शोभिवंत मत्स्यबीज उत्पादनातून मिळवा अार्थिक सक्षमता

fish
fish

मत्स्यबीज उत्पादनासाठी मत्स्य प्रजनन टाक्यांमध्ये माशांच्या प्रजननाच्या सवयीनुसार आवश्यक वातावरण तयार करावे लागते. 
त्यासाठी प्रजननासाठी वापरावयाच्या टाक्या पोटॅशियम परमँगनेटने निर्जंतुक केल्या जातात. या टाक्यांमध्ये ७ ते ८ सामू असलेले आणि ५ ते ८ पीपीएम असलेले पाणी भरून प्रजननक्षम नर आणि मादी मासे सोडले जातात. टाक्यांमध्ये निर्जंतुक केलेल्या पाणवनस्पती किंवा प्लॅस्टिकचे कृत्रिम गुच्छ अंडी चिकटण्यासाठी सोडले जातात. माशांच्या आवश्यकतेनुसार प्रजननाच्या वेळेस पाण्याचे तापमान राखले जाते, जेणेकरून मासे वर्षभर भरपूर अंडी देऊन सशक्त पिल्ले देतील. जून ते ऑगस्ट आणि सप्टेंबर ते मार्च या महिन्यांमध्ये जास्त अंडी दिली जातात. 

अ) अंडी देणाऱ्या माशांचे प्रजनन 
अंडी देणाऱ्या माशांमध्ये गोल्ड फिश माशांचे प्रजनन तुलनेने सोपे असते. टाकीत किंवा हाैदात नर आणि मादी मासे २ः१ या प्रमाणात सोडले जातात. मादी माशांना दुपारच्या वेळेस, तर नर माशांना संध्याकाळच्या वेळेस सोडले जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचे प्रजनन होऊन चिकट अंडी वनस्पतींच्या पानांवर चिकटलेली असतात. अंड्यांनी भरलेली वनस्पतींची पाने दुसऱ्या टाकीत किंवा हाैदात उबवण्यासाठी (हॅचिंग) ठेवली जातात. 
पाण्याच्या तापमानानुसार जवळजवळ २४ ते २८ तासांत पिल्ले अंड्यांतून बाहेर पाडतात आणि ३ ते ५ दिवसांत माशांची अळी अवस्था स्वतंत्रपणे पोहताना दिसते. 

१) गोरामी 
- प्रजननासाठी पसरट पाने असलेल्या पाणवनस्पती (उदा. वॉटर लिली) वापरल्या जातात. 
- मासे पोहता पोहताच या वनस्पतींच्या पानांच्या मागील बाजूस ७ सेंमी रुंद आणि १ सेंमी उंच बुडबुड्यांचे घरटे बनवितात ज्यांत अंडी दिली जातात. अंड्यांची उबवण होईपर्यंत नर मासे अंड्यांचे संरक्षण करतात. 

२) सियामीस फायटिंग 
- हे मासेसुद्धा बुडबुड्यांचे घरटे तयार करतात, ज्यामध्ये मासे फलित झालेली अंडी तोंडाने उचलून उबवणुकीसाठी ठेवतात. नर मासे अंड्यांचे संरक्षण करतात. 
- उबवण पूर्ण झाल्यावर नर मासे वेगळे काढले जातात. 

३) एंजल मासे 
- अंडजनन झाल्या झाल्या मासे खाली पडलेली फलित झालेली अंडी तोंडाने उचलून पानांवर रचून ठेवतात. मासे आपल्या पंखाने अंड्यांना वारा घालतात, जेणेकरून त्यांच्यावर कोणतीही घाण बसू नये. 
- हे मासे प्रजननाच्या वेळेस अतिशय शांतता आणि एकांत पसंत करतात. कोणताही आवाज झाला तर ते घाबरून आपली अंडी खाऊन टाकतात. म्हणूनच अंडी देण्याची प्रक्रिया झाल्यावर नर व मादी मासे वेगळ्या टाकीत काढले जातात आणि अंडी उबवण्याचे प्रमाण वाढण्यासाठी उबवण टाकीमध्ये हळुवार एरेशन चालू ठेवले जाते. 

४) झेब्रा मासे 
- हे मासे चिकट अंडी देतात. प्रजनन टाकीत छोटे छोटे दगड ठेवून पाण्याची खोली १० सेंमीपर्यंत ठेवली जाते. 
- २ः१ किंवा ३ः१ या प्रमाणात नर, मादी मासे ठेवतात. मादी माशांना एक दिवस आधीच प्रजनन टाकीत ठेवले जाते आणि त्यानंतर नर माशांना सोडतात. 
- अंडीजनन झाल्यावर अंडी खाली पडतात व दगडांच्या फटीत जाऊन बसतात. ही प्रक्रिया झाल्यावर नर व मादी मासे वेगळ्या टाकीत काढले जातात. 

