दख्खनी मेंढीची लाेकरदेखील दर्जेदार

dakhanni sheep
dakhanni sheep

पुणे : आॅस्ट्रेलियातील मेरिनाे मेंढीची लोकर शालीनिर्मितीसाठी सर्वोत्तम समजली जाते. याचबरोबरीने आता महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांमध्ये माेठ्या प्रमाणावर असणाऱ्या दख्खनी मेंढीची लाेकरदेखील पर्यायी उत्पादनांच्या निर्मितीसाठी दर्जेदार असल्याचा शिक्कामाेर्तब इंग्लंडमधील मॅंचेस्टर विद्यापीठाकडून करण्यात आले आहे, अशी माहिती शेळी मेंढी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय परकाळे यांनी दिली.

डॉ. परकाळे म्हणाले, की केंद्र शासनाशी संलग्न असलेल्या ठाणे येथील लाेकर संशाेधन संघटनेला मॅंचेस्टर विद्यापीठाकडून दख्खनी मेंढीच्या लाेकरीच्या दर्जाबाबत पत्र मिळाले आहे.  शेळी-मेंढी विकास महामंडळ, लाेकर संशाेधन संघटना आणि वस्त्राेद्याेग मंत्रालयाच्या वतीने दख्खनी मेंढी संशाेधन, विकास आणि मूल्यवर्धनासाठी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यासाठी ४ काेटी ७० लाख रुपयांचा संशाेधन प्रकल्प शासनाला सादर करण्यात आला आहे. दख्खनी मेंढीच्या लाेकरीची उष्णतारोधक क्षमता जगात उपलब्ध असणाऱ्या लाेकरीमध्ये सर्वाेत्तम आहे. जगात आॅस्ट्रेलियातील मेरिनाे मेंढीची लाेकर शाल निर्मितीसाठी सर्वाेत्तम समजली जाते. मात्र, विद्यापीठाच्या पत्रामुळे पर्यायी उत्पादनासाठी दख्खनी मेंढीच्या लाेकरीचेही महत्त्व वाढले आहे. यामुळे या लाेकरीवर संशाेधन करण्यासाठी लाेकर संशाेधन संघटना आणि मॅंचेस्टर विद्यापीठामध्ये संशाेधनासाठी सामंजस्य करार झाला. या संशाेधनासाठी लाेकर उपलब्धतीबाबत महामंडळ संशाेधन प्रकल्पाला मदत करणार आहे.

‘‘संशाेधन प्रकल्पांमधून विविध उत्पादने तयार करण्यात येणार आहेत. दख्खनी मेंढीच्या लोकरीच्या धाग्याची लांबी कमी आणि जाडी जास्त असल्यामुळे यापासून शाली तयार करता येत नाहीत. मात्र, या लोकरीमध्ये उष्णतारोधक गुणधर्म चांगले आहेत. हे गुणधर्म लक्षात घेता या लोकरीचा वापर खेळाडू आणि सातत्याने बर्फाळ प्रदेशात कार्यरत असणाऱ्या सैनिकांचे विशेष गणवेश, शस्त्रक्रिया करताना संसर्ग होऊ नये यासाठी लागणारे उच्च गुणवत्तेचे मास्क निर्मितीसाठी चांगल्या प्रकारे होणार आहे. वीज बाेर्डसाठी उष्णता शाेषक म्हणून लाेकरीचे पॅड, हिमालयातील घर आणि तंबू बांधणीसाठीच्या घटकांच्यामध्ये या लाेकरीचा वापर शक्य आहे. या संशाेधनामुळे येत्या काळात दख्खनी मेंढीच्या लाेकरीचा वापर वाढणार आहे. यामुळे मागणी आणि दर वाढून मेंढपाळांना देखील आर्थिक फायदा हाेईल.’’ असेही डॉ. परकाळे यांनी सांगितले.   

संशाेधन प्रकल्पामुळे लाेकरीची माेठ्या प्रमाणावर गरज भासणार असल्याने येत्या काळात प्रति किलो १०० रुपयांपर्यंत दर वाढण्याची शक्यता आहे. याचा मेंढपाळांना चांगला आर्थिक फायदा होणार आहे. लाेकर खरेदीसाठी महामंडळ आणि लाेकर संशोधन संघटनेमध्ये करार करण्यात येणार आहे. याबाबत संघटनेचे संचालक डॉ. ए. के. शर्मा यांनी नुकतीच शेळी मेंढी महामंडळाला भेट देऊन पाहणी आणि चर्चा केली आहे.

लोकर फेकून देण्याचे प्रमाण जास्त
सध्या राज्यात उपलब्ध आकडेवारीनुसार दरवर्षी १ हजार ३८९ टन लाेकरीचे उत्पादन हाेते. याची किंमत सुमारे २५ काेटी रुपये असून, यापैकी केवळ दिड टन लाेकर शेळी मेंढी विकास महामंडळाकडून खरेदी केली जाते. याची किंमत केवळ सुमारे ५० हजार रुपये आहे. महामंडळाकडून हाेणारी लाेकर खरेदी ही लाेकरी धाग्याच्या लांबीनुसार२० ते ३५ रुपये प्रतिकिलो दराने खरेदी केली जाते. तर काही प्रमाणात लाेकरीचा वापर खत म्हणून केला जाताे. लाेकरीचे मूल्यवर्धन हाेत नसल्याने माेठ्या प्रमाणात लाेकर फेकून देण्याचे प्रमाण जास्त आहे.
 
दख्खनी मेंढीच्या लाेकर संशाेधनासाठी प्रकल्प उभारण्याचे नियोजन असून, त्याबाबतचा प्रस्ताव वस्त्राेद्याेग विभागाला सादर करण्यात आला आहे. याबाबत दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीदेखील सहकार्य केले आहे. प्रकल्पासाठी ब्राझीलच्या संशाेधकाची नियुक्ती करण्यात आली आहे. 
- महादेव जानकर, पशुसंवर्धनमंत्री 

हे हाेणार फायदे 
माेठ्या प्रमाणावर लाेकरीच्या उपलब्धततेसाठी शासकीय खरेदी.
धनगर समाजाला व्यावसायिक उत्पादने तयार करण्याची संधी.
लोकर व्यवसायात अाधुनिकता येणार.
बाजारपेठेतील मागणी आणि अाधुनिकतेमुळे मेंढीपालनाला चालना.
मेंढीपालन केवळ मटणासाठी नाही तर लाेकरीसाठीदेखील फायदेशीर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com