युरोपच्या बाजारावर यंदा भारताचे वर्चस्व ! 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 18 मार्च 2017

अलीकडील वर्षांतील डाळिंब निर्यात

  • २०१६- १७ : २ लाख २५ हजार मे. टन (फेब्रुवारीअखेर) 
  • २०१५-१६ : ३१ हजार ७२ मे. टन 
  • २०१४-१५ : २०, ९२७ टन 
  • २०१३-१४ : ३१, ३२८ टन

पुणे : गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळाला सतत तोंड देऊनही यंदा डाळिंबाची सव्वादोन लाख टनांपर्यंत विक्रमी निर्यात झाली आहे. त्यात सर्वाधिक निर्यात युरोपच्या बाजारात दोन लाख टनांपर्यंतची राहिली. त्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक राहिला. शिवाय या मार्केटमधील डाळिंबाचे दरही तेजीत राहिले. प्रतिकिलोला १३५ ते १५० रुपयांपर्यंतचा दर मिळाला. 

यंदा नोव्हेंबर-डिसेंबरपासूनच डाळिंबाच्या बाजारपेठेने चांगलीच उसळी घेतली. अगदी स्थानिक बाजारातही डाळिंबाला प्रति किलो ६० ते ६५ रुपयांपर्यंत दर मिळाला. तर निर्यातक्षम, रसायन अवशेषरहित (रेसिड्यू फ्री) डाळिंबाला युरोपीय बाजारात किलोला तब्बल १३५ ते १५० रुपयांपर्यंत दर मिळाला. गेल्या काही वर्षांत जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबाला युरोपीय देशांच्या तुलनेत बांगलादेश, नेदरलॅंड, रशियासह आखाती देशांत चांगली मागणी होती. मात्र यंदा युरोपनेच बहुतांश मार्केट काबीज केले. यंदा फेब्रुवारीअखेर सर्व देशांना एकूण निर्यात सुमारे सव्वा दोन लाख टनांपर्यंतची होऊ शकली. त्यात निम्म्याहून अधिक वाटा एकट्या महाराष्ट्राचा राहिला. देशात डाळिंब उत्पादनात महाराष्ट्राची आघाडी आहे. यंदा महाराष्ट्राने निर्यातीतही आघाडी घेतली. महाराष्ट्रापाठोपाठ कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात, तमिळनाडूमधूनही किरकोळ प्रमाणात निर्यात झाली. 

‘भगव्या’ला सर्वाधिक पसंती 
राज्यात डाळिंबाचे क्षेत्र सुमारे एक लाख हेक्‍टर तर देशात दीड लाख हेक्‍टर क्षेत्र आहे. राज्यात गणेश, मृदुला, आरक्ता आणि भगवा आदी वाणांचे उत्पादन घेतले जाते. त्यात भगवा वाणाला निर्यातीत जास्त पसंती आहे. आकार, वजन, रंग आणि चव या वैशिष्ट्यांमुळेच भारतीय डाळिंबाला मोठी मागणी आहे. 

नैसर्गिक संकटावर मात करत आघाडी 
गेल्या काही वर्षांत डाळिंबावरील ‘तेलकट डाग’ व ‘मर’ यांसारख्या रोगांमुळे डाळिंबाची प्रत काहीशी खालावत चालल्याचे चित्र होते; त्यातच सलगच्या दुष्काळामुळेही प्रश्‍न निर्माण झाले. मात्र अलीकडील काही वर्षांत या रोगावर उपाय शोधण्याचे प्रयत्न शेतकऱ्यांकडून होताना दिसत आहेत. नैसर्गिक संकटाला तोंड देऊनही उत्पादन आणि निर्यातीतील आघाडी त्यामुळेच महत्त्वाची मानली जाते. 

अलीकडील वर्षांतील डाळिंब निर्यात

  • २०१६- १७ : २ लाख २५ हजार मे. टन (फेब्रुवारीअखेर) 
  • २०१५-१६ : ३१ हजार ७२ मे. टन 
  • २०१४-१५ : २०, ९२७ टन 
  • २०१३-१४ : ३१, ३२८ टन

पूर्वप्रसिद्धी : अॅग्रोवन