ब) पिल्ले देणाऱ्या माशांचे प्रजनन 
यामध्ये नर आणि मादी माशांची ओळख सहजपणे होते. नर मासे प्रामुख्याने चमकदार आणि मादी माशांपेक्षा अधिक आकर्षक रंगांचे असतात. मादी माशाच्या पोटाकडील पंख त्रिकोणी आकाराचा असतो, तर नर माशांमध्ये हा पंख गोनोपोडियममध्ये परिवर्तित झालेला असतो. पिल्ले देणाऱ्या माशांमध्ये बहुतेकदा स्वजातिभक्षण दिसून येते, ज्यामध्ये मादी मासे स्वतःची पिल्ले खातात. अशा माशांचे प्रजनन करताना पिल्ले जगवण्यासाठी प्रजनन टाक्यांमध्ये पाणवनस्पती ठेवल्या जातात, जेणेकरून पिल्ले झाडांमध्ये लपू शकतील. काही व्यावसायिक प्रजनन पिंजऱ्याचा वापर करतात. प्रजनन पिंजरे प्रजनन टाकीमध्ये ठेवले जातात, जे की टाकीपेक्षा आकाराने लहान असतात आणि जाळीच्या कापडाचे बनलेले असतात. या पिंजऱ्यांमध्ये मादी मासे ठेवले जातात आणि पिल्लांचा जन्म झाला की पिल्ले पिंजऱ्याच्या जाळीतून टाकीत येतात आणि टाकीच्या तळाशी जाऊन बसतात. अशाप्रकारे पिल्लांचा जन्म झाला, की प्रजनन पिंजरे मादी माशांसह दुसऱ्या टाकीत ठेवले जातात. मादी मासे २० ते २५ दिवसांनी परत दुसऱ्या पिलांना जन्म देतात. पिल्ले देण्याची क्षमता माशांच्या प्रजातीनुसार बदलते. एक मादी एका वेळी २० ते १०० अंडी देते. 

मत्स्य आहार आणि संपूरक खाद्य 
- माशांच्या जिवंत खाद्यामध्ये इंफुसोरिया, रोटिफेरस, मोइअना, डॅफनिया, ब्राइन श्रिम्प, टुबिफेक्स या सूक्ष्मजिवाणूंचा समावेश होतो. 
- माशांना जिवंत खाद्याचा पुरवठा सतत करता यावा यासाठी या सूक्ष्मजिवाणूंचेही संवर्धन करता येते. 
- जिवंत खाद्य माशांच्या सुरवातीच्या वाढीच्या काळात (अळी अवस्था) अाणि गर्भधारणेच्या काळात वापरले जाते. 
- प्राणी प्लवंगाबरोबरच ब्लड वर्म, डासांची पिल्ले वगैरे आहाराच्या स्वरूपात दिले जाते. आजकाल रंगीत माशांसाठी वेगवेगळ्या प्रकारांचे मत्स्यखाद्य बाजारात उपलब्ध आहे. हे खाद्य पौष्टिक असून माशांच्या अन्नघटकांच्या आवश्यकतेनुसार बनविलेले असते. 

संवर्धन आणि व्यवस्थापन : 
- माशांच्या प्रजनन आणि संवर्धनासाठी खंड न पडणारा पाण्याचा स्रोत आणि सतताचा विद्युतपुरवठा आवश्यक असतो. 
- हाैद स्वच्छ करून त्यातील पाणी बाहेर जाण्यासाठी वेगळी वाट तयार करावी, जेणेकरून खराब किंवा संसर्ग झालेले पाणी इतर टाक्या किंवा संवर्धनासाठी वापरावयाच्या वस्तूंच्या संपर्कात येणार नाही. 
- प्रत्येक टाकी किंवा हाैदासाठी स्वतंत्र एरेशनची व्यवस्था असावी. संवर्धन क्षेत्रापासून बाजारपेठेला जाण्यासाठी वाहतुकीची साधने जवळ असावीत. 
- माशांचे संवर्धन करताना प्रत्येक टाकीत मासे योग्य त्या घनतेमध्ये साठवावेत. २ ते ३ सेंमी आकाराच्या माशांना २० वर्ग सेंमी पाण्याची आवश्यकता असते. 
- माशांच्या विभिन्न प्रजातीनुसार निरनिराळ्या पाणवनस्पतींची गरज भासते. उदा. एकोर्स, लेश झाडे, फॅन वॉर्ट, हॉट ऑर्ट, इंडियन वॉटर फर्न, अमेझॉन सॉर्ड प्लांट, हायड्रिला, वॉटर स्टार, मिंट प्लांट, वॉटर मिल्फायलम, एरो हेड, टेप ग्रास. या वनस्पतींमुळे पाण्यामधील अनावश्यक घटक शोषले जातात आणि पाण्याची गुणवत्ता राखण्यास मदत होते. 
- झाडांमुळे छोट्या छोट्या माशांना लपण्यासाठी जागा उपलब्ध होते आणि पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. 
- झाडे मत्स्यालयात नैसर्गिक वातावरणाची निर्मिती करतात आणि मत्स्यालयाला अधिक आकर्षक बनवितात. 
- दररोज मस्त्यटाक्यांची आणि हाैदाची साफसफाई करणे आवश्यक असते. 
- दररोज संवर्धन टाकीतील २५ टक्के पाणी बदलावे, तर प्रजननासाठी वापरावयाच्या माशांच्या टाकीतील पाणी ७० टक्के बदलावे. 
- पिल्ले असलेल्या टाकीतील पाणी आवश्यकते नुसार दररोज बदलावे, त्यामुळे माशांमध्ये रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. 
- प्रत्येक टाकीतील एरेशन दररोज तपासावे. 
- माशांना दिवसातून ३-४ वेळा थोडा थोडा आहार द्यावा. मस्त्यालयातील मासे रोगजंतूंना अतिसंवेदनशील असतात. यांना मुख्यतः परजीवी, बुरशीजन्य, जीवाणूजन्य आणि विषाणूजन्य रोग होतात. परंतु, पाण्याची योग्य गुणवत्ता राखली आणि पोषक खाद्य दिले, तर मासे निरोगी राखण्यास मदत होते. तसेच, योग्य व्यवस्थापन आणि देखरेख करून रोगांना दूर ठेवता येते. 

संपर्क - डॉ. पंकजकुमार मुगावकर, ७७३८२४६७८५ 
(केंद्रिय मत्स्य शीक्षण संस्था, मुंबई) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com