बंपर शेती उत्पादनामुळे बाजार समिती मालामाल

पांडुरंग उगले 
सोमवार, 22 मे 2017

सभापतिपदाचा पदभार घेतला तेंव्हा येथील कर्मचाऱ्यांच्या सात महिन्यांच्या पगारी थकल्या होत्या. पगारीपोटी पाऊन लाख, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भविष्यनिर्वाह निधी, ग्रॅच्युइटी, कर्जाचे व्याज असे एकूण अंदाजे २ कोटी रुपयाचे देणे आतापर्यंत दिले आहे. कार्यालयात काटकसरीने खर्च करण्यात येत आल्याने एक ते दीड कोटी रुपये शिल्लक आहेत. यापुढेही आम्ही कर्मचारी, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊ.

- अशोक डक, सभापती, माजलगाव बाजार समिती.

माजलगाव, जि. बीड - मागील वर्षी परतीच्या पावसाने दिलासा दिल्यामुळे खरीप, रब्बीची सुगी जोमात आली. यामुळे शेतमालाचे बंपर उत्पादन झाले. बाजार समितिलाही मोठा आर्थिक फायदा झाला आहे. मागील आठ महिन्यांत (सप्टेंबर १६ ते एप्रिल १७) माजलगाव बाजार समितीला कापूस, तूर आदी शेतमालाच्या खरेदी-विक्रीच्या बाजार व देखभाल शुल्कापोटी तब्बल ४ कोटी ०३ लाख ३५ हजार ४८३ रुपयांचे उत्पन्न मिळाले. 

शेतकऱ्यांच्या मालाला योग्य किंमत मिळावी यासाठी लिलाव पद्धतीने स्पर्धा व्हावी, मालाचे पैसे मिळण्याची हमी देता यावी, यासाठी १९६४ मध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती कायदा करून १९६७ पासून त्याची अमलबजावणी करण्यात येत आहे. याठिकाणी शेतकऱ्याच्या विकलेल्या मालावर बाजार समितीला शेकडा एक रुपया बाजार शुल्क तर, पाच पैसे देखभाल शुल्क मिळते.

सतत चार वर्षांच्या दुष्काळानंतर मागील वर्षी झालेल्या समाधानकारक परतीच्या पावसाने सर्वांनाच दिलासा दिला. यामुळे शेतकऱ्यांची खरीप, रब्बीची सुगीही जोमात आली. कापूस, तूर, सोयाबीन,  मुग, हरभरा पिकाचे बंपर उत्पादन झाले. शेतकऱ्यांनी हा सर्व माल मोंढ्यात विकल्यामुळे माजलगाव बाजार समितीला बाजार शुक्लाच्या स्वरुपात तब्बल चार कोटी रुपयांची कमाई झाली आहे. 

सप्टेंबर २०१६ ते एप्रिल २०१७ या आठ महिन्यात ७५ हजार ४९२ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली असून त्याची किंमत ३८ कोटी १२ लाख ३३ हजार ५८८ रुपये होते. कापूस खरेदीने तर विक्रम केला असून ता. ३ एप्रिल २०१७ पर्यंत तब्बल ३१५ कोटी ३० लाख ५१ हजार ८९७ रुपयाचा एकूण ६ लाख १२ हजार ९७८ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे तर, सोयाबीनची खरेदी ८८ हजार ४९९ क्विंटल झाली असून त्याची किंमत २० कोटी २७ लाख ६ हजार ७२ रुपये होते. यासह मुग, गहू, ज्वारी, बाजरी, हरभरा मालाची १० कोटी ४४ लाख ८३ हजार १०४ रुपयाची खरेदी झाली आहे. यावर्षी जिनिंग, मोंढ्यात कापूस, अन्नधान्य मालाची एकूण ३८४ कोटी १४ लाख ७४ हजार ६६१ रुपयांची खरेदी झाली आहे. या रकमेच्या १ टक्का बाजार शुल्क म्हणून बाजार समितीला आठ महिन्यांत तब्बल ३ कोटी ८४ लाख १४ हजार ७४६ रुपये ते, देखभाल शुल्क म्हणून १९ लाख २० हजार ७३७ रुपये असे एकूण ४ कोटी ३ लाख ३५ हजार ४८३ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.