बेदाण्याला ‘जीएसटी’तून वगळा

प्रतिनिधी
गुरुवार, 25 मे 2017

सांगली  - वस्तू व सेवाकरामध्ये (जीएसटी) बेदाण्याचा समावेश करून १२ टक्के कर आकारण्यात आला आहे. याचा फटका सांगली, सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यातील बेदाणा उत्पादकांना बसणार आहे. यामुळे व्हॅटप्रमाणेच ‘जीएसटी’मधूनही बेदाणा वगळावा, अशी मागणी आमदार सुमनताई पाटील आणि तासगाव बाजार समितीचे सभापती अविनाश पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. 

सांगली  - वस्तू व सेवाकरामध्ये (जीएसटी) बेदाण्याचा समावेश करून १२ टक्के कर आकारण्यात आला आहे. याचा फटका सांगली, सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यातील बेदाणा उत्पादकांना बसणार आहे. यामुळे व्हॅटप्रमाणेच ‘जीएसटी’मधूनही बेदाणा वगळावा, अशी मागणी आमदार सुमनताई पाटील आणि तासगाव बाजार समितीचे सभापती अविनाश पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. 

बेदाणा ‘जीएसटी’मधून वगळावा, या मागणीसाठी आमदार सुमनताई पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांची मंगळवारी (ता.२३) भेट घेतली. या वेळी बाजार समितीचे सभापती अविनाश पाटील यांच्यासह द्राक्ष उत्पादक शेतकरी उपस्थित होते. बाजार समितीनेही मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. 

निवेदनात म्हटले आहे, की राज्यातील सांगली, सोलापूर आणि नाशिक या तिन्ही जिल्ह्यांत ९८ हजार ५३२ हेक्टरवर द्राक्षाची शेती केली जाते. त्यावर उपजीविका करणारे सुमारे ६ कोटी मजूर काम करत आहेत. दुष्काळी स्थितीत कमी पाण्यावर येणारे पीक आहे. उत्पादन वाढल्याने मोठ्या प्रमाणावर बेदाणा तयार करण्याकडे शेतकरी वळले. बेदाणा उत्पादनात ६ ते ७ लाख इतके मजूर काम करतात. प्रतिवर्षी १५०० कोटी रुपयांहून अधिक उलाढाल होते. 

द्राक्षाचे बाजारभाव कमी झाल्यानंतर शेतकरी बेदाणा तयार करून तो शीतगृहात साठवून ठेवतात. त्यामुळे हे पूर्ण शेती उत्पादन आहे. बेदाण्याचे उत्पादन केवळ महाराष्ट्रात होते. १९९५ पासून राज्यात बेदाणा व्हॅटमधून मुक्‍त केला आहे. त्याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना झाला. मात्र आता जीएसटी लागू झाल्यास बेदाणा खरेदीदार व्यापारी जीएसटीचा १२ टक्के कर स्वतःच्या खिशातून देणार नाही, त्याचा भुर्दंड शेतकऱ्यांनाच बसेल. त्यामुळे दर कमी होण्याची भीती आहे, असे बाजार समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. 

सांगली आणि तासगाव बाजार समितीत बेदाण्याची मोठी बाजारपेठ आहे. यामुळे राज्यातील बेदाणा उत्पादकासह परराज्यातील बेदाणा उत्पादक या बाजार पेठेचा आधार घेतात. द्राक्षाला १६ ते १८ रुपये दर मिळायला लागला तर द्राक्ष शेती संपुष्टात यायला वेळ लागणार नाही. याचा विचार करून बेदाणा जीएसटी मुक्‍त करा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. 

‘जीएसटी’मधून बेदाणा वगळण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत अभ्यास करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.
- अविनाश पाटील सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती तासगाव