एकमेकांचे कष्ट मिळून पेलले; शेतीचे अर्थकारण उंचावले

एकमेकांचे कष्ट मिळून पेलले; शेतीचे अर्थकारण उंचावले

पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज महिला सर्व क्षेत्रांत भरारी घेताना दिसत आहेत. किंबहुना केवळ पती किंवा केवळ पत्नीच्या खांद्यावर सारा डोलारा येण्यापेक्षा एखाद्या क्षेत्रात दोघांनी मिळून श्रम केले तर त्यात पुढे जाणे त्यांना अधिक सुकर होते. एकमेकांना समजून घेत दोघेही आपापला भार वाटून घेत असतात. त्यामुळे श्रम हलके होऊन जातात व केलेल्या श्रमांचेही चीज होऊन जाते. 

उस्मानाबाद परिसरातील आजूबाजूचा दहा- पंधरा किलोमीटरचा टापू हा निव्वळ खडकाळ भाग. याच तालुक्यात उस्मानाबादपासून बार्शी रस्त्यावर सात किलोमीटरवर तिनेक हजार लोकवस्तीचे घाटंग्री गाव आहे. तिथे शंकर आणि पार्वती या नावाचे विभूते जोडपे एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून शेतीत लढते आहे. शेतीचे अर्थकारण अधिकाधिक फायदेशीर करण्याचा प्रयत्न करते आहे. 

सुरवातीचा संघर्ष  
पार्वती यांचा विवाह वयाच्या चौदाव्या वर्षीच शंकर यांच्याशी झाला. त्यांना शेतीचा यापूर्वी अनुभव नव्हता. खुरपणं, कोळपणं, धस्कटं वेचणं, पीक कापणी अशी कामे त्या पतीसोबत करू लागल्या. तिचे आई-वडील गुजरातमध्ये. तिथे त्यांचा संघर्ष सुरू होता. शेतातून फारसे काही मिळायचे नाही. कोरडवाहू ज्वारी, तूर, अंबाडी एवढीच काय ती पिके असत. गावात उपासमार होण्यापेक्षा पती-पत्नी गांधीधामला उदरनिर्वाहासाठी गेले. दोनच वर्षांत म्हणजे २००२ मध्ये भूजमध्ये भूकंप झाला. मग पुन्हा शेतीतल्या तुकड्याच्या भरवशावर दोघे गावी पुन्हा घाटंग्रीला आले. सासरे जगन्नाथ मजुरी करायचे.  विहिरी खोदण्याचे काम करायचे. पोरगा शेतात काहीतरी प्रयत्न करण्यासाठी आला ही बाब त्यांच्यासाठी  आशादायक ठरली. त्यातून बोअर घेतले. गहू, हरभरा अशी रब्बीची थोडीबहुत पिके निघू लागली. 

संसाराला मदत  
मधल्या काळात घरखर्चाला मदत म्हणून पार्वतीने शिवणकाम शिकून घेतले. पहाटे लवकर उठून घरकामांबरोबर त्यांचे शिवणकाम सुरू होई. रात्री अगदी साडेदहा- अकरा वाजेपर्यंत कामाचा गाडा सुरू राही. दरम्यान गावात महिला बचत गटाची चर्चा चालू होती. तेथील एका संस्थेने पार्वती यांचे गणित, हिशोब व व्यवहाराची जाण या बाबी हेरून सुवासिनी सखी महिला गटाच्या अध्यक्षपदासाठी निवड केली. दररोज पन्नास रुपये बचत करून दहा महिलांनी मिळून सव्वा लाख रुपये जिल्हा बॅंकेत जमा केले. त्यातून त्या एकमेकींची संसाराची नड भागवत. या कामात आत्मविश्वास आल्यानंतर काही दिवसांनी प्रेरणा महिला गट सुरू केला. त्यातून एक वर्ष शाळेचा खाऊ बनवण्याचे काम पार्वतीने केले.

शेतीचा विकास  
इकडे संसार वाढू लागला. शेताच्या वरच्या बाजूला पाझर तलाव झाला. मग विभूते दांपत्य शेतीच्या नियोजनात अधिक लक्ष घालू लागलं. हळद, भाजीपाला करून चांगलं उत्पादन ते घेऊ लागले. शेती-मातीशी लळा वाढला. शिवपार्वती महिला गटाच्या माध्यमातून बीजप्रक्रिया, बियाणे बॅंक, गांडूळ खत अशी कामे करता येऊ लागली. पार्वती यांचा स्वभाव बोलका, धीट असल्याने त्यांना संवाद सहाय्यक हे पद दिले गेले. त्यातून थोडेफार मानधन मिळू लागले. सन २०१५ मध्ये कळंब, पाटोदा, जहांगीरवाडी, अनसुर्डा येथील पाणलोट प्रकल्प, फुलशेती, भाजीपाला शेती आदी अनुभव सहलीच्या निमित्ताने पाहणे शक्य झाले. शासकीय योजनांची माहिती होऊ लागली. मुलांचे शिक्षण, कपडेलत्ते, आजारपण असा घरखर्चही वाढत होता, मग पिठाची छोटी गिरणी, डाळमिल,  पापड्या, मिरची पूड असे पूरक व्यवसाय वाढवले. त्यासाठी स्वयंशिक्षण प्रयोग परिवाराकडून तीनवेळा कर्जही मिळाले. तो आधार उभारी देणारी ठरला. 

