द्राक्षशेतीवरील संकटांचा बळी माणिक 

द्राक्षशेतीवरील संकटांचा बळी माणिक 

नाशिक - फयानच्या वादळानंतर द्राक्षाला उतरती कळाच लागली... कधी वादळ, कधी गारपीट, कधी थंडी... तर कधी व्यापारीच बोगस... पाच वर्षांपासून उत्पन्नाचा पत्ता नाही... त्यात मागच्या वर्षी माणिकचं ‘बायपास’ ऑपरेशन झालं... एका नातीचं लग्न झालं... नंतर मलाही दवाखान्यात ‘ॲडमिट’ करावं लागलं होतं... देणेकऱ्यांचा तगादा चालूच आहे... कर्ज तर महामूर झालंय... कुठूनच यायला मार्ग नाही. शेतीचं चाक रुतून बसलंय... कसं बाहेर निघेल?... कोण काढील?... अशोकराव बाबूराव रणदिवे सांगत होते. 

अशोकराव रणदिवे यांना दोन मुलं. दोन नंबरच्या माणिकनं शनिवारी (ता. २२) घराजवळच्याच आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केलेली. दुसऱ्या दिवशी (रविवारी) राखेचा कार्यक्रम आटोपल्यानंतर नातलगांसोबत घरापुढच्या पेरूच्या झाडाखाली हताश अशोकराव, मुलगा शंकर शून्यात नजर लावून बसले होते. दुर्घटनेला चोवीस तास उलटून गेले होते. अजूनही या धक्क्यात सगळं कुटुंब होतं... 

मुलगा माणिकनं आत्महत्या केली. त्याचं वय ३४ होतं. अशोकराव यांचं वय आजमितीस ७९ वर्षे आहे. आतापर्यंतच्या आयुष्यात असंख्य उन्हाळे, पावसाळे पाहिलेत; पण शेतीची अशी बारादारी पहिल्यांदाच पाहत असल्याचं अशोकरावांनी बोलताना सांगितलं. म्हणायला बागाईतदार; पण घरात कुटुंबाला खाण्यासाठी बाजरीसुद्धा मागच्या वर्षी एकाकडून २४०० रुपये उसनवार आणून विकत घेतली असल्याचं सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले होते. 

रणदिवे कुटुंबाचं एकूण ४ एकर क्षेत्र. सुरवातीला संपूर्ण क्षेत्रावर द्राक्ष पीक होतं. मात्र तीन वर्षांपूर्वी एक एकर बाग तोडून टाकली आहे. मागची सहा- सात वर्षे संकटांची अन् अडचणींची गेली असताना मागील पाच वर्षांपासून सोसायटीचं अन बॅंकेचं पीक कर्ज थकीत होऊन सगळं कर्ज साडेबारा लाखांच्या वर गेलं आहे. त्यात ट्रॅक्‍टर एका फायनान्स कंपनीकडून कर्ज घेऊन घेतलेला असताना, त्या कंपनीचं कर्ज जवळपास फेडत आणलंय. मात्र कंपनीच्या एजंटांचे तगादे, धमक्‍या, अरेरावी नेहमीचीच. रणदिवे कुटुंबावर असं कर्ज सतत वाढत असल्यानं ते फेडावं कसं, ही चिंता प्रत्येकाला पोखरत होती..

तीन एकरांत काही शरद सीडलेस रंगीत वाण, तर काही थॉमसन सफेद वाण. तसं द्राक्ष पीक १४ वर्षांपासूनचं. मात्र मागील काही वर्षं सर्वांत वाईट.. यंदाच्या वर्षी माल एक नंबर झालेला. व्यापाऱ्यानं मागच्या महिन्यात बागेतच व्यवहार केलेला. त्यानं निवडून माल खुडून नेलेला. मालाचे पैसे देण्यासाठी मात्र टाळाटाळ सुरू.. अजून निम्मा माल द्यायचा बाकी होता.. गुरुवारी अचानक व्यापाऱ्यानं माणिकला फोन करून सांगितलं, की ‘‘तुमचा माल उद्यापासून बंद करा. मला बाजारात परवडत नाहीय.’’ व्यापाऱ्याने नेलेल्या मालाचे पैसेही दिले नाहीत. सुरू केलेला माल घ्यायलाही नकार दिला. आधीच अडचणीत असलेल्या माणिकला हा आणखी एक धक्का होता. निराश झालेल्या माणिकने स्वतःला दोष दिला अन् शनिवारी मध्यरात्रीनंतर ३ वाजता हातात दोर घेऊन शेताजवळचं आंब्याचं झाड गाठलं.. अन् त्याला दोर अडकवून गळफास लावून घेतला.. रणदिवे कुटुंबासह सबंध परिसर निद्रेत होता. सकाळी प्रकार लक्षात आल्यानंतर मात्र सर्वांचीच झोप उडाली होती.. 

