पैसा असूनही लाचार होण्याची वेळ

raghunath-sonawane
raghunath-sonawane

जळगाव जिल्ह्यात तापी नदीच्या काठावर वसलेलं रिधुर हे जेमतेम १२०० लोकवस्तीचं गाव. ट्यूबवेलच्या पाण्यावर केळी, कापूस, मका आणि सोयाबीनसारख्या नगदी पिकांचं विपुल उत्पादन इथले शेतकरी घेतात. तापीकाठावरचा गाळ मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने वीटभट्टी व्यवसायसुद्धा इथं बऱ्यापैकी स्थिरावलाय. अर्थात, वीटभट्ट्यांचे मालक बहुतांश शेतकरीच आहेत. बागायती शेती आणि वीटभट्ट्यांमुळे गावात बाराही महिने चलनवलन सुरू असतं. त्याद्वारे बऱ्यापैकी आर्थिक उलाढालही होते. शेतकरी, शेतमजूर, व्यावसायिक यांच्या चेहऱ्यावर कायम समाधानाचं हसू दिसून येतं. नोटाबंदीचा निर्णय लागू होईपर्यंत रिधुरमध्ये कोणाला कशाची कधी चिंता नव्हती. मात्र, नोटाबंदीच्या निर्णयानंतर रिधुरमध्ये अशी काही परिस्थिती निर्माण झालीय, की समाजाचा प्रत्येक घटक त्यात पोळला जातोय. कमी- अधिक प्रमाणात सर्वांनाच नोटा टंचाईची झळ सोसावी लागतेय. गावात सहकारी किंवा राष्ट्रीयीकृत बॅंकेची शाखा नसल्याने गावकऱ्यांना चोहोबाजूंनी हेटाळणी सहन करावी लागतेय.

उधार, उसनवारीची सोय नाही...
‘केंद्र सरकारच्या नोटाबंदी निर्णयाचे पडसाद शहरांप्रमाणे ग्रामीण भागातही उमटले आहेत, किंबहुना नोटा रद्द झाल्याची सर्वाधिक झळ खेडेगावात वास्तव्य करून राहणाऱ्यांना बसलीय. शेतात, वीटभट्टीवर मिळेल तिथे रोजंदारीवर काम करून दोनवेळचं पोट भरणाऱ्या मजुरांची परिस्थिती आर्थिक नाकाबंदीनंतर जास्तच बिकट झाली आहे. आठवड्यातून एकदा हक्काने मिळणारी मजुरी देण्यासाठी शेतमालकाकडे रोख पैसे नाहीत म्हटल्यावर दोनवेळचं पोट भरण्याचेही आता वांदे झाले आहेत. कोणाकडे उधार किंवा उसनवार मागायची सोय राहिलेली नाही. किराणा दुकानदाराचेही पुरेशा पैशांअभावी हात बांधले गेले आहेत. पोटाला चिमटा देऊन बॅंकेत थोडीफार जमा पुंजी शिल्लक टाकली होती. मात्र, हक्काचे पैसे असूनही बॅंकेत गेल्यावर चोर असल्यासारखं उभं राहावं लागतंय. अर्धाअधिक दिवस रांगेत उभं राहिल्यानंतरही बॅंकेतून पैसे मिळण्याची खात्री नसते. रोजच्या त्रासाने जीवन जगणं कठीण होऊन बसलंय,’ यशवंत पाटील काकुळतीला येऊन सांगत होते. 

अडला नारायण व्यापाऱ्याचे पाय धरी...
‘कावळ्याचं बसणं आणि फांदीचं मोडणं काय असतं, याचा अनुभव मला सोयाबीन विक्रीसाठी बाजारात गेल्यावर आला. जळगाव येथील बाजार समितीत सोयाबीन विक्रीसाठी गेल्यावर समोरच्या व्यापाऱ्याने आधी जुन्या पाचशे - हजाराच्या नोटा घ्याव्या लागतील, असं सांगितलं. जुन्या नोटा नको म्हटल्यावर त्याने पंधरा दिवसांनंतरच्या तारखेचा धनादेश देऊ केला. जुन्या नोटा घेतल्यावर बॅंकेत आणखी हेलपाटे घालावे लागणार होते, त्यामुळे अडला नारायण धरी व्यापाऱ्याचे पाय म्हणत शेवटी धनादेश खिशात टाकला आणि गावाकडचा रस्ता धरला. आयुष्यात पहिल्यांदा काबाडकष्ट करून पिकवलेला शेतीमाल उधार विकून खाली हातानं, जड पावलांनी घरी परतलो,’ अनिल पाटील डोळ्यांत पाणी आणून सांगत होते. 

