पर्यावरण संवर्धन, शिक्षण हेच ‘ब्राऊन लीफ`चे ध्येय

पर्यावरण संवर्धन, शिक्षण हेच ‘ब्राऊन लीफ`चे ध्येय

‘‘आमच्या सोसायटीच्या परिसरात जुना वावळ वृक्ष आहे. त्याची भरपूर पाने पडतात. या पानांचा कचरा गोळा करून महानगरपालिकेचे लोक नेत होते. तर काही वेळा हा पाला जाळला जायचा. परंतू गेल्या तीन वर्षांपासून हा पालापाचोळा महानगरपालिकेच्या कचरा डेपोत न जाता त्यापासून मी सोप्या पद्धतीने सेंद्रिय खत तयार करते, त्याचे चांगले फायदे दिसून आले``.... पुणे शहरात ‘ब्राऊन लीफ` या पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी गटाची संस्थापक अदिती देवधर अनुभव सांगत होती.

‘ब्राऊन लीफ` गटाच्या उपक्रमाबाबत अदिती देवधर म्हणाली की, आमच्या भागात सोयायटी तसेच रस्त्याच्या कडेने असलेल्या झाडांचा मोठ्या प्रमाणात पालापाचोळा तयार होतो. काही जण हा पालापाचोळा जाळायचे, तर महानगरपालिकेचे लोक हा पालापाचोळा गोळा करून कचरा डेपोमध्ये घेऊन जात होते. परंतू हा पालापाचोळा बागेसाठी चांगले आच्छादन आणि कंपोस्ट खत निर्मितीसाठी उपयुक्त ठरते हे लक्षात आले. कंपोस्टबाबत माहिती घेत असताना या वेळी पुणे शहरातील सूस भागात राहणाऱ्या सुजाता नाफडे यांची ओळख झाली. नाफडे त्यांच्या सोयायटीमधील मोकळ्या जागेत वर्षभर भाजीपाल्याची लागवड करतात. त्यांनी माझ्याकडून भाजीपाला लागवडीसाठी आच्छादन आणि कंपोस्ट खत निर्मितीसाठी पालापाचोळा नेण्यास सुरवात केली. हा पालापाचोळा त्यांनी बागेत अंथरला, त्याचे चांगले कंपोस्ट खत तयार केले. त्याचा भाजीपाला वाढीसाठी चांगला फायदा झाला.

‘ब्राऊन लीफ`ची सुरवात 
‘ब्राऊन लीफ`च्या कार्याबद्दल अदिती देवधर म्हणाली की, पुणे शहरातील लोकांशी झालेल्या चर्चेतून असे लक्षात आले की, बंगला, सोसायटीच्या परिसरात दररोज झाडांचा मोठ्या प्रमाणात पालापाचोळा पडतो. त्याचे काय करायचे हा प्रश्न आहे. तर दुसऱ्या बाजुला हौशी परसबाग करणाऱ्या लोकांना कंपोस्ट खतासाठी पालापाचोळा मिळत नाही. दोघांनाही फायदा व्हावा आणि पालापाचोळा जाळून टाकणे किंवा कचरा डेपोत देण्यापेक्षा कंपोस्ट खत निर्मितीसाठी उपयोगी पडण्यासाठी मी ‘ब्राऊन लीफ` हा स्वयंसेवी गट सुरू केला. शहरी भागाच्या बरोबरीने तसेच ग्रामीण भागातील नदी प्रदूषण आणि कचऱ्याच्या समस्येवर मात करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. 

लोकांमध्ये पालापाचोळ्याची देवाण घेवाण होण्यासाठी संकेतस्थळ आणि फेसबुक पेज तयार केले. गटाच्या फेसबुकवर १८०० सदस्य आणि व्हॉटसॲपवर ४५० सदस्य आहेत. ज्यांच्याकडे पालापाचोळा जमा होतो ते पोत्यात भरून ठेवतात आणि ज्यांना गरज आहे ते घेऊन जातात. यामध्ये खरेदी आणि विक्री असे स्वरूप ठेवले नाही. त्यामुळे लोकसहभागातून गेल्या तीन वर्षात आमचा गट वाढत गेला. या पालापाचोळ्यातून सोसायटी, बंगल्यांच्या मोकळ्या जागेत परसबागा फुलत आहेत. पुणे शहरातील टेकड्यांवर वृक्षारोपण करणारे गट हा पालापाचोळा झाडे लागवड आणि आच्छादनासाठी नेतात. 

कंपोस्ट बीनची निर्मिती  
अदिती देवधर यांनी पालापाचोळ्यापासून कंपोस्ट खत तयार करण्यासाठी छोट्या आकाराचे कंपोस्ट बीन तयार केले आहेत. याबाबत ती म्हणाली की, मी जाळीच्या पिंजरा तयार करून एक कंपोस्ट बीन तयार केला आहेत. या बीनमध्ये फक्त पालापाचोळा भरला जातो. पालापाचोळ्यावर दररोज पाणी शिंपडते, दर आठवड्याला पालापाचोळा कुजविणारे जिवाणू संवर्धक मिसळते. योग्य ओलावा आणि हवेशीरपणामुळे पालापाचोळा लवकर कुजतो. साधारणपणे पालापाचोळ्यापासून तीन महिन्यात तर ओल्या कचऱ्यापासून दोन महिन्यात कंपोस्ट खत तयार होते. पिजन मेशचा छोटा कंपोस्ट बीन तयार केला आहे. हा बीन घरगुती बागेसाठी उपयुक्त आहे. मी एका वर्षात जमा झालेल्या पालापाचोळ्यापासून २५० किलो कंपोस्ट खत तयार करून ते परसबाग आणि फुलझाडांच्या कुंड्यांना वापरते.  

