गांडूळखत निर्मिती झाली सामूहिक चळवळ

Gandul-Fertiliser
Gandul-Fertiliser

नंदुरबार जिल्ह्यातील खांडबारा, सोनपाडा भागातील शेतकरी जमीन सुपीकता व त्याचबरोबर दर्जेदार उत्पादनाबाबत अधिक जागरूक झाले आहेत. येथील कृषी विज्ञान केंद्राने त्यांना गांडूळखत निर्मितीचे प्रशिक्षण व त्याचा विस्तारही केला. प्रत्येक गटाला दोन याप्रमाणे ११ गटांना गांडूळखताचे ‘बेड’ देण्यात आले आहेत. त्याचा अजून विस्तार शेतकऱ्यांनी केला. गांडूळखताची मागणी अोळखून खतासह कल्चरची विक्री साधत हे शेतकरी व्यावसायिक झाले. चांगल्या अर्थाजर्नाची सोय त्यांनी केली. 

नंदुरबार जिल्हा पपई, केळी, मिरची, कापूस व भाजीपाला पिकांसाठी अोळखला जातो. या भागातील शेतकऱ्यांची जमीनधारणा अत्यंत कमी आहे. त्याचबरोबर डोंगरदऱ्या- खोऱ्यांमधून इथली बहुतांश शेती वसली आहे. पाण्याची टंचाई व जवळ नसलेल्या बाजारपेठा या समस्याही इथल्या शेतकऱ्यांना जाणवतात. हे शेतकरी अधिकाधिक प्रगतीशील व प्रयोगशील व्हावेत, यासाठी नंदुरबार येथील कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके) प्रयत्नशील असते. 

गांडूळखत प्रकल्पाला चालना
नवापूर तालुक्यातील खांडबारा व सोनपाडा भागात केव्हीकेने काही उपक्रम हाती घेतले आहेत. गांडूळखत निर्मिती हा त्यातील एक आहे. अलीकडील काळात अनेक शेतकरी सेंद्रिय घटकांचा वापर शेतीत वाढवू लागले आहेत. जमिनीची सुपीकता वाढवणे हा त्यामागील मुख्य उद्देश आहे.

याच खताला चालना देण्याचा केव्हीकेचा उद्देश आहे. खांडबारा गावापासून काही किलोमीटरवर असलेले सोनपाडा हे १५०० लोकवस्तीचे  छोटे गाव आहे. येथील मानसिंग वळवी या युवकाची जेमतेम एक एकर शेती अाहे. कुटुंबातील सातजणांचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी या शेतीचाच त्याला आधार आहे. 

उपक्रमशील गट 
मानसिंग यांनी २०१४-१५ मध्ये ११ शेतकऱ्यांना एकत्र करून याहा शेतकरी गटाची स्थापना केली. वेगवेगळे उपक्रम या गटाद्वारे चालवले जातात. त्यामध्ये डाळमिलद्वारे डाळ निर्मिती, कांदा व लसूण संशोधन संचालनालयाच्या सहकार्याने कांदा बीजोत्पादन आदींचा समावेश केले जाते. नंदुरबार किंवा खांडबारा परिसरातील शेतकरी दुभत्या जनावरांबरोबर शेळी, कोंबडीपालनदेखील करतात.

खतनिर्मितीला चालना 
या भागात अशी पद्धती आहे की शेतातील काडी कचरा, शेण आदी घटक आपल्या घराच्या किंवा रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यांमध्ये शेतकरी संकलित करतात. मात्र त्याचा व्यावसायिक उपयोग काहीच व्हायचा नाही. गरज असलेले लोक ते विकत घेऊन जायचे. मानसिंग हे पाहून अस्वस्थ व्हायचे. याचा व्यावसायिक उपयोग केला पाहिजे असे त्यांना वाटायचे.  

गांडूळखत निर्मितीला सुरवात 
गाव परिसरात भाजीपाला पिके घेतली जातात. त्यातूनच हे शेतकरी केव्हीकेसोबत कायम संपर्कात होते. त्यातूनच येथील तज्ञांनी गटाद्वारे गांडूळखत निर्मिती करण्याचा सल्ला या शेतकऱ्यांना दिला. शिवाय प्रशिक्षणाची सोयही केली. मानसिंग यांनी त्याचा लाभ घेतला. त्यातून स्वतःच्या शेतीत खताचा वापर सुरू केला. पण त्याचबरोबर अन्य शेतकऱ्यांतही त्याचा प्रसार करण्यास सुरवात केली.

