सिंचन खात्याचा अक्कलशून्य कारभार!

Jayakwadi Dam
Jayakwadi Dam

माणसाला धरणाची कल्पना सुचली ती वारंवार पडणाऱ्या दुष्काळामुळे. पाच हजार वर्षांपूर्वी इजिप्तमधील नाईल नदीवर जगातले पहिले धरण बांधण्यात आले. त्याची लांबी १०८ मीटर व उंची १२ मीटर आहे. सतत दोन तीन वर्षे दुष्काळ पडला तरी लाभक्षेत्रातले कालवे वाहत राहावेत, शेती भरभरून पिकावी, माणसांना आणि प्राण्याने रेलचेल पाणी मिळावे, अशा उद्देशाने धरण बांधले आणि तो उद्देश सफल झाला. नाईलचे खोरे समृद्ध झाले. हे उदाहरण संपूर्ण जगाला आदर्शवत वाटले आणि जगभर धरणं बांधायची चळवळ सुरू झाली. प्रत्येक देशात अनेक धरणं बांधली गेली. अजूनही बांधणे सुरुच आहे. दुष्काळाशी झुंज देण्याचा रामबाण उपाय सापडला. धरणामुळे शेतीउत्पादनात क्रांती झाली. शाश्वत विकासाची गुरुकिल्ली ठरली. 

धरणासाठी योग्य जागेची निवड, वाहक्षेत्रात पडणारा पाऊस, धरणात पाण्याची आवक, झालेल्या पाणी साठ्याचे काटेकोर मोजमाप, जलाशयातल्या पाण्याचा ऱ्हास, धरण बांधायचे तंत्र, कालवे काढण्याचे तंत्र, पाणी वापराचे तंत्र, अशा अनेक पैलूंवर वर्षानुवर्षे संशोधन होऊन सिंचन हे एक विकसित शास्त्र झाले. प्रत्येक बारकाव्यावर शतकानुशतकांचा अनुभव गठीत झाला. नवीन प्रकल्प उभारताना शास्त्र सुसंगतता ठेवली तर तंतोतंत प्रकल्प उभारणी होऊन त्यात थोडीसुद्धा चूक होणार नाही एवढी ही विद्याशाखा प्रगल्भ झालेली आहे. 

प्रचंड लोकसंख्येच्या देशात अन्नधान्य सुरक्षेला प्राधान्य देणे भाग होते. म्हणून सिंचनाचे क्षेत्र वाढवण्यावर भर देण्यात आला. जाचक अटी मान्य करुन मिळेल तिथून कर्ज काढून लहान-मोठ्या नद्यांवर धरणं बांधण्याचा सपाटा सुरू झाला. घाईगडबडीत नियम धाब्यावर बसवले गेले. शास्त्राला तिलांजली दिली गेली. भ्रष्टाचाराला धरबंध राहिला नाही. अंदाधुंद लुटालूट झाली आणि एकूणच नीतिमत्ता धुळीला मिळाली. धरणाची उपयुक्ततता विसरुरून फक्त भ्रष्टाचार करण्यासाठी नवनवे प्रकल्प उभे राहू लागले. शंभर हेक्टर सिंचन व्हायची मारामार तिथे पाचशे हेक्टरच्या योजना बनू लागल्या. यातच देशाचे अपरिमित नुकसान झाले. जायकवाडीच्या डाव्या कालव्याला पाणी पुरणार नाही, याची पक्की खात्री झाल्यावर उजवा कालवा बांधला गेला. पैसे खाणारे एवढे आंधळे झाले की त्यांना दुसरे कशाचेच भान राहिले नाही. दोन तीन वर्षे दुष्काळ पडला तरी पाणी पुरवण्यासाठी बांधलेली धरणं दुष्काळाच्या सुरवातीलाच तळ गाठत आहेत देश अफाट कर्जात बुडाला. 

