केशरच्या नावाखाली चक्क करडईची शेती

मंदार मुंडले
मंगळवार, 16 मे 2017

मार्केट, व्यापारी कशाचीच नाही हमी शेतकऱ्यांची होतेय चक्क फसवणूक 

मार्केट, व्यापारी कशाचीच नाही हमी शेतकऱ्यांची होतेय चक्क फसवणूक 

पुणे - जम्मू-काश्मीरसारखे थंड हवामान महाराष्ट्रात नसले तरी अमेरिकन केशर या पिकाची प्रायोगिक लागवड इथल्या शेतकऱ्यांनी केली यशस्वी...या केशरला किलोला तब्बल ४० हजारांपासून ते एक-दोन लाख रुपये दर...एक लाख रुपये खर्च वजा जाता चार लाखांपासून ते दहा लाख रुपये उत्पन्न शेतकऱ्यांना मिळणार...केशर विक्रीव्यतिरिक्त बी विकूनही घसघशीत उत्पन्न हाती येणार...असा आशय असलेल्या बातम्या, यशकथा गेल्या काही दिवसांपासून विविध दैनिके, टीव्ही चॅनेल्स व व्हॉटसॲपच्या माध्यमातून सातत्याने प्रसारित होत आहेत. 

आधीच शेती अत्यंत खर्चिक झाल्याने व कुठल्याच पिकाला दर नसल्याने राज्यातील शेतकरी हतबल झाला आहे. नव्या पिकांचा पर्याय शोधत आहेत. अशा परिस्थितीत अमेरिकन केशर या पिकाच्या अर्थकारणाविषयी मती गुंग करणारे आकडे एेकून तो अचंबित होत आहे. ज्या भागांत हे प्रयोग होत आहेत तेथे आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन उत्सुकतेने त्याची पाहणी करीत आहे. ‘मार्केट’ची खात्री न करता त्याचे बियाणे महागड्या दराने खरेदी करून किमान २० गुंठ्यांत त्याचा प्रयोग करू पाहात आहे. 

शेतकरीच नव्हे, तज्ज्ञांनाही भुरळ 
गेल्या काही महिन्यांपासून या ‘केशर’चा राज्यात सर्वत्र बोलबाला सुरू आहे. केवळ शेतकरीच नव्हे तर भल्या भल्या तज्ज्ञांना त्याची भुरळ पडली आहे. कोणतीही शहानिशा न करता ‘व्हॉटसॲप’वर या संदर्भात आलेल्या प्रयोगांची ‘पोस्ट’ तज्ज्ञांकरवी विविध ग्रुपवर ‘फॉरवर्ड’ केली जात आहे. त्यामुळे त्याचे प्रस्थ अधिकाधिक वाढण्यास मदत मिळत आहे. 

काय आहे अमेरिकन केशर? 
नावात ‘अमेरिकन’ आणि ‘केशर’ असे दोन आकर्षक शब्द असलेले हे पीक नेमके आहे काय? त्याचे मार्केट, किलोला ४० हजारांपासून ते दोन लाख रुपये असे त्याबाबत केले जाणारे बडे दावे याबाबत तज्ज्ञांकडून नेमकी वस्तुस्थिती जाणून घेण्याचा ऍग्रोवनने 
प्रयत्न केला. त्यातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ‘केशर’ या गोंडस नावाखाली घेतले जाणारे हे पीक दुसरे तिसरे काही नसून ते चक्क रब्बी हंगामात घेतले जाणारे करडई (सॅफ फ्लॉवर) असल्याचे निष्पन्न झाले आहे. करडईची वाळवलेली फुले (पाकळ्या) ‘केशर’सारखी दिसत असल्याने हेच केशर असल्याचे सांगून शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून चक्क फसवणूक सुरू आहे. खानदेश, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र अशा विविध भागांतील शेतकऱ्यांनी या केशरची लागवड केली आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे यंदा ज्या शेतकऱ्यांनी २० गुंठे, दोन एकर अशा क्षेत्रांत काही लाख रुपये खर्चून या तथाकथित केशरचे उत्पादन घेतले. ते खरेदी करायला व्यापाऱ्यांनी मागणी नसल्याचे कारण देत नकार दिला आहे. त्यामुळे पुढे करायचे तरी काय, अशी विमनस्क अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. 