टेकडी झाली हिरवीगार
वसुंधरा स्वच्छता अभियानातील सदस्या निधी कुलकर्णी म्हणाल्या की, आम्ही पाषाण टेकडीवर गेल्या बारा वर्षांपासून वृक्षारोपण आणि संवर्धनाची मोहीम राबवीत आहोत. आमचा चारशेहून अधिक लोकांचा गट आहे. लोकसहभागातून टेकडीवर पांगारा, वड, पिंपळ, उंबर, कांचन, करंज, कडुनिंब अशा अनेक देशी वृक्षांच्या रोपांची लागवड केली आहे. ही झाडे लावताना पालापाचोळ्याचा वापर करतो, त्याचे आच्छादन आणि कंपोस्टखत देखील करतो. दरवर्षी पाषाण परिसरातील शाळांच्यामध्ये वनीकरण, प्लॅस्टिक कचरा, ओला कचऱ्याचे नियोजन, कंपोस्ट खत निर्मिती याबाबत मार्गदर्शन केले जाते.

बाणेर टेकडीवर जैवविविधता उद्यान
 पुणे शहरातील बाणेर टेकडीवर जैवविधता संवर्धनाचा चांगला प्रयत्न झाला आहे. याबाबत माहिती देताना मोनाली शहा म्हणाल्या की, डॉ. गारुडकर वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून आम्ही या टेकडीवर विविध वृक्षांची लागवड केली आहे. या ठिकाणी पालापाचोळ्याचे आच्छादन करतो. जल-मृद संधारणाचे उपायही केले आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षात भूगर्भातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. या टेकडीवर शंभर प्रकारची झाडे आहेत. सत्तर प्रकारचे पक्षी, ३५ प्रकारची फुलपाखरे  तसेच साठ प्रकारची रानफुले पहावयास मिळतात. याची नोंद आम्ही ठेवलेली आहे. तसेच या टेकडीवर जपानी पद्धतीने ‘मियावाकी` जंगलाचे प्रारुप तयार केले आहे. या प्रारुपामध्ये झाडाच्या प्रकारानुसार आणि वाढीनुसार विविध झाडे लावलेली आहेत.

शाळा, सोसायटीमध्ये प्रसार
शहर तसेच ग्रामीण भागात वाढते प्रदूषण, ओला कचऱ्याचे विघटन, पालापाचोळ्याचा पुनर्वापर, परसबाग लागवड, वनीकरण याबाबत माहिती देण्यासाठी ‘ब्राऊन लीफ`तर्फे पुणे शहरातील विविध शाळा, महाविद्यालये तसेच गृहनिर्माण सोसायटीमध्ये पालापाचोळ्यापासून कंपोस्ट निर्मिती, आच्छादन आणि परसबाग, वनीकरण, नदीचे पर्यावरण संवर्धन अशा विविध उपक्रमातून माहिती दिली जाते. गेल्या दोन वर्षातील पुण्यातील दहा शाळा आणि पन्नास सोसायटींच्यामध्ये हा उपक्रम राबविण्यात आला. त्यामुळे लोकांच्यामध्ये जागृती होऊन पालापाचोळा आणि ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मितीला गती आली. मागील वर्षी गटातील सदस्यांनी दीड टन पालापाचोळ्यापासून सेंद्रिय खत तयार करून परसबागेत वापरले गेले. नुकताच ब्राऊन लीफ गटाचा विशेष पुरस्काराने गौरव करण्यात आला.

पुण्यातील एका शाळेने पालापाचोळा आणि शाळेच्या कॅंटीनमधून वाया गेलेला ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खत तयार करून परसबाग तयार केली आहे. यामध्ये भाजीपाला, फूलझाडांची लागवड केली जाते. त्यामुळे प्रत्यक्ष परसबागेत पर्यावरण शिक्षण आणि निसर्ग संवर्धनाचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळतो आहे.

आॅनलाइन प्रशिक्षण  
बऱ्याच लोकांच्या पालापाचोळ्यापासून कंपोस्ट खत निर्मितीबाबत शंका आहेत. त्यासाठी ब्राऊन लीफ तर्फे फेसबुक पेज, व्हॉटसॲपवरून तांत्रिक माहिती दिली जाते. त्याचबरोबरीने गटाने आॅनलाइन कोर्स तयार केला आहे. यामध्ये निसर्ग चक्र, पालापाचोळ्याचे उपयोग, कंपोस्ट खत, निसर्गचक्र, परसबागेची निर्मितीबाबत सातत्याने माहिती दिली जाते. 
अदिती देवधर - ७३५००००३८५

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com