फुलशेतीचा प्रयोग  
पार्वती यांची जाऊ गलांडा शेती करीत होती. आपणही हा प्रयोग करून पाहू असे ठरले. मात्र ज्वारीच्या जागी फुले लावली तर खायचे काय असाही विचार घरून तयार होत होता.पण तरीही धाडस करून थोड्या क्षेत्रात गलांड्याची रोपे आणून लावली. दोन दिवस शेताकडे न जाता शिलाई करून साडेतीनशे रुपये पार्वती यांनी जमा केले. त्यातून खुरपणीची मजुरी दिली. फुले येण्यास अजून साडेतीन महिने तरी होते. त्या काळात मध्ये आंतरपीक म्हणून कोथिंबीर घेऊन तीन हजार रुपयांचे उत्पन्न घेतले. कांदे, भाजीपाला घेतला. आश्वासक उत्पन्न हाती आले. 

फुलशेतीत स्थिरता 
आज विभूते दांपत्य सुमारे अर्धा एकर क्षेत्रात नियमित फुलशेती करू  लागले आहे. शंकर यांच्यावर उस्मानाबादला नेऊन फुलांची विक्री करण्याची जबाबदारी असते. त्यासाठी मोटारसायकलही त्यांनी घेतली आहे. मुलेही आई-वडिलांना सुट्टीत शेतीत मदत करतात. पार्वती यांच्या गटातील दहा महिला आज फुलशेतीत आहेत. त्यातील दहाजणी प्रत्येकी दहा हजार रुपये एकत्र करून गुजरात- सुरतकडे कपडे खरेदी करून एकत्र विकण्याचे काम करतात. विभुते दांपत्याला महिन्याला अर्धा एकरातून किमान दहा हजार रुपयांचे उत्पन्न फुलशेतीतून मिळते. वर्षातील सहा महिने एक प्लॉट चालतो. तो संपायच्या काही दिवस आधी दुसऱ्या जागेत अर्ध्या एकरात फुले लावली जातात. प्रति सहा महिन्याला साठ हजार रुपयांचे तर वर्षाला सुमारे एक लाख दहा हजार रुपयांचे उत्पन्न अर्धा एकर क्षेत्र देऊन जाते.  

गलांड्याच्या एरवी किलोला २० रुपयांपर्यंत तर गणपती, दिवाळी, लग्नसराई आदी सणासुदीत २५ रुपयांपर्यंत दर मिळतो. नुकत्याच झालेल्या शिवजयंतीला सात क्विंटल माल निघाला. वर्षभर दर्जेदार फुले येण्यासाठी सेंद्रीय, गांडूळ खत, दशपर्णी, निंबोळी अर्क आदींचा वापर करण्यावर भर असतो. 

अर्थकारण उंचावले  
दोन वर्षांपूर्वी दोन पंढरपुरी म्हशीही घेतल्या. दररोज सुमारे १० ते १५ लिटर दुधाचा रतीब शंकर घालतात. त्यास ५० रुपये प्रति लिटर दर मिळतो. अन्य शेतीत तूर, मूग, उडीज, चाऱ्यासाठी गजराज गवत असते. मध्यंतरी पांढऱ्या शेवंतीची रोपे पुण्याहून आणून प्रयोग केला. विभूते यांची मोठी मुलगी भाग्यश्री आजोळी भूमला दहावीत शिकते. लहानी धनश्री सातवी तर मुलगा तिसरीत इंग्रजी शाळेत उस्मानाबादला शाळेच्या गाडीने जातो. मागील वर्षी शिल्लक बचतीतून उस्मानाबादमध्ये दांपत्याने प्लॉट घेतला आहे. घरचा सेंद्रीय भाजीपाला कुटुंबाला मिळतो. गावातील सावकारी बंद झाली. बॅंकेचे व्यवहार पार्वती सांभाळतात. दररोज २०० रुपये बचत करून त्यांनी वर्षभराची चांगली बचत साधली आहे. त्यांच्याच प्रेरणेतून गावातील अन्य महिलांनी वेगवेगळे उद्योग सुरू करून अर्थकारण सुधारण्याचा प्रयत्न केला आहे. 
 सौ. पार्वती शंकर विभुते, ९८२२६३४०३४. ९६०४५२१२९१
(लेखक लातूर कृषी विभागांतर्गत मंडळ कृषी अधिकारी आहेत.) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com