अडीच तीन लाख हेक्टर सिंचन क्षमता असलेले जायकवाडी हे महाकाय धरण मराठवाड्याची भाग्यरेषा ठरेल, असे स्वप्न नियोजनकारांनी बघितले होते. भाग्यरेषा गेली उडत, ते बरमुडा ट्रंगल बनले आहे. जहाज असो, विमान असो त्या ट्रंगलमध्ये शिरले की गडप होते. त्याचा थांगपत्तासुद्धा लागत नाही. तसा जायकवाडीच्या डागडुजीवर दर वर्षी जो करोडोचा खर्च होतो तो बिनपत्याचा गडप होतो. तीच तीच काम दरवर्षी केली जातात. ते काम केल्याचे नुसते सोंग असते. पुढे पाठ मागे सपाट अशा पद्धतीने सावळागोंधळ चालू असून ती आता नित्याची बाब झाली आहे. डागडुजीवर सर्व लक्ष केंद्रीत झाल्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याचे काय करायचे याचा कोणी विचारच करत नाही. स्थापत्य अभियंत्यांनी पाणी वितरणाचा विचार करावा अशी अपेक्षा करणे हाच मुळात गाढवपणा आहे. कारण शेती, पिके, जमीन, सिंचन हे त्यांच्या अभ्यासाचे विषयच नाहीत. अभियंते सिंचनाच्या बाबतीत किती अडाणी असतात हे जायकवाडीचे चालू वर्षीचे उदाहरण घेऊन बघू. 

२०१६ मध्ये चांगला पाऊस झाला आणि अभावानेच कधीतरी भरणारे जायकवाडीचे धरण बऱ्यापैकी भरले. पावसाळ्याच्या आरंभापासून पाणीसाठा वाढत गेला. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये खरिपाची पिके ऐन भरात असताना दोन वेळा उघाड पडली. उघाडीच्या आधी जेमतेम पाऊस असल्यामुळे उघाडीच्या काळात पिकांना ताण बसला आणि नुकसान झाले. सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये कापूस, तूर ही द्विहंगामी पिके बहरात असताना जमिनीतला ओलावा कमी झाला. या काळात एक संरक्षित पाणी मिळाले असते तर उत्पादनात निदान सव्वापटीने वाढ झाली असती. ऑक्टोबरमध्ये रब्बीची बहुतेक पिके पेरली जातात. मूग, उडीद, ज्वारी, सोयाबीन काढल्यानंतर जमिनीत ओलावा राहत नाही. पाणी देऊनच रब्बीची पेरणी करावी लागते. ऑक्टोबर गेला, नोव्हेंबर गेला तरी नाथसागरतले पाणी पैठण सोडायला तयार नव्हते. ज्यांच्याकडे विहिरी होत्या त्यांनी विजेच्या जीवघेण्या लपंडावाशी मुकाबला करत जमेल तेवढे सिंचन करून पेरण्या उकरल्या. बहुतेकांनी पावसाच्या अर्धवट ओलीवर पेरले ते कुठे उगवले कुठे नाही. आमची भाग्यरेषा पैठणच्या वाळवंटात कशी रुतून बसलीय ते बघा. ओलाव्या अभावी उगवण व्यवस्थित न झाल्यामुळे झालेले नुकसान किती? 

गव्हाची पेरणी २० नोव्हेेंबर ते १५ डिसेंबरच्या आत व्हावी अशी कृषी विद्यापीठाची शिफारस आहे. या वर्षी नोव्हेेंबरच्या सुरवातीपासून चांगली थंडी होती. पहिल्या आठवड्यात पाणी मिळाले असते तर नोव्हेंबरमध्ये पेरण्या आटोपल्या असत्या. पेरणीची वेळ निघून गेल्यानंतर १५ डिसेंबरला पहिल्या आवर्तनाचा ओघळ कालव्यात आला. पहिले ५-६ दिवस जेमतेम एक फूट प्रवाह वाहिल्यावर मग कालवा भरला. कमी प्रवाह कामाचा ना काजाचा रात्रंदिवस वाहिला, ते वाया गेला. प्रत्यक्ष सिंचन २० डिसेंबर नंतर सुरू झाले. १० जानेवारीला सिंचन बंद झाले. त्यानंतर चार ते पाच दिवस घोटाभर पाणी झुळुझुळू वाहत राहिले. 