साधारण २०१५-१६ च्या सुमारास खत निर्मितीला चांगली चालना मिळाली. सुरवातीपासून प्लॅस्टिक बेड (१२ बाय ४ बाय २ फूट) तसेच साध्या बेड पद्धतीने (३ बाय १ मी.) गांडूळखत निर्मिती सुरू झाली. प्रकल्प उभारणीसाठी सुरवातीला केव्हीकेने आदिवासी उपयोजनेतून गटाला बेड उभारण्यासाठी मदत केली. 

साध्या पद्धतीने शेडची उभारणी 
गांडूळखत निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल या भागात उपलब्ध होता. परंतु, त्यासाठी लागणाऱ्या शेडसाठी अधिक खर्च न करता साध्या पद्धतीने मंडप उभारणी केली. त्यासाठी २५ हजार रुपये खर्च आला. खत निर्मितीसाठी १२ प्लॅस्टिक बेड तसेच जमिनीवर ८ साध्या बेडसचा वापर करण्यात आला. 

गांडूळखत आणि कल्चरची विक्री
आपल्या भाजीपाला किंवा अन्य शेतीत पुरेसे खत वापरून उर्वरित खताची विक्री मानसिंग व गटातील शेतकऱ्यांनी सुरू केली. त्यातून आता गटाला एक ते दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळू लागले आहे. 

खांडबारा परिसरात,उस, कापूस, पपई, मिरची आदी पिकांतील शेतकऱ्यांकडून या खताला चांगली मागणी असते. नंदुरबार जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यातही आता विक्री होऊ लागली आहे. सरासरी पाच रुपये प्रति किलो त्याचा दर ठेवला आहे. त्याचबरोबर गांडूळ कल्चरदेखील विक्रीचे साधन बनले आहे. त्याची विक्री ५०० रुपये प्रति किलो दराने होते.  
 
विक्री (गटातर्फे) 
वर्ष               गांडूळखत विक्री     कल्चर  विक्री     

२०१५-१६            २० टन             २० किलो      
२०१६-१७            ४० टन             ८० किलो     
२०१७-१८            ६० टन            १३० किलो  

प्रशिक्षणातून विस्तार 
केव्हीकेचे तज्ज्ञ विकास गोडसे म्हणाले की खांडबारा भागात सुमारे ११ गट आम्ही तयार केले आहेत. त्यातील प्रत्येक गटाला दोन बेडस दिले आहेत. सुरवातीला गांडूळ कल्चरही उपलब्ध करून दिले. या परिसरात वाडा प्रकल्पही ५०० शेतकऱ्यांच्या शेतांवर एकूण पाचशे एकरांवर सुरू आहे. या शेतातील माती परीक्षणही केले जात आहे. सेंद्रिय खताच्या माध्यमातून जमिनीची सुपीकताही वाढवण्यास मदत मिळत आहे. इथल्या शेतकऱ्यांच्या गांडूळखत विक्रीला केव्हीकेची देखील मदत आहे. त्याचाच भाग म्हणून कृषी महोत्सवातून खतविक्री करणे साध्य झाले.  

गाव परिसरात मार्गदर्शन 
गांडूळखत निर्मितीला असलेला वाव व त्याचे फायदे आता परिसरातील अन्य शेतकऱ्यांच्याही लक्षात येऊ लागले आहेत. त्यामुळे सोनपाड्याचे शेतकरी त्यांच्यासाठी मार्गदर्शत बनले आहेत. यावर्षी सोनपाडा गावातील २५ शेतकरी एकत्र येऊन केव्हीकेमार्फत प्रशिक्षण घेत आहेत. त्यातून गांडूळखत निर्मितीसाठी त्यांनीही पुढाकार घेतला आहे. विशेष म्हणजे परिसरात या खतनिर्मितीला प्रोत्साहन मिळावे यासाठी शेतकऱ्यांना २५० रुपये प्रति किलो या कमी दराने गांडूळ कल्चर दिले जाते.  आज घर परिसरात असलेल्या खड्ड्यांची संकल्पना बदलू लागली आहे. येत्या काळात गावातील सर्व काडी कचऱ्यापासून कंपोस्ट आणि गांडूळखत निर्मिती करण्याचा येथील ग्रामस्थांचा मानस आहे. 

- मानसिंग वळवी, ९४२०५३३५४४ 
- विकास गोडसे, ९४०४७४९८७०
(लेखक कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार येथे कार्यरत आहेत.) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com