आई एक नाव असतं... 

Kashibai More inspirational story
Kashibai More inspirational story

केवळ १५ गुंठेधारक कुटुंबाच्या काशीबाई झाल्या मुख्य कणा 

घराला घरपण असतं ते आईमुळे. कोल्हापूर जिल्ह्यातील मुडशिंगी येथील मोरे कुटुंबाची शेती म्हणाल तर जेमतेम १५ गुंठे. पण त्याचा बाऊ न करता घरच्या कर्त्या महिलेनं म्हणजे काशीबाईंनी मोठ्या जिद्दीने दुग्धव्यवसायाचा डोलारा सांभाळत घरची आर्थिक बाजूही पेलून धरली आहे. वयाच्या पाचष्टीतही न थकता २२ जनावरांचा सांभाळ त्या मायेने करतात. दोन भावांचे आणि ११ सदस्य असलेले संयुक्त मोरे कुटुंब काशिबाईंचा आदर्श व संस्कार घेऊन आश्वासक वाटचाल करीत आहे. 

प्रसिद्ध कवी फ. मु. शिंदे यांच्या आईवरील कवितेतील या सुरवातीच्या अोळी. कवी याच कवितेत पुढे आई म्हणजे काय हे सांगताना म्हणतो, की आई वासराची गाय असते. दुधावरची साय असते आणि लेकराची माय असते. 

कोल्हापूर शहरापासून सुमारे सात किलोमीटरवर मुडशिंगी नावाचे छोटे गाव आहे. कवीच्या कवितेतील ही आई आपल्याला काशीबाईंच्या रूपाने तिथे पाहायला मिळते. मोरे कुटुंबातील संजय (वय ४५ ) आणि प्रकाश (वय ३८ ) या दोघा बंधूंची ही आई. दोघांची सारी जडणघडण तिच्याच संस्कारातून झालेली. दोघा भावांची लग्ने झाली आहेत. आज दोन्ही भावांचे सुमारे ११ सदस्यांचे कुटुंब एकत्रित नांदते. अर्थात घराचा मुख्य कणा म्हणजे काशीबाईंचाच. 

मोठ्या हिंमतीच्या काशीबाई 

तसं पाहायला गेलं तर मोरे कुटुंबाची शेती जेमतेम १२ ते १५ गुंठे. त्यात शेती अशी काय पिकणार? 
पण काशीबाई मोठ्या हिंमतीच्या. पती गोविंदा (वय ६८) यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी आजपर्यंत संसार मोठ्या कष्टाने वाढवलेला. एवढेच नव्हे, तर घरच्या परिस्थितीला दुग्धव्यवसायातून आकार दिलेला. वाढत्या वयोमानानुसार पतीची दृष्टी थोडी क्षीण झालेली. तेही झेपेल ती कामे करतातच. पण काशिबाई मोठ्या हिंमतीच्या. आज वयाच्या पाचष्टीतही त्या २२ जनावरांना सांभाळ करताना जराही थकत नाहीत. 

गोठ्यातील नियोजन 

घरच्या एकूण क्षेत्रापैकी सात गुंठ्यांत गोठा आहे. म्हशींची पैदास घरीच केलेली आहे. सात म्हशी, सात रेड्यांसह दोन देशी गायी आहेत. जोडीला एक एचएफ. संकरीत गाय, दोन पंढरपूरी, एक मुऱ्हा म्हैस असे पशुधन आहे. गोठा म्हणाल तर साध्या पद्धतीचाच आहे. पहाटे पाच वाजता कुटुंबाचा दिवस सुरू होतो. आईसह मुले व सुना सौ. वंदना, सौ. वैशाली हे सर्व सदस्य गोठ्यातील कामाला लागतात. गोठ्यातील स्वच्छता, वैरण टाकणे, धारा काढणे ही सर्व कामे केली जातात. नऊ वाजेपर्यंत सगळी कामे आटोपली जातात. प्रकाश व संजय हे दोघेही नोकरी करतात. ते कामावर निघून गेले की गोठ्याची महत्त्वाची जबाबदारी काशीबाई यांच्यावरच असते. दुपारी दोन वाजेनंतर काशीबाई म्हशींना चरण्यासाठी बाहेर घेऊन जातात. सायंकाळपर्यंत फिरून आल्यानंतर जनावरे दावणीला बांधली जातात. संध्याकाळी पुन्हा कुटुंबातील व्यक्ती धारा काढणे, म्हशींना चारा देणे आदी कामांत रात्री आठपर्यंत गढून जातात. हा दिनक्रम रोजचा असतो. 

