स्वतःला घडवण्याच्या वृत्तीतून तरुणाची दमदार वाटचाल 

 स्वतःला घडवण्याच्या वृत्तीतून तरुणाची दमदार वाटचाल 

मनात काहीतरी करून दाखवण्याची धमक असली  की तो माणूस स्वस्थ बसून रहात नाही. आजच्या परिस्थितीत पारंपरिक शेती परवडू शकत नाही हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. परिस्थितीनुरूप वेगवेगळ्या जोडधंद्यांची जोड दिल्यास शेती फायद्याची नक्की होते. फक्त आतल्या आवाजाची हाक ऐकून, उद्याच्या काळाची गरज हेरून व्यवसायाची निवड करायला हवी. त्या निमित्ताने जगाचा अभ्यास होतो. व्यवहारज्ञान वाढते. चौकस बुद्धीने मार्केटचा अभ्यास होतो. लातूर शहरापासून नजीक असलेल्या पाखर सांगवी (ता. लातूर) येथील धनंजय नागनाथ राऊत या ३२ वर्षीय जिद्दी तरुणाची गोष्ट अशीच प्रेरणादायी आहे. 

सुरवातीचा धनंजय 
लहानपणी धनंजय मुळातच स्वच्छंदी, उनाड मुलगा होता. शिक्षणात मन रमत नाही. शाळा शिकायची नाही असं म्हणून सातवी इयत्तेनंतर शाळा सोडून दिली. त्याचे वडील हाडाचे शेतकरी. कोरडवाहू दहा एकर शेतीवर त्यांचा उदरनिर्वाह चालायचा. शहराजवळची शेती एवढाच काय तो आशेचा किरण. एकुलता एक मुलगा. शिकला नाही तरी शेतीत काहीतरी घडवेल, अशी वडिलांना आशा होती.

कधी कधी वडिलांसोबत धनंजय लातूरला कृषी सेवा केंद्रात जायचा. तिथं निविष्ठांवरची इंग्रजी अक्षरे वडील इतरांकडून समजून घेत. त्याचा धनंजयला कमीपणा वाटायचा. आपण शिकलो असतो तर? पण वेळ निघून गेलेली. 

वेगळ्या वाटेवरचा धनंजय 
वयाच्या वीस-बावीस वर्षांनंतर मित्रांकडून नाशिक येथील मुक्त विद्यापीठातील अभ्यासाबाबत कळले. त्यात रस घेऊन २००२ ला तो ‘ग्रॅज्युएट’ झाला. त्यामुळे इंग्रजीचेही ज्ञान वाढले.

सोबतीला वडिलांना शेतीत मदत करणे सुरू होते. शेजाऱ्यांकडे आंबे, पेरूची झाडे होती. आपणही ती लावावी असे त्याला वाटले. वडील म्हणाले ‘वहिती रानात आंबे लावल्यावर मग खायचं काय? जमीन पडीक पडेल. पण मग हलक्या जमिनीत कृषी विभागाच्या अनुदानावप एक एकर फळबाग केली. स्वतः पाणी देऊन, वेळप्रसंगी डोक्यावरून पाणी वाहून बाग जगवली. सोबतीला गाई-बैलांचे शेणखत देऊन झाडे चांगली जोपासली. ते हिरवं शेत अन हक्काची सावली पाहून वडिलांचा विरोध मावळला. मग तेही मदत करू लागले. दरम्यान शेतीतून म्हणावे असे कुठलेच उत्पन्न निघे. मग टँकर भाड्याने घेऊन पाण्याचा व्यवसाय केला. ‘म्युझिक सेंटर’, ‘एसटीडी बूथ’, ‘फायनान्स’, ‘कोल्ड्रिंग एजन्सी’, प्लॉटिंग  असे विविध व्यवसायही करून पाहिले. जवळपास सगळे नुकसानीतच गेले. 

मध्यंतरीच्या काळात शेतातल्या वीसेक फूट विहिरीतले पाणी कमी पडू लागले. शेजारच्या दोन किलोमीटरवरील तळ्याखाली वीस गुंठे शेती घेऊन तिथे विहीर खोदली. ते पाणी पाइपलाइनद्वारे विहिरीला आणले. त्याला मोठा खर्च झाला. शाश्वत उत्पन्नाचा मार्ग दिसत नव्हता. भरवशाचे पाणी झाल्यानंतर २०१० ला एक एकर टोमॅटो केला. भाजीपाला शेतीत लक्ष दिल्यास फायदा होतो हे कळले. टोमॅटो पिकाने दोन लाख रुपये मिळवून दिले. हळूहळू भाजीपाला शेतीचा अभ्यास व अनुभव सुरू झाला. त्यात कौशल्य येत गेलं. 

