हरभऱ्याची 'तूर' होवू नये यासाठी...

Gram
Gram

येत्या हंगामात सुमारे शंभर लाख टनावर हरभरा उत्पादन अपेक्षित आहे. दरवर्षी दहा लाख टनापर्यंत आयात करावी लागत होती, ती वेळ आता येणार नाही. मात्र, ऐन हंगामात होणारी आवक थोपवण्यासाठी शेतकऱ्यांना आधारभावाद्वारे आश्वस्त करावे लागणार आहे...

यंदा हरभरा उत्पादनात अपेक्षित मोठी वाढ, शिल्लक मालाचे प्रमाण आणि देशांतर्गत वार्षिक खप या तीन घटकांमुळे हरभऱ्याचा बाजार गेल्या दोन वर्षांइतका किफायती राहणार नाही असे दिसते. त्याचा पडताळा एनसीडीईएक्स या वायदे बाजारातील व्यवहारांतही दिसतोय. मार्च 2018 वायदा आजघडीला 4 हजार रु. प्रतिक्विंटलच्या आसपास ट्रेड होत आहे.

देशातील सर्वाधिक हरभरा पिकविणाऱ्या मध्य प्रदेशातून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून नवी आवक सुरू होईल, तर मार्चच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्राच्या बाजारात आवक वाढेल. सुमारे चार महिने कालावधीचे पीक असलेल्या हरभऱ्याचा मुख्य आवक हंगाम सुरू होण्यास ९० दिवसांचा कालावधी असताना किंवा अजूनही लेट पेरा सुरू असताना इतक्या मोठ्या प्रमाणात बाजारभाव कोसळण्यामागची कारणे समजून घेऊया.

केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या १ डिसेंबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार यंदा मागील वर्षाच्या तुलनेत हरभरा लागवडीत ७.८ टक्के वाढ आहे. अजूनही लेट पेरा सुरू असून, पुढील पंधरवड्यापर्यंत आजवरचा सर्वाधिक पेरा होण्याची शक्यता दिसतेय. देशात २०१६ मध्ये ७८ लाख हेक्टर, तर २०१५ मध्ये ६८ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरा झाला. २०१६ मध्ये तापमानवाढीमुळे दहा वर्षांतील सर्वांत कमी म्हणजे सुमारे ७० लाख टन उत्पादन मिळाले.

देशाची गरज सुमारे ९५ लाख टन असताना, २५ लाख टनांची तूट कॅलेंडर वर्ष २०१६ मध्ये निर्माण झाली. २०१५-१६ मधील १० लाख टन आयातीच्या माध्यमातून ही तूट कमी होणारी नव्हती. त्यामुळे देशांतर्गत हरभऱ्याचा बाजारभाव इतिहासातील विक्रमी १० हजार रुपये प्रतिक्विंटलच्या पातळीपर्यंत पोचला होता. विशेष म्हणजे मे २०१६ पर्यंत शेतकऱ्यांचा माल विकला गेल्यानंतर पुढे बाजारभावात १०० टक्क्यांची वाढ झाली. स्टॉकिस्ट मंडळींनी यात मोठा पैसा कमवला. कॅलेंडरवर्ष २०१७ च्या मार्चमध्ये पुरवठ्याचे चित्र सुधारले होते. उत्पादन ७० लाख टनांवरून ९३ लाख टनांपर्यंत सुधारले होते.

पण तरीही बाजारभाव आधारभावाच्या खाली गेले नाहीत. देशांतर्गत पाइपलाइनमध्ये १५ लाख टनांची तूट, आधीच्या तेजीमुळे शेतकऱ्यांकडील स्टॉकमध्ये वाढ, स्टॉकिस्टकडून खरेदीत वाढ आदी कारणांमुळे हंगामाची सुरवात चांगली झाली होती. मात्र, पुढे ऑगस्टनंतर बाजार उतरणीला लागला. बाजारभाव ५५०० वरून आजघडीला ४२०० रुपयांपर्यंत नरमला आहे.
मार्च २०१६ ते ऑक्टोबर २०१७ असे १८ महिने हरभऱ्याचा बाजार शेतकऱ्यांसाठी किफायती ठरला.

