गिरणी उद्योगातून उभारला उत्पन्नाचा शाश्‍वत स्त्रोत

pusha-mahajan
pusha-mahajan

महाजन कुटुंब मूळचे पिळोदे (ता. यावल, जि. जळगाव) येथील आहे. १९८१ पासून महाजन कुटुंबीय जळगाव शहरातील संत मुक्ताई तंत्रनिकेतनजवळील मुक्ताईनगरात राहत आहेत. पुष्पाताई यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. त्यांचे पती विजय हे जिल्हा सहकारी दूध संघात कार्यरत होते. ते आता निवृत्त झाले असून, पुष्पाताई यांना पापड निर्मिती व धान्य दळण्याच्या व्यवसायात मदत करतात. त्यांचा मुलगा चंदन हा वाणिज्य शाखेतील पदवीधर आहे. तोदेखील आपल्या आईवडिलांना या व्यवसायात मदत करतो.

गिरणी उद्योगाला सुरवात  
पुष्पाताईंनी १९८९ मध्ये नऊ बाय नऊ फूट आकाराच्या लहानशा खोलीत एक पिठाची गिरणी सुरू केली. घराला आर्थिक हातभार लागावा आणि आपण घरच्या घरी काही तरी उद्योग समर्थपणे करायला हवा, या विचारातून पुष्पाताईंनी ‘स्वाती फ्लोअर मिल` या नावाने गिरणी सुरू केली. या गिरणीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्या वेळेस सुशिक्षित बेरोजगार म्हणून त्यांनी एका राष्ट्रीयीकृत बॅंकेकडून २५ हजार रुपये कर्ज घेतले होते. या वेळी त्यांना सहा हजार रुपये अनुदान मिळाले होते. या कर्जाची परतफेड त्यांनी केली. त्या वेळेस त्यांचे पती विजय हे जिल्हा सहकारी दूध संघात कार्यरत होते. दूध संघ मुक्ताईनगरपासून अगदी जवळ असल्याने तेथून आल्यानंतर विजय हे पुष्पाताईंना गिरणीच्या कामात मदत करायचे. सुटीच्या दिवशीही विजय हे गिरणीचे काम सांभाळायचे. दोघांमध्ये कमालीची कष्टी वृत्ती असल्याने अनेकदा रात्री उशिरापर्यंत पिठाची गिरणी सुरू राहायची. 

गिरणीचा व्यवसाय चांगला चालत असल्याचे लक्षात घेता पुष्पाताईंनी मिरची मसाला दळण्याची लहान गिरणी घेतली. या गिरणीचा व्यवसायही जोमात सुरू होता. परिसरातील गृहिणींनीच या गिरणीचा प्रचार केला. कारण त्या वेळेस मिरची मसाला दळण्याची गिरणी हे नवीन तंत्रज्ञान मानले जायचे. आणखी एक पिठाची गिरणी त्यांनी घेतली. गिरण्यांमध्ये जे नवे तंत्रज्ञान यायचे ते लागलीच पुष्पाताई यांच्यापर्यंत पोचायचे. कारण त्यांनी या गिरणीच्या व्यवसायाची आवड, जिज्ञासा जोपासली आहे.

सुधारित यंत्रणांचा वापर  
गिरणी चालवीत असतानाच शेवया तयार करण्याची आधुनिक यंत्रणाही पुष्पाताईंनी घेतली. शहरात पारंपरिक पद्धतीने शेवया तयार करायला चाकरमानी, नोकरदार मंडळीला पुरेसा वेळ नसल्याने पुष्पाताई यांच्याकडून यंत्रावर शेवया तयार करून घेणाऱ्या गृहिणींची संख्या दिवसागणिक वाढतच गेली.

व्यवसायासाठी लागणारी यंत्रणा जशी वाढत गेली, तशी जागेची गरजही भासू लागली. त्यामुळे २००४ मध्ये विजय यांनी जुन्या पिठाच्या गिरणीजवळच १५०० चौरस फूट जागा घेतली आणि त्यावर २०१० मध्ये पत्रांचे शेड उभारले. याठिकाणी पिठाच्या व इतर गिरण्या, शेवयांचे यंत्र आणि इतर यंत्रणा बसविल्या.

 उत्पादनांना वाढती मागणी आणि  पुरेशी जागा मिळाल्याने पुष्पाताईंनी २०१० मध्ये उडीद पापड निर्मितीचे यंत्र आणले. त्याद्वारे पापड तयार व्हायचे, पण ते वाळविण्यासाठी वेगवेगळे ठेवायला लागायचे. यावर उपाय म्हणून २०११ मध्ये त्यांनी ड्रायर घेतला. यामुळे पापड तयार केल्यानंतर ते ड्रायरमध्ये कोरडे होतात आणि ते लागलीच खाण्यासाठी वापरता  येतात. त्यामुळे विविध उत्पादनांना मागणी वाढू लागली.

गिरण्यांची वाढली संख्या  
लोकांच्या प्रतिसादामुळे पुष्पाताईंनी जशी गरज पडेल तशी गिरण्यांची संख्या वाढवत नेली. आता त्यांच्याकडे २५ वेगवेगळ्या गिरण्या आहेत. व्यवसाय वाढल्याने गिरण्यांच्या नियोजनासाठी दोन कर्मचारी आहेत. शिवाय विजय, चंदन आणि पुष्पाताई हेदेखील स्वतः दिवसभर काम करीत असतात. नोव्हेंबरपासून पापड, शेवयांचा हंगाम सुरू होतो. मार्च ते मे दरम्यान पापड, शेवयांचा हंगाम जोमात असतो. दिवसाला किमान २०० ग्राहक या काळात रोज पापड, शेवया, डाळी तयार करणे आदी कामांसाठी येतात. पापड तयार करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या अलीकडे वाढली आहे. कारण उडदाची डाळ दळण्यासह पीठ ओले करण्याचे काम आणि नंतर कोरडे कुरकुरीत पापड निर्मितीचे काम पुष्पाताई यांच्या गिरणीमध्ये होते. 

पुष्पाताई पहाटे पाच ते रात्री ९.३० वाजेपर्यंत या व्यवसायात पूर्णवेळ लक्ष देतात. फक्त जेवणापुरती विश्रांती घेतली जाते. पावसाळ्यात शेवया, पापड निर्मितीचे काम फारसे नसते. उडदाचे पापड तयार करण्यासाठी ४० रुपये प्रतिकिलो तर  शेवया तयार करण्यासाठी २५ रुपये प्रतिकिलोचा दर आहे. यासोबत गहू, दादर (ज्वारी) स्वच्छ करण्याचे कामही केले जाते. नागली, हळद, धने, मसाले, शिकेकाई, सर्व प्रकारचे धान्य, आले, लसूण, ओले मसाले, साखर, खारीक, खोबरे पुष्पाताईंच्या गिरणीत दळले जाते. लाडू तयार करण्याचे मिश्रण रगडण्याचे कामही त्यांच्या गिरणीत होते. बटाटे चिप्स तयार करण्यासह बटाट्याचा ओला लगदा, कोरडा कीस तयार करण्याची यंत्रणाही पुष्पाताई यांच्याकडे आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार सतत नवीन संकल्पना आणि यंत्रणा उभारत पुष्पाताईंनी व्यवसाय वाढवत नेला आहे.

पुष्पा महाजन, ९४०३७८८८८८ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com