मधमाशीपालनाचा रंजक, रोचक इतिहास

honey-bee
honey-bee

मधमाश्या ज्या दिवशी पृथ्वीतलावरून नाहीशा होतील, त्याच्या बरोबर ४ वर्षांनंतर मनुष्य नावाचा प्राणी या पृथ्वीवरून नाहीसा होईल. हे वाक्य जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ आईनस्टाइन याने त्या काळात लिहिले आहे. यावरून मधमाश्यांचे मानवी जीवनातील स्थान किती महत्त्वाचे आहे याची आपणाला कल्पना नक्कीच येईल. मधमाशीपालनाचे महत्त्व केवळ मधासाठी नव्हे तर परागीभवनासाठीही आहे. ज्याद्वारे आपल्याला पिकांचे उत्पादन चांगल्या प्रकारे वाढवता येईल. त्याच दृष्टीने मधमाशीपालनाकडे व्यवसाय म्हणून कसे पाहता येईल, त्यात उद्योजक कसे होता येईल, शेती शाश्वत कशी करता येईल याचा संपूर्ण उहापोह करणारी मालिका आजपासून दर बुधवारी सुरू करीत आहोत. 

लेखकांचा परिचय 
पुणे स्थित प्रशांत सावंत व सारिका सरवडे हे मधमाशीपालन विषयातील तज्ज्ञ आहेत. या विषयात त्यांचा अनेक वर्षांचा अनुभव तयार झाला आहे. सावंत हे सहयोग परिवार या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. मधमाश्यांच्या संवर्धनासाठी गेल्या २७ वर्षांपासून ते कार्यरत आहेत. सरवडे यादेखील गेल्या १० वर्षांपासून मधमाशीपालनात प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. या क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढावा म्हणून त्यांनी पुढाकार घेतला आहे. प्रसारी हनी बीज या कंपनीच्या त्या संचालिका आहेत. 

मधमाश्यांचा इतिहास मानवाच्या उत्क्रांतीपेक्षा फार पुरातन आहे. मानवाचा पृथ्वीवर उदय होण्यापूर्वी अनेक कोटी वर्षे आधीच मधमाश्या आणि तत्सम कीटकांचे पृथ्वीवर वास्तव्य होते. मधमाश्या व कीटक हे खाद्यासाठी संपूर्णपणे सपुष्प वनस्पतींवर अवलंबून असतात. परागसिंचन आणि त्यामुळे होणाऱ्या बीजधारणेसाठी अनेक सपुष्प वनस्पती आपले पृथ्वीवरील अस्तित्व टिकवण्यासाठी मधमाश्या आणि त्यासारख्या कीटकांवर अवलंबून असतात. जीवनाच्या साखळीत काही कारणांमुळे समजा बदल घडले, हे उपयुक्त कीटक पृथ्वीतलावरून नाहीसे झाले तर वनस्पती, झाडे-झुडपे, फळझाडे इत्यादी हळूहळू परागसिंचनाच्या अभावी नष्ट होतील. पर्यायाने मानवासहीत अनेक जीवजंतू, पशुपक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात येईल. कीटक जगतातील मधमाश्या हा एक अत्यंत महत्त्वाचा व उपयुक्त कीटक आहे. 


मानवाच्या उत्क्रांतीचा विचार केला तर असे दिसते की त्याने विकसित होत असताना आपल्या सभोवताली असणारे प्राण्यांचे जीवन, वनस्पतींचा अभ्यास, भौगोलिक परिस्थिती यांचे अत्यंत बारकाईने निरीक्षण केले आहे. हे निरीक्षण त्याच्याकडून झाले नसते, तर कदाचित आजच्या इतका प्रगत मानव आपणास दिसला नसता. 

आदिकाळापासून मधमाश्यांचे महत्त्व 
गुहांमधून राहणाऱ्या आदिमानवाने आपल्या निरीक्षणामधून मधमाश्यांच्या पोळ्यांपासून मध व मेण मिळवण्याचे तंत्र आत्मसात केले. आदिमानवाला सर्वांत प्रथम माहीत झालेला गोड पदार्थ म्हणजे मध असे नक्कीच आपणाला म्हणता येईल. मधमाश्यांच्या पोळ्यांतून मध गोळा करण्याची पद्धत फार ओबडधोबड होती. लूटमार पद्धतीने मध गोळा केला जात असे. आपले वेद, रामायण, उपनिषदे वा धार्मिक ग्रंथांमधून मधमाश्यांचे उल्लेख आहेत. अनेक देशांतील जुन्या वाङ्मयातही त्यांचे उल्लेख आढळतात. काही ठिकाणी दहा हजार वर्षांपूर्वी चित्रीत केलेल्या गुफेतील चित्रांतून मधमाश्या आणि मानवाचे नाते स्पष्ट होते. आजही अनेक ठिकाणी पारंपरिक पद्धतीने मध गोळा करण्याची पद्धत वापरली जाते. झाडावरून, कपाऱ्यातून मधाची पोळी मधमाश्यांना हुसकावून वा त्यांना इजा पोचवून हस्तगत केली जातात. यातून मध हा खाण्यासाठी वा औषधी वापरासाठी काढला जातो. या पद्धतीने मध गोळा करताना मधमाश्या व त्यांची भावी पिढी नष्ट पावते. या पद्धतीतून निसर्गाचे मोठे नुकसान होते. 