डोक्यात चंदनशेतीचे बीज  
भाजीपाला शेतीसाठी शेडनेट करावे यासाठी कृषी विभागाकडून प्रशिक्षणासाठी तळेगाव-दाभाडे (पुणे) येथे प्रशिक्षणाची संधी मिळाली. तिथं केरळचा रूम पार्टनर मिळाला. त्यानं कमी पाण्यात येणाऱ्या चंदनपिकाची माहिती दिली. तिथेच या पिकाचे बीज डोक्यात शिरले. घरी परत आल्यावर पुस्तके, इंटरनेट, संस्था या माध्यमातून चंदनाबाबत जमेल तेवढी माहिती मिळवली. त्यातून बंगळूरच्या चंदन व तत्सम पिकांविषयी कार्य करणाऱ्या सरकारी संस्थेची माहिती मिळाली. तेथील डॉ. आनंद पद्मनाथ यांच्याशी संपर्क आला. तिथं चंदन शेतीचं प्रशिक्षणही घेतले. 

मार्केटचा अभ्यास आवश्यक 
 मुळात शासनाचे चंदनलागवडीला कुठले अनुदान वा विमा नाही. पूर्वी जट्रोफा, सिट्रोनेला, सफेद मुसळी, कोरफड, नारळ, साग, स्टीव्हीया आदी पिकांच्या प्रयोगात शेतकरी फसले. असे चंदनासारख्या पिकात होऊ नये म्हणून धनंजय शेतकऱ्यांना या पिकाच्या मार्केटचा तसेच लागवड शास्त्राचा पूर्ण अभ्यास करायला सांगतात. त्यांच्या शेतावर जाऊन मार्गदर्शन करतात. चंदनाची चोरी होते ही एक मोठी जोखीम या पिकात असल्याचे ते सांगतात. 

चंदनाची लागवड 

चंदनाच्या शेतीतील बारकावे, मार्केट व अर्थकारण समजावून घेत प्रयोग करायचे ठरवले. बंगळूरमधीलच खाजगी रोपवाटिकेतून ५० रुपये प्रतिनग या दराने रोपे आणली. 

अशी आहे सध्याची लागवड
    एकूण शेती- १० एकर
    चंदन लागवड- साडेतीन एकर
    रोपनिर्मिती- दोन एकरांत, यात शेडनेट व पॉलिहाउस 
    अजून व्यावसायिक उत्पादन सुरू होण्यास किमान १५ वर्षांचा कालावधी 
    तोपर्यंत आले, वांगी, कांदा, कोथिंबीर आदी पिके घेणे सुरू, त्यातून उत्पन्न 
    आत्तापर्यंत लातूर तसेच बीदर, तेलंगणा, गुजरात, अयोध्या आदी विविध भागांत रोपविक्री. त्यातून उत्पन्न, प्रतिरोप ४० रुपयांप्रमाणे विक्री 
    स्थानिक बाजारातील बांबू आणून शेडनेटचे छोटेखानी शेड, त्यात रोपनिर्मिती 
    चंदन हे अर्धपरोपजीवी झाड असल्याने मिलीयी डुबिया, कढीपत्ता, पेरू, सीताफळ, हदगा आदींचा यजमान पीक (होस्ट) आधार घ्यावा लागतो. 
    या झाडाला पाण्याची गरज अत्यंत कमी
    मायक्रो स्प्रिंकलरद्वारे पाण्याची व्यवस्था

अर्थकारण 
धनंजय म्हणाले, की चंदनाच्या झाडात मधला गाभा सुगंधी असतो. तोच किमती असतो. जवळपास १५ वर्षांत प्रतिझाड १० किलो त्याचे उत्पादन मिळू शकते. झाडांच्या वयानुसार हे प्रमाण वाढत जाते. चंदनाला किलोला ६५०० रुपये दर आहे. त्या हिशोबाने प्रति झाड ६५ हजार रूपयांचे एकूण उत्पन्न मिळू शकते. एकरी सुमारे ४३५ पर्यंत झाडे बसतात. 

 धनजंय राऊत, ९४२३३४५१०३ 
(लेखक लातूर कृषी विभागांतर्गत कृषी अधिकारी असून शेती व पर्यावरणाचे अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com