सोलापूरच्या बाजारात हिरवी मिरची खातेय भाव 

सुदर्शन सुतार
मंगळवार, 23 मे 2017

सोलापूर - सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात हिरवी मिरची, दोडक्‍याचे दर चांगलेच वधारले. संपूर्ण सप्ताहभर त्यांची मागणी आणि आवकही टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यातही या सप्ताहात संपूर्ण बाजारावर हिरव्या मिरचीचा ठसका जाणवला.  

सोलापूर - सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात हिरवी मिरची, दोडक्‍याचे दर चांगलेच वधारले. संपूर्ण सप्ताहभर त्यांची मागणी आणि आवकही टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यातही या सप्ताहात संपूर्ण बाजारावर हिरव्या मिरचीचा ठसका जाणवला.  

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात हिरव्या मिरचीची आवक तशी ४० ते ५० क्विंटलपर्यंत रोज होती. त्यात काहीसा चढ-उतार राहिला; पण त्यात सातत्य राहिले. शिवाय मागणीही कायम टिकून असल्याने मिरचीचा भाव चांगलाच वधारला. गेल्या दोन-तीन आठवड्यापासून हिरव्या मिरचीचे दर कमी जास्त होत राहिले; पण गेल्या आठवड्यापासून त्यात काहीशी तेजी आली. स्थानिक व्यापाऱ्यांसह हैदराबाद, पुणे आणि मुंबईहूनही खास व्यापाऱ्यांकडूनही मिरचीची खरेदी झाली. खरेदी-विक्रीच्या या व्यवहारामुळे संपूर्ण बाजारात हिरवी मिरचीच्या दराचा ठसका जाणवत होता. हिरव्या मिरचीला प्रतिदहा किलोसाठी १०० ते ४५० व सरासरी २०० रुपये इतका दर मिळाला. 

त्याशिवाय दोडका आणि ढोबळी मिरचीचे दरही या सप्ताहात पुन्हा वधारलेलेच राहिले. ढोबळी मिरचीला ८० ते २५० व सरासरी १०० रुपये आणि दोडक्‍याला ७० ते ४०० व सरासरी १५० रुपये इतका दर मिळाला. वांग्याच्या दरातही काहीशी सुधारणा झाली. वांग्याला प्रतिदहा किलोसाठी ५० ते २५० व सरासरी १०० रुपये दर मिळाला. त्याशिवाय भेंडी, घेवडा, कोबीचे दर मात्र स्थिर राहिले. भेंडीला प्रतिदहा किलोस ६० ते २०० रुपये, घेवड्याला १५० ते २०० रुपये आणि कोबीला ५० ते १५० रुपये असे दर मिळाले.

भुईमूग शेंगांची आवक
गेल्या काही दिवसांपासून बाजारात भुईमुगाच्या ओल्या शेंगाची आवकही वाढली आहे. रोज आवक होत नाही, पण एक-दोन दिवसाआड अशी त्याची आवक होते आहे. त्याचे दरही काहीसे स्थिर आहेत; पण मागणी वाढलेली आहे. भुईमुगाच्या ओल्या शेंगाला प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये इतका दर मिळत आहे.