मधमाश्यांच्या पालनाची सुरवात 
मधमाश्यांनी बनवलेला गोड पदार्थ म्हणजे मध मानवाने चाखला. पुढे जाऊन निरीक्षणातून आणि लाभलेल्या बुद्धीच्या जोरावर मधमाश्यांना पाळून मधसंकलन कसे करता येईल याचे संशोधन केल्याचे अनेक पुरावे जगाच्या पाठीवर आढळतात. इ.स. पू. ५००० वर्षांपूर्वी मातीच्या नळ्या तयार करून त्यावर गोड पदार्थ शिंपला जाई. त्याकडे मधमाश्या आकर्षित होत. मातीच्या नळ्यात त्या आपले पोळे तयार करीत असत. नळ्यात मध तयार झाला की नळीला एका बाजूने धूर करून मधमाश्यांना हुसकावले जाई आणि त्यातील मध गोळा केला जात असे. यात पुढे बरीच सुधारणा झाली. पुढे नळ्यांऐवजी गवताच्या विणलेल्या करंड्या वापरात येऊ लागल्या. करंड्या बुडाशी रुंद व वर निमुळत्या आकाराच्या असत. त्यांचे वरचे तोंड म्हणजे लहान छिद्र असे. यातून मधमाश्या ये- जा करीत. करंडीत मध जमा झाला की मधमाश्यांना मारून मध व मेण मिळवले जाई. 

परागीभवनाचाही शोध 
इजिप्त व चीन या देशांत मध आणि मेणासाठी दोन हजार वर्षांपूर्वी मधमाश्यांचे पालन केल्याचे उल्लेख आहेत. मधमाश्यांकडून मध गोळा करण्याची पद्धत हिंसात्मकच होती. हीच पद्धत पुढे शेकडो वर्षे चालत आली. पुढे या व्यवसायात क्रांतिकारक बदल झाले. मधाचा गोडवा मानवाला मिळालाच होता; पण त्याच्या प्रभावी निरीक्षण शक्तीने अजून महत्त्वाचा शोध घेतला. मानवाला मधमाश्या आणि फुलातील संबंध व त्यातून परागीभवनाचे महत्त्व लक्षात येऊ लागले. मधमाश्यांना मारण्याचे प्रमाण हळूहळू कमी होत गेले. पुढे जाऊन परागीभवनासाठी गवताच्या दांडीवर पोळे पाळल्याचे पुरावे मिळाले. 

मधमाश्यांच्या संवर्धनाला मिळाली दिशा 
मधमाश्यांना न मारता मधाचे संकलन कसे करता येईल यावर संशोधन झाले. त्यातून मधमाश्यांना लाकडी पेटीत कसे सुरक्षित ठेवता येईल व मधसंकलन करता येईल याचा विचार सुरू झाला. त्यातून शास्त्रीय लाकडी पेटीचा शोध व त्याची निर्मिती झाली. मधमाशीपालन हा खऱ्या अर्थाने अहिंसक आणि किफायतशीर उद्योग म्हणून सुरू झाला व पुढे स्थिरावला. यात पुढे अनेक सुधारणा झाल्या. १५ व १६ व्या शतकात लाकडी पेट्यांमध्ये बरीच सुधारणा झाली. शास्त्रज्ञांनी मधमाशीची रचना व जीवनचक्र या विषयी माहिती मिळवली. यातून जगभरात या व्यवसायाला मोठी चालना मिळाली. 

शास्त्रज्ञांचे लक्ष मधमाशीवर 
पुढे मधमाश्यांशी संबंधित अनेक अभ्यास झाले. हॉर्न बोस्टेल यांनी १७४४ मध्ये मेणाचा अभ्यास केला. स्प्रेगल यांनी १७९३ मध्ये फुलांच्या फलनप्रक्रियेत मधमाशीचे कार्य जगाला दाखवून दिले. भारतात १८८० मध्ये सर्वप्रथम लाकडी चौकटीच्या पेट्या वापरून मधमाशीपालनाचा प्रयोग प्रथम बंगाल मध्ये व नंतर पंजाबमध्ये केल्याची नोंद आढळते. भारतात त्या वेळी तार खात्यातील कर्मचारी जॉन डग्लस याने या संदर्भातील तांत्रिक माहिती देऊन हा व्यवसाय शिकवल्याची नोंद आहे. भारतात म्हैसूर, त्रावणकोर, पंजाब, मद्रास (आताचे चेनई) या भागातून मधमाशीपालनाच्या या तांत्रिक उद्योगास चालना मिळाली. 

संघटनेची स्थापना 
पुढे जाऊन १९३९ मध्ये अखिल भारतीय मधमाशीपालन संघटनेची (All India Bee-Keepers Association) ची स्थापना झाली. आज भारतातील महत्त्वाच्या मधसंकलन होणाऱ्या राज्यांत मधमाश्यांना भरपूर मकरंद आणि पराग देणाऱ्या वनस्पतींचा अभ्यास होत अाहे. अशा वनस्पतींच्या लागवडीसाठी आणि संगोपनासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. याला विकासाचा मोठा महामार्ग आपण नक्कीच म्हणू शकतो. 

उद्योग म्हणून मिळाली मान्यता 
मधमाशीपालनातून मधासारखा गोड व बहुगुणी पदार्थ तर मिळतोच; परंतु मधमाश्यांमार्फत जलद होणाऱ्या परागीभवनामुळे जंगल संपत्ती आणि शेती उत्पादनाच्या वाढीमुळे एक अनन्यसाधारण व्यवसाय म्हणून आज मधमाशीपालनास मान्यता प्राप्त होऊ लागली आहे. शेतीच्या विकासासाठी, देशाच्या समृद्धीसाठी आधुनिक मधमाशीपालन आणि त्यांचे संवर्धन खूप महत्त्वाचे आहे. आपण सर्व जण या मोहिमेत सहभागी होऊयात. भावी पिढीच्या प्रगतीसाठी उत्तम, विषमुक्त, सकस अन्न त्यामार्फत तयार करूयात. 

प्रशांत सावंत- ९१७२९५५५७६ 
सारिका सासवडे- ९४२३५७७१९६ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com