. त्यातील विविध पूरक उत्पादनांना बाजारपेठ असल्याचं सांगितलं.  त्यानुसार बाळासाहेबांनी व्यवसायाचा अभ्यास केला. दक्षिणेकडील कांचीपूरम येथे अभ्यासक्रम  पूर्ण केला. गोमूत्र अर्क, भस्म, साबण अशा उत्पादनांची निर्मिती सुरू केली. त्यात गोडी लागली. त्यांनी मग घरातील नव्या पिढीलाही या अभ्यासक्रमाबाबत सांगितलं. त्यानुसार प्रमोद, नवीन, संदीप, वर्षा, दीपाली आणि प्रदीप या भावंडांनी त्याचं शिक्षण घेऊन वडिलांचा वारसा चालवण्यास सुरवात केली. 

गूळनिर्मिती 
केवळ जनावरांसाठी ऊस न ठेवता त्यातून गूळ निर्मिती केली तर नक्कीच फायदा होऊ शकतो असा विचार आला. सेंद्रिय पद्धतीचाच ऊस होता. बाजारपेठेची मागणी अोळखून गुळाची मागणी लक्षात आली. दोन वर्षांपासून त्याचे उत्पादन सुरू केले आहे. जागेवरूनच विक्री होते. 

नव्या जोमाने द्राक्ष लागवड 
खानापूर हा निर्यातक्षम द्राक्षाचा पट्टा आहे. आता शेतीत स्थिरता येऊ लागल्यानंतर निचळ यांनी पुन्हा मागील वर्षी नव्या जोमाने द्राक्षाची लागवड केली आहे. याचे त्यांना समाधान आहे. 

दुष्काळात लढायला शिकवलं
नव्या पिढीतील वर्षा म्हणाल्या, की दुष्काळात लढायला घरातील वडीलधाऱ्यांनी शिकवलं. त्यांनी शिकवलेल्या मार्गावरून चालतो आहे. जनावरांच्या चाऱ्यासाठी उसाची विक्री घरी पूर्वीपासून होते. अाधी चारा घेऊन जा, पैशाचं नंतर पाहू असं शेतात आलेल्या पशुपालकांना सांगणारे आमचे वडील होते. माणसातला देव ओळखण्याची शक्ती त्यांनी दिली हे सांगताना त्यांचे डोळे भरून आले. 

आयुर्वेदाचं महत्त्व  
घरासमोर आंब्याच्या झाडाखाली खुर्च्या ठेवल्या आहेत. शेतातच घर असल्यानं देशी गायीवर आधारित पूरक उत्पादने घेण्यासाठी ग्राहकांची कायम वर्दळ असते. आलेल्या प्रत्येकाचं स्वागत आयुर्वेदीक काढा आणि गूळ देवून केलं जात. सेंद्रिय गुळाचं आणि काढ्यातील सर्व औषधी घटकांचे महत्त्व येणाऱ्या प्रत्येकाला सांगितलं जातं.  

निचळ यांची शेती व व्यवसाय वैशिष्ट्ये 
- सध्या २५ खिलार गायी. त्यांची चौथी पिढी. 
- सकाळी पाच वाजता कामांना सुरवात  
- दूध, तूप, गोमूत्र, अर्क, दंतमंजन, साबण, धूपकांडी, सेंद्रिय गूळ आदींची निर्मिती 
- सकाळी गायी डोंगरावर चरण्यासाठी नेल्या जातात. त्या पौष्टीक झाडपाला खातात. 
- गायींची  रोगप्रतिकारशक्तीही वाढण्यास मदत होते. 
- सहा एकर ऊस, चिकू ८५ झाडे, द्राक्षे अडीच एकर, उर्वरित शेतात गहू, कांदा, ज्वारी 

दिवसाची सुरवात यशकथा वाचून 
पहिल्या दिवसापासून ॲग्रोवनचे वाचक आहोत. दिवसाची सुरवात यशकथा वाचूनच होते. त्यातील शेतकऱ्यांचे प्रयोग वाचून, त्यांच्याशी बोलूनच अनेक प्रयोग केले. ॲग्रोवन घरातील सदस्यच आहे. 
- संदीप व नवीन निचळ 

- नवीन विश्‍वास निचळ, ९५५२८७२८०४  
- वर्षा बाळासाहेब निचळ, ९९२३५७०५४७  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com