उत्पन्नाचे मार्ग व्यापक करणारी एकात्मिक शेती 

उत्पन्नाचे मार्ग व्यापक करणारी एकात्मिक शेती 

माळी बंधूंची पार्श्वभूमी 
उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर तालुक्‍यातील काटगाव येथील तिघा माळी बंधूंची १८ एकर शेती आहे.  शेताच्या वरच्या बाजूलाच हरणा लघुप्रकल्प असल्याने शेतीला पाण्याची उपलब्धता आहे. 

वडील विश्‍वंभर माळी पूर्वी छोटासा व्यवसाय सांभाळत बटाईने शेती करत. मोठ्या कष्टातून त्यांनी मुलांना शिक्षण दिले. यापैकी मोठे विष्णू ‘इलेक्‍ट्रिक वायरमन’ झाले. एका सहकारी साखर कारखान्यात ते नोकरीसही लागले. मात्र कारखाना बंद पडला तसे त्यांचाही रोजगार धोक्यात आला. आता त्यांनी शेतीच्या विकासातच पूर्ण लक्ष घातले आहे. मधले बंधू सुधाकर आयटीआय करून महावितरण कंपनीत ‘ऑपरेटर’ आहेत. सुटीच्या दिवशी ते शेतीत लक्ष घालतात. लहान भाऊ उद्धव अलीकडेच "बीएसएफ'' मधून निवृत्त होऊन शेतीत उतरले आहेत. 

गव्हाच्या शेतीत कौशल्य  
माळी यांनी गहू पिकातील कौशल्य मिळवले आहे. खरे तर पूर्वी पाण्याअभावी गहू नियमित करण्याला मर्यादा यायच्या. पण गेल्यावर्षी एकरी सुमारे ३० क्विंटल इतका उतारा त्यांना मिळाला. तीन वर्षांपूर्वी साधारण या दरम्यानच उत्पादन होते. यंदा त्यांनी उत्तर प्रदेशातील संशोधक शेतकरी प्रकाशसिंह रघुवंशी यांनी विकसित केलेल्या गजराज या गव्हाच्या वाणाचा प्रयोग केला. एक एकर उसात त्याचे आंतरपीक होते. त्याचे १७ क्विंटल उत्पादन मिळाले.  

यंदाच्या वाणाची जाणवलेली वैशिष्ट्ये 
चार महिने उत्पादन कालावधी. लोंब्या मध्यम, लांब. प्रति लोंबीत सुमारे ९० दाणे. गव्हाचा रंग  काहीसा गडद. त्याची चव आणि त्यात कसदारपणा सर्वाधिक. त्याच्या पोळ्याही अत्यंत स्वादपूर्ण जाणवल्या.

पारंपरिक शेतीला फाटा  
साधारण चार वर्षांपूर्वी नोकरी हेच तिघा भावांचे उत्पन्नाचे मुख्य साधन होते. त्यानंतर पूर्ण वेळ शेती हाती आल्यानंतर चित्र पालटू लागले. आत्तापर्यंत ज्वारी, गहू अशी पिके व्हायची. तीही बटईने दिल्याने त्यातून जेमतेमच वाटा मिळायचा. 

सेंद्रिय शेतीवर भर  
रासायनिक निविष्ठांवरील खर्च व पर्यायाने उत्पादन खर्च कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीवर भर दिला. गेल्या दोन वर्षांत त्यादृष्टीने काही प्रयोगही केले. पैकी यंदा गव्हासाठी केलेला प्रयोग उत्साहवर्धक ठरला आहे. 

डाळिंब, उसातही सेंद्रिय शेती  
डाळिंबाची सव्वाएकरात लागवड आहे. पाच एकरांत ऊस आहे. या दोन्ही पिकांत कोंबडीखत, शेणखत यांचाच वापर वाढवला आहे. डाळिंबात जीवामृत, पीक अवशेषांचा वापर अधिक केला. त्यातून फळाचा आकार व गडद भगवा रंगही आला. सोलापूर मार्केटला नुकतीच १० क्रेटस विक्री झाली. त्यास किलोला ४० ते ८५ रुपये व सरासरी ६४ रुपये दर  मिळाला.

