भरत शिंदेंची ॲपल बोरं नेपाळ, बांगलादेशात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

बी. टेक. झालेला मुलगा कंपनीत आहे. त्याला या कामातून प्रक्रिया उद्योगाचा, बाजारपेठेचा अनुभव मिळणार आहे. अनुभवानंतर त्याने प्रक्रिया उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यास सर्वतोपरी मदत करत मूल्यवर्धित शेतीच्या दृष्टीने पाऊल टाकले जाईल.
- भरत शिंदे, शेतकरी, कानमंडाळे

नाशिक - कानमंडाळे (ता. चांदवड) येथील भरत शिंदे मका, बाजरी, सोयाबीन, भुईमूग या पिकांमध्ये रमलेले, पण कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीची चिन्हे दिसत नसल्याने त्यांनी फळबागेकडे वळण्याचा निर्णय घेतला. वडाळीभोईच्या मित्राकडून माहिती मिळाल्यावर त्यांनी येवला तालुक्‍यातून ३० रुपयांना एक याप्रमाणे २० गुंठ्यांसाठी १६० ॲपल बोराची रोपे विकत आणून जुलै २०१६ मध्ये लागवड केली. या बोरांनी पहिल्या वर्षी शिंदेंना भरघोस उत्पादन दिले. दोन खुडण्यातील त्यांची बोरे पिंपळगावच्या व्यापाऱ्यांनी नेपाळ अन्‌ बांगलादेशात पाठवली आहेत.

पत्नी, दोन मुले असा शिंदे यांचा परिवार आहे. बारावी झालेला मोठा मुलगा शेतीत मदत करतो. छोटा मुलगा अन्नप्रक्रिया क्षेत्रातील बी. टेक. असून, त्याला सांगलीतील कंपनीत नोकरी मिळाली आहे. श्री. शिंदे म्हणाले, की दहा एकरांत वर्षाला तीन लाखांचे उत्पन्न मिळायचे, पण त्यावर कुटुंबाचा गाडा चालवणे कठीण झाले होते. तीन वर्षांपूर्वी ३०० फुटांहून खोल असे तीन बोअर खोदले. पण जानेवारीपासून मिनिटाला तीन हंडे भरतात एवढेच पाणी उपलब्ध होते. त्यामुळे बोअरमधील पाणी पाषाणाचा खडक असलेल्या विहिरीत साठवतो आणि ठिबक सिंचनद्वारे पिकांना देतो. शिवाय टॅंकरद्वारे इतर ठिकाणाहून पाणी आणून पिके जगवली जातात. बोरांपाठोपाठ आता बिनबियांचे सीताफळ एक एकरावर आणि ड्रॅगन फ्रूट २० गुंठ्यावर लावायचे आहे. सीताफळाची रोपे सातारा भागातून विकत आणण्याचे ठरविले आहे. एक सीताफळ एक किलोचे मिळते आणि शंभर रुपये किलो भावाने ते विकले जात असल्याने सीताफळाकडे वळण्याचे ठरविले आहे.

शेतातच विकली जातात बोरे
व्यापारी बोरांची फळबागेत जागेवर खरेदी करतात. एका झाडाला क्विंटलभर माल आला आहे. पन्नास रुपये किलो असा भाव मिळतो आहे. आठ दिवसांनी २० किलोंच्या २५ क्रेट्‌सचा बोरांचा खुडा होईल. २० गुंठ्यांवरील बोरांच्या उत्पादनासाठी रोपे, ठिबक असा ४० हजारांचा खर्च आला आहे. बागेवर शेडनेट केले आहे.