गरज स्वयंचलित हवामान केंद्रांची...

Weather-Center
Weather-Center

हवामानावर आधारित शेती आणि शेती व्यवस्थापनासाठी गावोगावी स्वयंचलित हवामान केंद्रांची स्थापना आवश्यक आहे. या केंद्रांमधून आकडेवारी सातत्याने उपलब्ध होते. त्यातूनच कमाल तापमान, किमान तापमान, सकाळची सापेक्ष आर्द्रता, दुपारची सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा ताशी वेग, सूर्यप्रकाशाचा कालावधी, बाष्पीभवनाचा वेग, पाऊस या सर्व नोंदी सहजपणे उपलब्ध होतात.

ब्रिटिशांनी १८७५ मध्ये भारतीय हवामानशास्त्र विभागाची निर्मिती करून सुरवातीस त्याचा कारभार सिमल्यामधून आणि सन १९२८ तर त्याचे मुख्यालय पुणे येथे करून हवामानविषयक अभ्यासाला चालना दिली. सन १९४४ साली डॉ. एल. ए. रामदास यांनी कृषी हवामान हा विषय त्यामध्ये समाविष्ट करून कृषी संशोधन प्रक्षेत्रावर वेधशाळांची उभारणी केली. त्यामुळे पिकांचे वाढीचा संबंध हवामान आकडेवारीशी तुलनात्मकपणे अभ्यासणे शक्‍य झाले. सद्य:स्थितीत या वेधशाळेमध्ये बहुतांशी हवामानविषयक आकडेवारी गोळा करण्याचे काम सकाळी ७.३० वाजता, ८.३० वाजता आणि दुपारी २.३० वाजता केले जाते. या आकडेवारीचा उपयोग हवामानाचा पिकांचे वाढीवर, तसेच कीड आणि रोगांचा संबंध अभ्यासण्यासाठी होतो. बदलत्या संशोधनानुसार या वेधशाळांमध्ये वेळोवेळी सुधारणा करणे गरजेचे आहे. या सर्व कार्यपद्धतीत जसे वेधशाळा उपकरणांचे महत्त्व आहे, तितकेच महत्त्व नोंदणी करणाऱ्या व्यक्तीचेही आहे. वेळेवर वेधशाळेत जाऊन हवामान विषय आकडेवारी गोळा करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीवर असते. सर्व काम मनुष्याकडून होत असल्याने वेळेवर आकडेवारीची नोंद होतेच असे नाही. या सर्व मर्यादा वेधशाळेला आहेत.  वेधशाळेतील उपकरणांची देखभाल वेळेवर होतेच असे नाही. महाराष्ट्रातील ५५ वेधशाळांपैकी १० ते १२ वेधशाळांमध्येच सर्वच हवामान घटकांची आकडेवारी गोळा केली जाते, तर बाकीच्या वेधशाळांमध्ये फक्त ३ ते ५ हवामान घटकांची आकडेवारी गोळा केली जाते.

बहुतांशी या वेधशाळा कृषी विद्यापीठांच्या प्रक्षेत्रावर बसवण्यात आल्या आहेत.  वेळेवर आर्थिक मदत मिळत नसल्याने काही वेधशाळा दुर्लक्षित आहेत. अशा वेधशाळांची आकडेवारी पुढे भारतीय हवामानशास्त्र विभागाला पाठवली जाते आणि तेथे ती संकलित केली जाते. 

पिके आणि हवामान -
    पिकांना  वाढीसाठी योग्य तापमानाची गरज असते.  वेगवेगळ्या पिकांचा ‘कार्डिअल टेंम्परेचर रेंज` वेग वेगळा असतो. त्यानुसार पिके व पीक पद्धती ठरवणे सोपे जाते. 
    आर्द्रतेचे प्रमाणावरून पिकांवरील रोगाचा प्रादुर्भाव ओळखणे शक्‍य होते. ढगाळ हवामान, पावसातील खंड आणि तापमानावरून कीडींची तीव्रता अभ्यासणे शक्‍य होते. 
    प्रत्येक पिकाची पाण्याची गरज वेगवेगळी असते. हंगामानुसारही पाण्याची गरज बदलते. अभ्यासासाठी स्वयंचलीत हवामान केंद्र उपयुक्त ठरते.