डाळमिल 
कृषी विभागाच्या यांत्रिकीकरण योजनेतून कृषी सहायक एस. एस. अंबड यांच्या मदतीने शेतात मिनी डाळमिल उभारली आहे. गेल्या काही दिवसांत सव्वा टन डाळ निर्मिती त्यातून साधली. या प्रकल्पामुळे परिसरातील शेतकऱ्यांची मोठी सोय झाली. दीड लाख रुपये किंमतीच्या या मशिनची ताशी एक क्विंटल अशी क्षमता आहे. तूर, हरभरा, मूग, मटकी आदी डाळी इथे तयार होऊ शकतात. विना पॉलिश आणि कोणत्याही रसायनांविरहित डाळ तयार केली जाते. त्यामुळे त्याला अधिक महत्त्व आहे. सध्या त्यासाठी प्रति किलो आठ रुपये दर आकारला जातो. 

गांडूळखत प्रकल्प 
स्वतःच्या शेतीसाठी तसेच अन्य शेतकऱ्यांना विक्रीसाठी गांडूळ प्रकल्प सुरू केला आहे. सध्या प्रतिटन एक असे चार टन क्षमतेचे चार बेड आहेत. तीन महिन्यांतून एकदा खत तयार होते. येत्या काळात विक्री सुरू होईल.  

दुग्ध व्यवसाय 
साधारण १० लाख रुपये खर्चून प्रशस्त गोठा बांधला आहे. दोन खिलार गायी, तीन म्हशी आणि तीन वासरे आहेत. गायीचे दूध घरच्या वापरासाठी ठेवले जाते. म्हशींचे जवळपास १८ लिटर दूध खासगी गवळ्याला प्रति लिटर ३० ते ३५ रुपये दराने विकले जाते. शिवाय शेण, गोमूत्राचा उपयोग जीवामृत तयार करणयासाठी होतो.

एकत्र कुटुंबपद्धतीची ताकद  
तिघा माळी भावांचे कुटूंब आज एकाच घरात राहते. घरचे सुमारे ११ सदस्य आहेत. साहजिकच शेतीतील कष्ट मिळून पेलले आहेत. त्यामुळे कोणतीही संकटे, समस्या यांचा सामना एकीच्या बळातून करणे शक्य झाले आहे. 

ॲग्रोवनसोबत जडले नाते 
ॲग्रोवन सुरू झाल्यापासून विष्णू त्याचे नियमित वाचक आहेत. अंकाची किंमत एक रुपया होती तेव्हापासून माझे या दैनिकाशी नाते जोडले आहे. पूर्वी नोकरीला जाताना अंक विकत घेऊन पुढे जात असे. आता घरीच तो येतो. ॲग्रोवनमधील विविध लेख, शेतकऱ्यांच्या यशकथा वाचूनच शेतीत विविध प्रयोग केले. सद्यस्थितीत जे काही शक्य केले त्यात ॲग्रोवनचाच वाटा मुख्य आहे असे विष्णू म्हणाले. 
 : विष्णू माळी, ९१६८५४५५९९
 : सुधाकर माळी, ९७६५९४५५९९

सेंद्रिय पद्धतीवर भर 
नोव्हेंबरमध्ये लागवड. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाणी दिले. लावणीपूर्वी मशागतीवेळी कोंबडीखताचा वापर. 
लागवडीनंतर दर पंधरा दिवसांतून कोळपणी केली तर आठ दिवसांनी पाणी दिले.
मध्यंतरी एकदा गांडूळखताचा वापर 
याशिवाय रासायनिक खताचा वापर नाही. 
कमी खर्चात, सेंद्रिय आणि पौष्टिक गहू मिळाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com