मध्यस्थविरहित विक्री व्यवस्था उभी करणारे ‘बोकड प्रदर्शन’

मध्यस्थविरहित विक्री व्यवस्था उभी करणारे ‘बोकड प्रदर्शन’

शेतीची बाजारव्यवस्था मध्यस्थांच्या हातात अाहे. यात शेतकऱ्यालाच अधिक फटका सहन करावा लागतो. मात्र, प्रचलित पद्धतीला छेद देताना अकोला येथे कार्यरत असलेल्या स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेने यासंबंधीचा स्तुत्य उपक्रम शेतकऱ्यांसाठी राबवला आहे. विविध यंत्रणांची मदत घेत अकोला येथे ‘बोकड प्रदर्शन व विक्री’ व्यवस्था उभारून शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ मिळवून दिली आहे.

मध्यस्थविरहित बाजाराची संकल्पना 
संस्थेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. हेमंत बिराडे सुमारे १५ वर्षे मुंबईत कार्यरत होते. या वेळी त्यांनी देवनार (मुंबई) मध्ये भरणाऱ्या बोकड बाजाराला अनेकदा भेटी दिल्या. 

तेथे महाराष्ट्रातील कमी अाणि अन्य राज्यांतील शेळ्या, बोकड अधिक विक्रीला येत असल्याचा अनुभव त्यांना आला. या बाजारात दर चांगला मिळतो, मात्र राज्यातील पशुपालकांच्या खिशात मात्र त्याचा फायदा पडत नाही हे त्यांनी जाणले. त्यांची बदली अकोला येथे झाली. विदर्भात चांगला शेळीवंश अाहे. मात्र, येथील बाजारपेठ मध्यस्थांच्या हातात असल्याचे दिसून अाले. या भागात छोटासा प्रयत्न म्हणून अापल्या सहकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यातून बोकड प्रदर्शन व विक्री असा दहा दिवसांचा उपक्रम राबवण्याचे निश्चित केले. 

कार्यपद्धती अभ्यासली  
सुरवातीला ‘अात्मा’ यंत्रणेच्या मदतीने २० शेतकऱ्यांचा गट मुंबई बाजारात अभ्यासासाठी पाठवला. त्याने येथील कार्यपद्धती अभ्यासली. त्यानंतर २०१६ मध्ये अकोल्यात पहिल्या बोकड प्रदर्शन व विक्री या उपक्रमाची सुरवात झाली. यासाठी अात्मा, पशुसंवर्धन विभाग दरवर्षी सहकार्य करीत अाहे.

दरवर्षी वाढता प्रतिसाद 
यंदाच्या तिसऱ्या वर्षीचे प्रदर्शन अकोला येथे भरले असून, ते २० अाॅगस्टपर्यंत चालणार आहे. या प्रदर्शनात जातिवंत बोकड पाहायला मिळत आहेत. शिवाय ग्राहकांनाही खरेदी करण्याची संधी चालून आली आहे. यानिमित्ताने पशुपालकांसाठी नवी बाजार व्यवस्था तयार होत अाहे.

प्रदर्शनातील मागील अनुभव 
सन २०१६ मध्ये या प्रदर्शनात १२ ते १३ लाख रुपयांची उलाढाल
मागील वर्षी सुमारे ११० बोकडांची विक्री. त्यातून ९ लाख ३५ हजार रुपयांची उलाढाल
यंदाही पहिल्याच दिवसापासून चांगला प्रतिसाद. अकोला, वाशीम जिल्ह्यांसह मराठवाड्यातूनही शेळीपालकांचा यात सहभाग  
जमुनापरी, जमुनापरी क्रॉस, स्थानिक, सोजत, बेरारी, बोअर क्रॉस अशी प्रदर्शनात विविधता  
एक वर्ष ते अडीच वर्षे वयाच्या आतील बोकडांची प्रदर्शनात विक्री. तीस ते ६० किलोपर्यंत त्यांचे वजन 

प्रशिक्षणाची सोय  
पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेत शेळीपालन विषयातील तंत्रशुद्ध प्रशिक्षणे घेतली जातात. त्यात शिकवले जाणारे बारकावे फायदेशीर ठरत असल्याचे संस्थेचे डाॅ. एस. एम. वानखडे यांनी सांगितले. 
 शेळीपालकाला तंत्रज्ञानासोबतच बाजारपेठ देणे, मध्यस्थांचा अडसर दूर करणे हे उपक्रमाचे उद्दिष्ट अाहे. विदर्भात देखणे, तंदुरुस्त बोकड उपलब्ध अाहेत. त्यांचे व्यवस्थापन मात्र चांगल्या प्रकारे करायला हवे. असे झाल्यास इथल्या शेतकऱ्यांचे अार्थिक चित्र पालटू शकते.
डॉ. हेमंत बिराडे, अधिष्ठाता, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला 
 ः  ७०२११२८२७४


मी संबंधित संस्थेत शेळी व पोल्ट्री फार्म विषयातील दोन वर्षांचा डिप्लोमा केला अाहे. माझ्या ज्ञानाचा उपयोग नोकरीसाठी न करता स्वतः व्यवसाय करण्यासाठी ठरविले. शेळीपालनातले प्रशिक्षण घेतल्यानंतर दीड वर्षापासून या व्यवसायास दोन शेळ्यांपासून सुरवात केली. सध्या माझ्याकडे ७० पर्यंत शेळ्यांची संख्या अाहे. अकोला येथील हे प्रदर्शन मी पूर्वीही पाहिले होते. या वर्षी बोकड विक्रीसाठी अाणले आहेत. त्यांची किंमत मला ठरवता येते ही कल्पनाच सुखावणारी अाहे. 
-मैना राजेश काळे, औंढानागनाथ, जि. हिंगोली. 


मागील सात वर्षांपासून शेळीपालन करीत अाहे. हे प्रदर्शन सुरू झाले तेव्हापासून दरवर्षी त्यात सहभागी होत अाहे. मागील वर्षी माझा एक बोकड सर्वाधिक १८ हजार रुपयांत या ठिकाणी विकला. चांगल्या बोकडांना दरही चांगले मिळतात. येथे मध्यस्थ नसल्याने मी संगोपन केलेल्या बोकडाची किंमत स्वतः ठरवू शकतो. अन्य बाजारांत जेव्हा बोकड विक्रीला घेऊन जातो, त्या वेळी मध्यस्थ माझ्याबरोबरच खरेदीदाराकडूनही मध्यस्थी घेतो. यामुळे शेतकरी व खरेदीदार असे दोघांचेही नुकसान होत असते.
-रामकृष्ण अंभोरे, शिवणी खदान, जि. अकोला


शेतकरी, ग्राहक- दोघांनाही फायदा 
प्रदर्शनात व्यवहारासाठी कुठलाही मध्यस्थ नसतो. पशुपालक व ग्राहक अशा दोघांच्या चर्चेतूनच दर ठरवला जातो. यंदा पहिल्याच दिवशी ३१० रुपये प्रतिकिलो दराने बोकडाची विक्री झाली. एका शेतकऱ्याकडील ७२ किलो वजनाचे दोन बोकड सुमारे २२ हजार ३२० रुपयांना विक्री झाले. देखणा, रुबाबदार, निरोगी बोकडांना दर अधिक मिळतो असा मागील अनुभव लक्षात घेऊनच शेतकऱ्यांनी बोकडांचे संगोपन केले व विक्रीस अाणले. इथे होणारे व्यवहारदेखील अधिकृत असून, बाजार समितीद्वारे त्याची नोंद घेत पावतीही दिली जाते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com