पॉलिहाउसमधील शेती -
    लागवडीसाठी हवामानविषयक आकडेवारीची उपलब्धता असल्यास फॉगर सििस्टम सुरू करणे, ठिबकचा कालावधी वाढवणे इत्यादी बाबी सहजपणे लक्षात येतात. 
    सूर्यप्रकाशाची तीव्रता कमी करण्यासाठी शेडनेटचा वापर करणे शक्‍य होते.

पीकविमा योजना -
    पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी हवामानविषयक आकडेवारीची नितांत गरज आहे. पीकविमा कंपन्या या उपलब्ध आकडेवारीवरूनच पीकविमा ठरवतात. मात्र, त्यांनाही आकडेवारी उपलब्ध होत नसल्याने पीकविमा देण्यात अडचणी येतात.

    महाराष्ट्र शासनाने स्कायमेट संस्थेबरोबर करार करून २,०६५ स्वयंचलीत हवामान केंद्रे बसवण्याचे नियोजन केले. मात्र, महाराष्ट्रात एकूण गावांची संख्या २८,००० अाहे. प्रस्तािवत स्वयंचलीत हवामान केंद्रे मंडल स्तरावर बसवली जाणार असल्याने त्यांनाही मर्यादा येणार आहेत. त्यामुळे स्कायमेटची सर्व आकडेवारी उपलब्ध होणार नाही. 
    मंडल स्तर, तालुका आणि जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण बदलते. पावसात इतकी विविधता आढळून येत असल्याने गावोगावी स्वयंचलीत हवामान केंद्र बसवणे गरजेचे आहे.

ग्रामविकासासाठी गरज 
    ग्रामविकासात अजूनही हवामान या विषयाला फारसे महत्त्व न देता विकासाची कामे आखली जातात. शेती विकासात हवामानाचा अभ्यास अत्यंत गरजेचा असूनही दुर्लक्षित राहिला आहे. 

    हवामानावर आधारित शेती आणि शेती व्यवस्थापनासाठी गावोगावी स्वयंचलीत हवामान केंद्रांची स्थापन आवश्यक आहे. गावातल्या लोकांना दररोजचे हवामान समजले पाहिजे. शेतकरी हवामानविषयक साक्षर होऊन त्यांनी त्याचा उपयोग शेतीउत्पादनात केला पाहिजे. 

    महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षांत जलयुक्तशिवाय या योजनेद्वारे बंधारे, तळी बांधली गेली. दुष्काळी पट्ट्यात त्याचा फायदा निश्‍चित होईल. काही संस्थांनी जलसंधारणाचे काम वेगाने पुढे नेण्यासाठी सहकार्य केले. येत्या काळात उपलब्ध पाण्याचा योग्य प्रकारे वापर करावा लागेल. या सर्व पार्श्‍वभूमीवर हवामानाचा बारकाईने अभ्यास गरजेचा आहे.

स्वयंचलित हवामान केंद्र
    स्वयंचलित हवामान केंद्रामध्ये हवामानविषयक आकडेवारी सातत्याने दिवस-रात्र संकिलत केली जाते. त्यामुळे वाऱ्याचा वेग वाढून एखाद्या ठिकाणी वादळ झाल्यास किंवा त्यातून नुकसान झाल्यास कोणत्या वेळी ती घटना घडली इथपर्यंत समजणे शक्‍य होते.

    स्वयंचलीत हवामान केंद्रांना सौरऊर्जेची जोड दिल्यास कोणत्याही लांबच्या ठिकाणी ते बसवता येते. मनुष्यबळाची फारशी गरज भासत नाही. आकडेवारी सातत्याने उपलब्ध होते. त्यातूनच कमाल तापमान, किमान तापमान, सकाळची सापेक्ष आर्द्रता, दुपारची सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा ताशी वेग, सूर्यप्रकाशाचा कालावधी, बाष्पीभवनाचा वेग, पाऊस या सर्व नोंदी सहजपणे उपलब्ध होतात.

- डॉ. रामचंद्र साबळे : ९०२८३३६३०३ ( लेखक ज्येष्ठ कृषी हवामानतज्ज्ञ आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या संशोधन परिषदेचे सदस्य आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com