गव्हाची पेरणी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लांबली. पेरणीनंतर गव्हाला एकविसाव्या दिवशी फुटवे फुटतात. गव्हाची ही अति संवेदनशील अवस्था समजली जाते. या अवस्थेत अन्नद्रव्ये आणि पाणी कमी पडले तर फुटवे कमी फुटतात व त्याचा सरळ उतापदनावर परिणाम होतो. १० जानेवारीला बंद झालेले आवर्तन पुन्हा सुरु झाले २६ फेब्रुवारीला आणि सिंचन सुरू झाले २ मार्चला. १० जानेवारी ते २ मार्च, तब्बल ५० दिवसांचा खंड. पाण्यावाचून ५० दिवस कोणते पीक तग धरते ते सिंचन खात्याने सांगावे. गहू वीतभर वाढताच ताणामुळे अकाली निसवला. कुठले उत्पन्न आणि कुठला उतारा. बियाला बी व्हायची मारामार. हे सर्व धरणात पाणी उपलब्ध असताना, शेतकऱ्यांनी कोणापुढे डोके आपटावे? 

जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात उन्हाळी भुईमूग आणि सुरू उसाची लागवड गेली जाते. ती लागवड कोणी केली नाही, कारण आवर्तने किती आणि कोणत्या तारखांना मिळणार ते सिंचन खात्याने जाहीर केले नाही. १० जानेवारीपर्यंत शेत ओलवून १५-१६ जानेवारीपर्यंत भुईमूग पेरायचे कोणी धाडस केले असते, तर दुसरे आवर्तन सुरू होईपर्यंत (५० दिवसांत) पिकाची राखरांगोळी झाली असती. ज्यांना पिकांचा हंगाम माहीत नाही, पिकांची पाण्याची गरज समजत नाही, एवढेच काय पाण्याच्या दोन पाळ्यात किती अंतर असावे एवढी साधी गोष्ट कळत नाही त्यांच्या हातात पाणी व्यवस्थापन ठेवून शेतकऱ्यांचे किती वाटोळे करायचे? 

एक अधिकारी म्हणाला, ‘‘सल्लागार समितीच्या शिफारशीनुसार आम्ही कालव्यात पाणी सोडतो’’ पाणी केव्हा सोडायचे हे ठरवण्यासाठी सल्लागार समितीला विचारावे लागते. म्हणजे तुम्हाला त्यातले काही कळत नाही. आणि सल्लागार समितीत कोण असतात. लाभक्षेत्रातला कोणता डेटा त्यांच्याकडे असतो? कोणत्या वैज्ञानिक तत्त्वांच्या आधारे ते सल्ला देतात? त्यांच्या जवळ शास्त्रीय माहितीच नाही, अशा अडाण्यांचा सल्ला मान्य करणे हा सिंचन खात्याचा बावळटपणा नव्हे का? 

सिंचन खात्याने (अभियंतारूपी) एका निष्णात एमडी डॉक्टरला जहाज चालवायला दिलेय. जहाजात लाभ क्षेत्रातले शेतकरी भरले आहेत. अनियंत्रित जहाज झोकांड्या देत भरकटत बरमुडा ट्रॅंगलकडे वेगाने जात आहे. कोई बचा सके तो बचालो! 

पाण्याच्या किती पाळ्या मिळणार हे न समजल्यामुळे पीकलागवड झाली नाही. धरणात पाणी असल्यामुळे आवर्तने चालूच राहणार. जायकवाडीला धरण बांधून अडवलेले पाणी शेकडो कि.मी. लांबीच्या कालव्यातून प्रवास करत शेवटी गोदामाईलाच मिळणार! उद्धवा अजब तुझे सरकार! 
 

(लेखक कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आहेत.)

पूर्वप्रसिद्धी : अॅग्रोवन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com