माणिकच्या मृत्यूपूर्वी रणदिवेंच्या बागेतील १२५ क्विंटल माल व्यापाऱ्याने खुडून नेलाय. भाव १८ रुपयाने ठरला होता. अजून १२५ क्विंटल माल तसाच वेलीवर शिल्लक आहे. त्याचं काय करायचं, हा प्रश्‍न अद्याप अनुत्तरित आहे. किलोला खर्च २५ रुपये अन् भाव ठरला होता १८ रुपये. तेही पैसे देण्यास टाळाटाळ.. किमान ४० रुपये दराने भाव ठरला असता व ते पैसे मिळाले असते तर कर्जाचा भार उतरण्यास मोठी मदत झाली असती. कदाचित माणिकने हे आत्मघाताचं पाऊल उचललं नसतं, अशी चर्चा भेटायला आलेल्या नातलगांमधून उमटत होती.

गारपिटीचा १ रुपयाही मिळाला नाही
वर्ष २०१४ च्या फेब्रुवारी महिन्यात झालेल्या गारपिटीने रणदिवे यांच्या बागेचे शंभर टक्के नुकसान झाले होते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास दौरा करून दिंडोरी तालुक्‍यातील शेतकऱ्यांना मदतीचे आश्‍वासन दिले होते. रणदिवे यांच्या बागेचा पंचनामा झाला. त्यांनी सातबारासहित सर्व कागदपत्रे तलाठी कार्यालयात जमा केली होती. मात्र आपत्तीच्या तीन वर्षांनंतरही त्यांना एक रुपयाचीही मदत मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले.

मागच्या वर्षी जमीन विक्रीला काढली होती
रणदिवे कुटुंबाची इनमिन चार एकर शेती. कर्ज फेडण्यासाठी अशोक रणदिवे यांनी मागील वर्षी २ बिघे जमीन विक्रीसाठी काढली होती. पण घेणारा खरेदीदार संपूर्ण जमीन पाहिजे या मागणीवर अडून बसला होता. मात्र, भूमिहीन होण्याची कल्पना सहन होण्याजोगी नसल्याने रणदिवे यांनी त्या व्यवहारास नकार दिला होता.

आपत्तीसह सरकारी अनास्थेचा बळी
राज्यात फलोत्पादनात अग्रेसर असलेल्या नाशिक जिल्ह्यातील शेती संकटात सापडली आहे. द्राक्ष हे सर्वाधिक उलाढालीचं पीक मागच्या काही वर्षांपासून असंख्य अडथळ्यांशी झुंज देत आहे. इतर भागात एरवी एक लाखाच्या आत कर्ज असलेला शेतकरीही आत्महत्येच्या मार्गाने जातो. तिथे कर्ज २० लाखांच्या पुढे गेलं तरी न डगमगणारा द्राक्ष उत्पादक यंदा कोलमडून पडला आहे. मागील चार- पाच वर्षे नैसर्गिक आपत्तीशी झुंजण्यात गेली. यंदा खर्चाच्या निम्माही दर मिळत नाही. घरातील सोनंनाणं गहाण पडलं आहे. औषध दुकानदार, देणेकरी, सावकारी यांचे तगादे सुरू झाले आहेत. यामुळे सबंध द्राक्षपट्ट्यात हताशा पसरली आहे. दिंडोरी तालुक्‍यातील खेडगाव येथील माणिक अशोक रणदिवे हा या हताश स्थितीचा बळी ठरला आहे.

शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत अजिबात पोचत नाहीत. दिंडोरीच्या कृषी विभागात मागील वर्षी ठिबक अनुदानाची १०४ प्रकरणे शिल्लक होती. यंदा ४५० प्रस्ताव पडून आहेत. अनुदान फाइल बनविण्यासाठी म्हणून शेतकऱ्यांकडून ५ हजार रुपये घेतले जातात. पण शेतकऱ्याला काहीच मिळत नाही.
- कवी प्रा. संदीप जगताप, चिंचखेड, ता. दिंडोरी, जि. नाशिक 

बोगस औषधे कंपन्या, व्यापारी यांच्याकडून होणारी द्राक्ष उत्पादकांची अडवणूक थांबेल कधी?
- महेश ठुबे, खेडगाव, ता. दिंडोरी, जि. नाशिक

खते, औषधे या सगळ्यांसाठी एम.आर.पी. आहे, मग शेतमालासाठीसुद्धा अशी एम.आर.पी. असायला पाहिजे.
- अशोक पाटील, सोनजांब, ता. दिंडोरी, जि. नाशिक 

सरकारच्या अनास्थेमुळेच शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांनी एक होऊन आक्रमक होण्याची वेळ आली आहे.
- धनराज महाले, माजी आमदार, दिंडोरी, जि. नाशिक

कधी नव्हे इतका शेतकरी चहूबाजूंनी कोंडीत सापडला आहे. शेतकऱ्यांत प्रचंड असंतोष आहे. सरकारने याकडे गांभीर्याने पहावे.
- सुरेश डोखळे, प्रयोगशील शेतकरी, खेडगाव, ता. दिंडोरी, जि. नाशिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com