पैशांशिवाय ट्रॅक्टरचे चाक थांबले..
खरिपात सोयाबीनचं पीक घेतल्यानंतर रब्बी हंगामात गहू पेरण्याचं नियोजन शेतकरी संजय पाटील यांनी करून ठेवलं होतं. त्यादृष्टीने वेळ वाया जाऊ नये म्हणून त्यांनी गावातील एका ट्रॅक्टरमालकाशी संपर्क साधला. आपल्याला उद्या सकाळीच शेतात जाऊन रोटाव्हेटर फिरवायचाय म्हणून सांगितलं. नेहमीप्रमाणे ट्रॅक्टरमालक शेतात जाण्यासाठी तयारसुद्धा झाला; पण एका अटीवर. ट्रॅक्टरमध्ये संजय पाटलांनी आधी फुल्ल डिझेल भरून द्यायचं, त्याशिवाय ट्रॅक्टर जागेवरून हलणार नाही म्हणाला. झाली ना संजय पाटलांची पंचाईत. खिशात पाचशेच्या जुन्या नोटा होत्या; पण त्या कोणीच घेईना. त्यामुळे ट्रॅक्टरमध्ये डिझेल भरण्याचेही वांदे झाले. शेवटी नव्या नोटा मिळेपर्यंत थांबावं लागेल, असे सांगून मशागत लांबणीवर टाकली. त्या दिवसापासून नवीन नोटा मिळवण्यासाठी पछाडलेले पाटील शेताकडं फिरकलेही नाहीत. त्यांची गव्हाची पेरणीही खोळंबली आहे.

पैशांची भट्टी थंडावली...
शेतीसोबत वीटभट्टीचा व्यवसाय सुधीर पाटील दरवर्षी करतात. यंदाही त्यांनी नदीकाठावरील गाळाची माती, दगडी कोळसा, वीजनिर्मिती केंद्राची राख यांची त्यांनी जुळवाजुळव करून ठेवली होती. मजुरांची रोजंदारी देण्यासाठी बॅंकेत पैशांची तरतूदही केली होती; पण नोटाबंदीनंतर असं काही उलटसुलट वारं फिरलं की बॅंकेतून नियमितपणे पैसे मिळणं दुरापास्त झालं. मजुरांना आठवड्याची मजुरी देण्यासाठी पैसे देण्यात अडचण उभी राहिली. पैशांची भट्टी थंडावलीय म्हटल्यावर वीटांची भट्टीही शांत झाली. मजुरांअभावी विटा तयार करण्याचं काम कासवगतीने सुरू असल्याने सुधीर पाटील यांची आर्थिक घडी यंदा पार विस्कटून गेलीय.

आधी लग्न बॅंकेचं, मग मुलाचं....
लग्नाचं घर म्हटल्यावर रंगरंगोटी, विद्युत रोषणाई, आनंद आणि उत्साहाचं वातावरण हमखास दिसून येतं. या सर्व गोष्टी रिधुर येथे रघुनाथ सोनवणे यांच्या घरी अभावानेही दिसल्या नाहीत. त्यांच्या मुलाचं येत्या एक डिसेंबरला लग्न आहे. लग्न पाच दिवसांवर आणि बंद दरवाजाच्या घरावर कुलूप पहारा देत असल्याचं चित्र त्यांच्या घराला भेट दिल्यावर दिसून आलं. कुटुंबप्रमुख रघुनाथ सोनवणे सोडून सर्व सदस्य शेतात मोलमजुरीसाठी गेलेले. रघुनाथ सोनवणे तेवढे गावापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या विदगावच्या जिल्हा बॅंकेतील रांगेत सकाळपासून जाऊन थांबले होते. त्यांनी मुलाच्या लग्नासाठी बॅंकेत ४८ हजार रुपये साठविले होते. पाच दिवस रांगेत उभे राहिल्यावर त्यांना जेमतेम सहा हजार मिळाले होते. बाकीचे पैसे किमान मुलाच्या हळदीपर्यंत हातात पडण्याची त्यांना आशा होती. पैशांशिवाय मुलाच्या लग्नात खर्च करता येणार नसल्यानं मला थोडे जास्त पैसे द्या, असं त्यांनी बॅंक व्यवस्थापकाला सांगून पाहिलं. एके दिवशी लग्नाची पत्रिकाही दाखवली. दुर्दैवाने, पत्रिका दहा रुपयांत कुठंही छापून मिळते, असं सांगून तेथे त्यांची थट्टा उडवण्यात आली. शेवटी त्यांनी रिधुर ग्रामपंचायतीचा दाखला सोबत नेला, तेव्हा कुठं बॅंकेतून त्यांना थोडी सवलत मिळाली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com