संपामुळे कांदा अडकला

Onion
Onion

नाशिक - माल वाहतूकदारांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाचा फटका मोठ्या प्रमाणात नाशिक जिल्ह्यातील कांदा वाहतुकीला बसत आहे. संपामुळे लासलगाव, पिंपळगाव बसवंत, निफाड बाजार समितीतून इतर राज्यांत होणारी कांद्याची वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. बुधवार (ता.२५) पर्यंत ५ लाख क्विंटल कांदा चाळीत पडून आहे. परिणामी इतर राज्यांत कांद्याची आवक घटली असून, तेथे कांद्याचे दर वाढण्याची शक्यता आहे. संपावर तोडगा न निघाल्यास इतर राज्यांत कांद्याचा मोठा तुटवडा निर्माण होऊ शकतो. 

इंधनाची भरमसाट दरवाढ, अवाजवी टोलआकारणी याविरोधात ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट असोसिएशनने मालवाहतूकदारांच्या विविध मागण्यांसाठी शुक्रवार (ता.२०) पासून संपाचे हत्यार उपसले आहे. नाशिक जिल्ह्यातही संपाचे पडसाद उमटताना दिसत आहेत. तब्बल पाच हजारांहून अधिक ट्रक जागेवरच उभे आहेत. नाशिकमधून रोज एक लाख क्विंटल कांदा इतर राज्यांमध्ये विक्रीसाठी नेला जातो. आशियातील कांद्याची सर्वांत मोठी बाजारपेठ असलेली लासलगाव बाजार समिती, पिंपळगाव बसवंत, निफाड या प्रमुख बाजार समितीतून ट्रकद्वारे इतर राज्यांमध्ये कांदा पोहोचवला जातो.

नाशिक जिल्ह्यातून हरियाणा, राजस्थान, दिल्ली, कोलकाता, पंजाब, मध्य प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा आदी राज्यांमध्ये कांदा पुरवठा केला जातो. मात्र, मागील चार दिवसांपासून वाहतूकदारांचा संप सुरू असून, कांद्याची वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. रोज जिल्ह्यातून साधारणत: एक लाख टन कांदा इतर राज्यांमध्ये पाठवला जातो. संपामुळे एकही ट्रक कांद्याची वाहतूक होऊ शकलेली नाही. त्यामुळे पाच लाख टन कांदा जिल्ह्यातील बाजार समितीत पडून आहे. 

परिणामी इतर राज्यांमध्ये होणारी आवक घटल्याने त्या ठिकाणी कांद्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. सरकारकडून मालवाहतूकदारांचा संप मिटविण्यासाठी अद्याप कोणतेही प्रयत्न करण्यात आले नाही, असा आरोप केला जात आहे. त्यामुळे वाहतूकदार संपावर ठाम आहेत. पुढील एक दोन दिवसांत कांद्याचा पुरवठा सुरळीत न झाल्यास तेथे कांद्याच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. परिणामी पुढील काळात कांदा अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणू शकतो.

संपामुळे इतर राज्यांत होणारी कांद्याची वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. पाच लाख क्विंटल कांदा हा जिल्ह्यातच पडून आहे. इतर राज्यांत कांद्याचा पुरवठा घटला असून, दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. तर नाशिक जिल्ह्यात कांद्याचे दर पडण्याची शक्यता आहे. 
- सोहनलाल भंडारी, अध्यक्ष- नाशिक जिल्हा  कांदा बटाटा व्यापारी असोसिएशन, पिंपळगाव बसवंत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com