मुक्त वातावरणाचा जनावरांना फायदा 

जनावरे मुक्त वातावरणात फिरून आल्यामुळे त्यांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. 
उपलब्ध शेतीत मका, हत्तीघास यातून चारा उपलब्ध केला आहे. अडचणीच्या वेळी उसाचे वाढे, सुके गवतही विकत घेतले जाते. नियोजन केल्याने चारा कमी पडणार नाही याची दक्षता घेतली जाते. 

दुधाची गुणवत्ता 

गाभण व भाकडकाळाचा मेळ असल्याने गोठ्यातील दूध कधीही आटत नाही. बाराही महिने दूध उत्पादन सुरू असते. म्हशीच्या दुधास सात ते आठ इतका फॅट सातत्याने असतो. यामुळे दरही चागला मिळतो. एक म्हैस दिवसाला सरासरी सात ते आठ लिटर दूध देते. वर्षातील सात महिने 
दररोजचे दूध संकलन ६० लिटरपर्यंत असते. अन्य काळात ते १५ लिटरपर्यंतही खाली येते. म्हशीच्या दुधाला लिटरला ४७ रुपये दर मिळतो. 

शेणखतातून उत्पन्न 

दुधाच्या उत्पन्नाव्यतिरिक्त दर १२ दिवसांनी एक ट्रॉली शेणखत उपलब्ध होते. सुमारे १८०० रुपये दराने त्याची विक्री होते. क्षेत्र कमी असल्याने बाहेरूनही सुका चारा आणावा लागतो. त्यासाठी हे उत्पन्न उपयोगी पडते. 

म्हशींचे "गोकुळ" 

मोरे कुटुंबीयांच्या गोठ्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी घरचीच जनावरे मोठी करून दुग्धव्यवसाय फायद्यात आणला आहे. रेड्याची विक्री केली जाते. रेडी झाल्यास तिचे संगोपन केले जाते. एक मजेशीर आठवण सांगताना काशीबाई म्हणाल्या, की आमच्या गोठ्यात पंचवीस वर्षांपूर्वीची म्हैस आहे. ती अजूनही दूध देते. तिची चौथी पिढीही आमच्या गोठ्यात आहे. म्हणजे सगळ्या म्हशी या एकमेकींच्या नातेवाइकच आहेत. घरीच पैदास करून त्यांना सांभाळणे हा वेगळा आनंददायी अनुभव असल्याचे त्या सांगतात. संकरीत गाय मात्र खरेदी केलेली आहे. देशी गायीचे दूध औषध म्हणून गावांतील नागरिकांना मोफत दिले जाते. 

लळा जनावरांचा.. 

जनावरांना बाहेर चरावयास नेण्याचा काशीबाईंचा नेम गेल्या ३० वर्षांपासूनचा आहे. 
सुमारे २० ते २२ जनावरांवर या वयात एकट्याने नियंत्रण ठेवणे म्हणजे मोठे कसबच. पण काशीबाईंना ते खुबीने जमले आहे. म्हैस उधळली किंवा इतरांना दुखापत केली असे आजपर्यंत झाले नसल्याचे त्या अभिमानाने सांगतात. 

भावुक आठवण 

एके दिवशी म्हशी चरायला नेत असताना त्या ठेच लागून पडल्या. गुडघ्याला मोठी दुखापत झाली. त्यांना उचलून त्यांच्यावर उपचार करेपर्यंत सगळ्या म्हशी पुढे गेल्या. पण काही कालावधीनंतर एक म्हैस पुन्हा मागे परतली. काशिबाई ज्या ठिकाणी पडल्या होत्या त्या जागेवर येऊन उभी राहिली. ही आठवण सांगताना काशिबाई सदगदित झाल्याशिवाय राहात नाहीत. 

एक रुपयांचेही कर्ज नाही 

नोकरीतील उत्पन्नातून कुटुंबातील घरखर्च भागतो. पण बाकी खर्च सातत्याने सुरूच असतात. 
अशावेळी दुग्ध व्यवसायातील उत्पन्नच महत्त्वाचे असते. याच उत्पन्नातून घरातील लग्न कार्ये पार पडली. टुमदार घर झाले. ही सगळी गोठ्यातील जनावरांचीच कृपा असल्याचे कुटुंबातील सदस्य म्हणतात. अत्यंत अल्प जमीन असतानाही सुमारे वीस लाख रुपयांचे पक्के घर कुटुंबाने बांधले. विशेष म्हणजे एक रुपयाचेही कर्ज कुटुंबाच्या खांद्यावर नाही. आज अल्पभूधारक मोरे कुटुंबाने दुग्धव्यवसायातून जे साध्य केले त्याचा आधार आहे काशीबाई. त्यांच्याच मायेची पाखर आज कुटुंबाला आणि व्यवसायाला सक्षम करीत आहे. 
संजय मोरे - ९७६३४६९६४४ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com