तथाकथित केशरबाबत होत असलेले दावे 
- जम्मू-काश्मीरमधील तापमान महाराष्ट्रात नसले तरी हिवाळ्यात थंड हवामानात (२० अंश ते १० अंश सेल्सिअस तापमान) अमेरिकन केशरची शेती शक्य. 
- या केशरला गुणवत्तेनुसार प्रति किलो ४० हजार ते एक ते दोन लाख रुपये दर. 
- २० गुंठे ते एकरात चार लाखांपासून १० लाख रुपयांपर्यंत उत्पन्न. 
- दुष्काळात, कमी पाण्यात येऊ शकते. 
- गुजरातमधील कृषी विद्यापीठाने शोधलेले वाण. 
- केवळ केशरच नव्हे तर त्याचे बियाणे विकूनही मिळू शकतो घसघशीत नफा. 

ठळक बाबी 
- बियाण्याचा मुख्य स्त्रोत राजस्थान, गुजरात व मध्य प्रदेश. 
- काही शेतकरी प्रयोग केलेल्या शेतकऱ्यांकडून घेताहेत बियाणे. 
- या केशरचा नेमका उपयोग काय? ते कोठे विकले जाते? त्याचे मार्केट कोठे आहे? व्यापारी कोण आहेत? याबाबत काहीच माहिती उपलब्ध केली जात नाही. 
- अमेरिकन केशर म्हणून याची प्रत्येक बी २५ रुपयांपासून ४० रुपये इतक्या महागड्या दराने विकली जाते. 
- प्रत्यक्षात याच्या प्रमाणित बियांची (करडईची) किंमत किलोला फक्त ८० रुपये आहे. 

केशरचे गुजरातमध्येही लोण 
अमेरिकन केशरचे लोण जसे महाराष्ट्रात आहे तसेच ते गुजरातमध्येदेखील आहे. किंबहुना राजस्थान, गुजरातमधूनच ते महाराष्ट्रात आल्याचे बोलले जात आहे. गुजरात राज्यातील काही शेतकरीदेखील व्यापाऱ्यांच्या आमिषाला बळी पडून केशर पिकाचे बळी ठरले आहेत. गुजरातमधील आणंद कृषी विद्यापीठाने वेळीच पावले उचलून तेथील शेतकऱ्यांना सावध करण्यास सुरवात केली आहे. 
विद्यापीठाचे संशोधक संचालक डॉ. के. बी. कथिरिया यांनी तर ही विशेष मोहीम म्हणूनच हाती घेतली आहे. प्रसिद्ध पत्रक (प्रेस नोट) तयार करून तेथील प्रसारमाध्यमांना त्याबाबत जागृत करण्यात येत आहे. डॉ. कथिरिया ऍग्रोवनशी 
बोलताना म्हणाले की, अमेरिकन केशर असा कोणताही प्रकार नाही. अमेरिकन असे नाव दिले की लोकांना फसविणे सोपे जाते. अमेरिकेतूनच ते आपल्याकडे अाल्याचे वाटते. ही व्यावसायिक चलाखी आहे. अनेक प्रसारमाध्यमांनी या केशरच्या प्रयोगांना प्रसिद्धी दिल्याने शेतकऱ्यांत गैरसमज पसरायला मदत झाली. 

बी विकून सुरू आहे कमाई 
करडईचे फूल रंगीत असल्याने केशर नावाने व्यापारी त्याची दिशाभूल करीत आहेत. त्यांना शेतकऱ्यांकडील उत्पादन खरेदी करण्यात काहीही रस नाही. त्यांना त्याचे बी महागड्या किमतीने विकून पैसा कमवायचा आहे. या फुलातील घटकाचा रंगद्रव्य (डाय) म्हणून वापर केला जातो. त्याचा व्यावसायिकदृष्ट्या खाण्यासाठी वापर केला जात नाही. किलोला त्याला ७० हजार रुपये किलो दर आहे हे जे काही रंगवून सांगितले जात आहे ते सगळे खोटे आहे. आमच्या राज्यात मला अनेक शेतकऱ्यांनी फोन करून त्यांची फसवणूक झाल्याचे सांगितले आहे. 

शेतकऱ्यांत जागरूकता आवश्यक 
विद्यापीठाने प्रबोधन केल्यानंतर आता तेथील शेतकरी जागृत होत आहेत. व्यापारीदेखील सावध झाले आहेत. त्यामुळे हे लोण आता महाराष्ट्रात पसरत आहे. माझे म्हणणे आहे की, शेतकऱ्यांनी कोणतेही नवे पीक लावण्यापूर्वी त्याचे मार्केट अभ्यासावे. कृषी विद्यापीठाचा सल्ला घ्यावा. अॅग्रोवन अशीच मोहीम चालवून शेतकऱ्यांना वेळीच जागरूक करावे, म्हणजे त्यांची फसवणूक टळेल.