‘पर्यावरणाचा समतोल राखण्यात पक्षी-प्राण्यांची भूमिका महत्त्वाची’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 डिसेंबर 2016

जायकवाडी अभयारण्यात आंतरराष्ट्रीय पक्षी महोत्सव 

पैठण, जि. औरंगाबाद - आजची माणसे वनसृष्टी नष्ट करण्याचे काम करीत असल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालले आहे. याकरिता पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी महत्त्वाचा घटक असणारे पक्षी व प्राणी जगविण्याची जबाबदारी महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन वन तथा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी (ता. २६) केले. 

महसूल व वन विभाग आणि एन्व्हायर्न्मेंटल रिसर्च फाउंडेशन अँड एज्युकेशनल अॅकाडमी यांच्या संयुक्त विद्यमाने पैठण तालुक्‍यातील जायकवाडी उत्तर येथे अभयारण्य परिसरात आयोजित आंतरराष्ट्रीय पक्षी महोत्सवाच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर आदर्ड आदी उपस्थित होते. 

पक्षाच्या प्रतिकात्मक निवास्थानाचे पूजन करून पक्षी महोत्सवाचे उद्‍घाटन करण्यात आले. प्रास्ताविक पक्षिमित्र डॉ. दिलीप यार्दी यांनी केले. वनमंत्री मुनगंटीवार म्हणाले, माणसाच्या चुकीच्या कृतीमुळे वरदान ठरलेली जंगले नष्ट होत आहेत. यापुढील काळात कोणता देश धनसंपन्न आहे हे बघण्यापेक्षा कोणता देश वनसंपन्न आहे याचा विचार जागतिक पातळीवर केला जाणार आहे. वनसंपदा जपण्यासाठी यानंतर वन विभाग यासाठी पुढाकार घेऊन २५ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवून काम करणार आहे. 

जायकवाडी पक्षी अभयारण्याच्या जलाशयात पाणवनस्पती वाढली आहे. यामुळे अभयारण्यातील जीवसृष्टीला धोका निर्माण झाला आहे. यासाठी पाणी शुद्धीकरण शास्त्रोक्त पद्धतीने करावे लागणार असल्याची गरज पक्षिमित्र डॉ. दिलीप यार्दी यांनी व्यक्‍त केली. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पाणी आणि वन याची सुरक्षा ही काळाची गरज असल्याचे सांगत उद्‌घाटन सत्राचा अध्यक्षीय समारोप केला. 

जीवनातील आनंद कायम ठेवायचा असेल तर निसर्ग टिकवावा लागणार. यासाठी पक्ष्यांचे निरीक्षण व संवर्धन करून पक्षिमित्रांसह निसर्गप्रेमी नागरिकांसाठी पक्षी अभयारण्य चालतेबोलते विद्यापीठ म्हणून ओळखले जावे. 
- सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री 
 
Web Title: jayakwadi bird sanctuary