चार हजारांचा टप्पा कधीही न ओलांडलेल्या बाजाराने एकदम दहा हजाराला स्पर्श केला. त्यामुळे हरभऱ्यात शेतकरी गुंतवूणक वाढवणार हे स्पष्ट होते. तशी त्याची सुरवात मागच्या वर्षांपासूनची झाली होती आणि उत्पादनही उच्चांकी मिळाले. पण, वर उल्लेख केल्याप्रमाणे तूट भरून काढण्यात उत्पादनवाढीचा मोठा भाग खर्ची पडला. तसेच स्टॉकवाढीला प्रोत्साहन मिळाले, त्यामुळे मार्च २०१७ चा हंगाम सुरू झाल्यानंतर सहा महिन्यांपर्यंत बाजार किफायती राहिला. तथापि, यंदाचे पाऊसमान आणि आजघडीला पेरणी क्षेत्र वाढल्याचे आकडे आल्यामुळे बाजाराने दम तोडला आहे. याशिवाय, २०१६-१७ मध्ये दहा लाख टन हरभरा आयात झाल्याचे सरकारी अहवालात म्हटले आहे. एकूणच नवे पीक येईपर्यंत देशांतर्गत पुरवठा चांगला राहणार असल्याने बाजारात नरमाई राहणार आहे. अजूनही काही शेतकरी आणि स्टॉकिस्टकडे माल शिल्लक आहे.

पुढील ९० दिवसांत पिकास अनुकूल वातावरण राहिले तर बाजार संभाव्य उत्पादनवाढ डोळ्यासमोर ठेऊन दबावत राहणार हे उघड आहे. किमान आधारभूत किमतीच्या खाली बाजारभाव जाईल का, हे इतक्यातच सांगणे घाईचे होईल. सरकारने मटारच्या आयातीवर ५० टक्के कर लावल्यामुळे हरभराडाळीतील स्वस्त भेसळीला आळा बसेल. या माध्यमातून हरभऱ्याला मागणीला आधार मिळणार आहे. आणखी एक अनुकूल बाब अशी, की हरभऱ्यावरील निर्यातबंदी मागे घेण्यात आली आहे. देशांतर्गत बाजारभाव आंतरराष्ट्रीय आयात पॅरिटीच्या आसपास जाण्याची शक्यता, ड्यूटीरूपाने आयातीवरील प्रतिबंध आदी कारणांमुळे २०१८ मध्ये देशाबाहेरून मालास येण्यास आडकाठी असेल.

दरवर्षी हरभऱ्याची मागणी चार टक्क्यांनी वाढतेय. आजघडीला देशाची वार्षिक गरज सुमारे १०० लाख टन आहे. येत्या काढणी हंगामापर्यंत हवामान अनुकूल राहिले तर साधारण तेवढेच उत्पादन मिळू शकेल. टप्प्याटप्प्याने माल बाजारात आल्यास बाजारभावाला आधार मिळेल. मात्र, संभाव्य मंदीच्या शक्यतेमुळे घबराटीने विक्री (पॅनिक सेलिंग) सुरू झाली, तर तुरीमध्ये ज्याप्रमाणे सरकारी खरेदी झाली तशीच व्यवस्था हरभऱ्याबाबत करणे क्रमप्राप्त ठरेल. मात्र, गेल्या वर्षी तूर खरेदी मोठा विलंब लावल्याने आणि शेतकऱ्यांना वेळेवर आश्वस्त न केल्यामुळे  आधारभावाखील विक्री करावी लागली होती. तसे हरभऱ्यात घडू नये यासाठी आतापासूनच काळजी घेतली गेली पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com