उसाच्या मूल्यवर्धनावर होणार आंतरराष्ट्रीय जागर

उसाच्या मूल्यवर्धनावर होणार आंतरराष्ट्रीय जागर

‘व्हीएसआय’तर्फे १३ ते १६ नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय परिषद

पुणे - जागतिक साखर उद्योगातील आव्हाने व वाटचालीचा दिशादर्शक आढावा घेणारी आंतरराष्ट्रीय ‘शुगरकेन व्हॅल्यू चेन-व्हिजन २०२५’ परिषद १३ ते १६ नोव्हेंबर दरम्यान मांजरी येथील ‘व्हीएसआय’च्या आवारात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन होत असलेल्या या परिषदेला देशविदेशातील नामवंत शास्त्रज्ञ हजेरी लावणार आहेत.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे (व्हीएसआय) उपाध्यक्ष शिवाजीराव पाटील व महासंचालक शिवाजीराव देशमुख यांनी वार्ताहरांना या परिषदेची माहिती दिली. व्हीएसआयचे संस्थापक अध्यक्ष कै. वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्ष हे साखर उद्योगाच्या जागतिक विचार मंथनातून साजरे व्हावे, असा प्रस्ताव व्हीएसआयचे विद्यमान अध्यक्ष शरद पवार यांनी मांडला होता. पंतप्रधानांना ही संकल्पना सांगताच त्यांनी परिषदेत हजेरी लावण्यास होकार दिला, असे महासंचालक श्री. देशमुख यांनी सांगितले. 
 

देशविदेशातील दोन हजार प्रतिनिधींचा सहभाग लाभत असलेल्या या परिषदेचे नाव ‘शुगरकेन व्हॅल्यू चेन-व्हीजन २०२५’असे आहे. १३ नोव्हेंबर रोजी दुपारी ४.३० वाजता पंतप्रधानांच्या उपस्थितीत व्हीएसआयच्या मांजरी (जि. पुणे) येथील आवारात परिषदेला सुरवात होईल. 

या परिषदेत ११ देशांमधील शास्त्रज्ञ सहभागी होत आहेत. याशिवाय राज्यपाल सी. व्ही. राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, सहकारमंत्री सुभाष देशमुख, अन्नपुरवठा मंत्री गिरीष बापट या परिषदेत उपस्थित राहणार आहेत. 

असा असेल परिषदेचा उदघाटन समारंभ 
सायंकाळी ४.३०नंतर व्हीएसआय येथे पंतप्रधानांचे आगमन होणार अाहे, यानंतर ते ऊस प्रात्यक्षिकांना भेट देतील. परिषदेस सायं. ५ वाजता प्रारंभ होईल. व्हीएसआयच्या ध्वनिचित्रफितीचे प्रकाशन येथे होणार आहे.

एक लाख शेतकरी प्रदर्शनाला येणार
व्हीएसआय ही शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी स्थापन केलेली व ऊस पीक तसेच साखरनिर्मितीचे ज्ञान एकाच छत्राखाली देणारी जगातील एकमेव संस्था समजली जाते. या परिषदेच्या निमित्ताने विदेशी तंत्रज्ञ व शास्त्रज्ञांकडून ऊस व साखर उद्योग समजून घेण्याची संधी भारताला मिळणार आहे. याशिवाय परिषदेच्या निमित्ताने  १४ ते १६ नोव्हेंबरला सकाळी ९.३० ते ५.३० या दरम्यान शेतकऱ्यांना प्रात्यक्षिके व प्रदर्शनाला मोफत प्रवेश राहील. त्यामुळे किमान एक लाख शेतकरी या वेळी भेट देतील, असा अंदाज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com