शेकडो कुटुंबांचे स्थलांतर थांबले; पांजरे गाव गटशेतीत रुजले

Panjare-Village
Panjare-Village

सह्याद्रीच्या कुशीत वसलेले पांजरे (ता. अकोले, जि. नगर) गावाने स्वबळावर जलसंधारण केले. बंधारे, विहिरी, ठिबक सिंचनाद्वारे गावात सिंचन बळकटी केली. साऱ्या गावाने गटशेतीचा ध्यास घेतला. टोमॅटोसह अन्य भाजीपाला व पिकांचे मळे पिकवले. आज गावातील भाजीपाला मुंबईच्या बाजारात विक्रीस जातो. गावातील शंभराहून अधिक कुटुंबांचे स्थलांतर थांबले आहे. आपल्या मुलांना चांगले शिक्षण देत असल्याबाबत त्यांचे पालक समाधानी आहेत. परिसरातील गावांना त्यांची प्रेरणा मिळू लागली आहे.

नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात भंडारदरा पाणलोट क्षेत्रात सहा वाड्या मिळून पांजरे गाव वसले आहे. इथली शेती तुकड्यातुकड्याची व डोंगर उताऱ्यावरची. भात, नागली पिके घेऊन हे शेतकरी आपला उदरनिर्वाह कसाबसा चालवायची. वर्षातील काही हंगामातच शेती. उर्वरित काळात तब्बल दीडशे किलोमीटर अंतरापर्यंत जाऊन २५० रुपये रोजंदारीवर काम करावे लागे. 

विकासाचा मार्ग शोधला 
भाकरीच्या चंद्रासाठी सतत स्थलांतर वाट्याला आलेले इथले लोक आपल्या कुटुंबाला सांभाळत होते. असे असले तरी गावात काही पुढारलेल्या मनाची माणसेदेखील होती. विकासाचे मार्ग ते शोधत होती. त्यापैकीच सुरेश हिंगे, पांडुरंग उघडे, यशवंत उघडे, प्रकाश उघडे हे तरुण होते. रोजंदारीला जाण्यापेक्षा आपली शेतीच चांगली करायची हा त्यांचा मानस होता. भंडारदरा जलाशयातून पाणी आणून अन्य बागायतदारांसारखी शेती करू, असा दृढ निश्चय त्यांनी केला. 

एकीने दिले बळ 
कोणतेही काम एकट्याने न करता सामुदायिक पद्धतीने करायचे ठरवले. त्यातूनच शेतीचे सपाटीकरण केले. घरातील सगळी माणसे दिवस रात्र शेतीत काम करू लागली. जवळच्या शेंडी येथील बँकेतून कर्ज काढून दोन बंधारे त्यांनी बांधले. आठ शेतकरी एकत्र आले. त्यांनी जलसंपदा विभागाकडून परवानगी घेत प्रायोगिक तत्वावर प्रवरा नदीवर मोटर बसवली. वीज कंपनीकडून रीतसर जोडणी घेऊन शेतात पाणी आणले. नदीतील पाणी बंधाऱ्यात व बंधाऱ्यातील पाणी शेतात ग्रॅव्हीटीने आणले.

बघता बघता शेती बहरू लागली
ठिबक सिंचनाची जोड देत पांजरी, धारवाडी गावातील शेती बघता बघता बहरू लागली. जिद्द व चिकाटीने टोमॅटो, अन्य भाजीपाला, गहू, बाजरी, वालवड, भुईमूग अशी पिके शेतकरी घेऊ लागले. सुरेश हिंगे या तरुणाने प्रथम धारवाडीमध्ये असे प्रयोग यशस्वी केल्यानंतर खालची वाडी, गावठा, पाटीलवाडी, भोरुची वाडी, गंगाड वाडी या वाड्यांमधील आदिवासी तरुण जागृत झाले. त्यांनीही सामुदायिक शेतीचा अवलंब करीत भंडारदरा जलाशयातील पाणी आपल्या शेतात आणले. रोजगारासाठी स्थलांतर करणारे शेतकरी आज आपल्याच शेतीला प्रगतिशील बनवू लागली आहेत.

सुरवातीला मी खर्च करतो, पण तुम्ही सहभागी व्हा 
पांजरे गावातून दररोज ८ ते १० ट्रक टोमॅटो व अन्य भाजीपाला वाशी- मुंबई येथे जातो. शेतीच्या माध्यमातून गावात एकोपा निर्माण झाला आहे. सुरेश हिंगे जलसंपदा विभागात काम करतात. नोकरीनिमित्त तळेगाव, निळवंडे, चितळवेढा या भागात काम करताना त्यांना पाण्याचे महत्त्व कळले. त्यातूनच मग आपल्या गावातील शेती फुलवण्याची संकल्पना पुढे आली.

पहिल्यांदा मी पैसे खर्च करतो, पण आपण सामुदायिक शेती करू. तुम्हाला जसजसे उत्पन्न मिळेल तसे तुम्ही बँकेत पैसे भरा, असे सांगत हिंगो यांनी भागातील शेतकऱ्यांना आपल्यासोबत घेतले. त्यातूनच स्वतः मजुरी करून ग्रामस्थांनी केवळ दीड लाख रुपयांत बंधारा बांधला. पाच लाख लिटर पाणी त्यात साठवले जाते. राहता (जि. नगर) येथे मोटर, पाइप खरेदी झाली.

पाइप, मोटर बसविण्याचे कामदेखील तरुण शेतकऱ्यांनी केले. त्यांना ग्रामस्थांनी मोठी साथ दिली. आपल्या शेतात पाणी आणताना त्यांना मदत मिळाली ना पुढाऱ्यांची, ना सरकारची. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे गाव आज आधुनिक शेतीचे स्वप्न घेऊन आपला रोजगार आपणच निर्माण करीत आहे. शिवाय गावातील ४०० माणसांना रोजगार उपलब्ध करून देत आहे.

विद्यार्थी घेताहेत उत्तम शिक्षण 
गावातील अनेक मुले संगमनेरला चांगले शिक्षण घेत आहेत. मुऱ्हाबाई उघडे बीएस्सी ॲग्री होऊन एमपीएससी परीक्षेची तयारी करीत आहे. एकीकडे शेती फुलविण्याचे काम करतानाच शिक्षणाच्या प्रवाहात आपल्या मुलांना आणून त्यांचे पालक लक्ष्मी व सरस्वतीची एकत्र आराधना करताना दिसत आहेत. आपल्या मुलांना शेती शिक्षण देऊन अधिकारी बनविण्याचे स्वप्न पालक प्रत्यक्षात उतरवत आहेत. 

मत्स्यपालनाला चालना 
प्रकल्प बाधित शेतकरी कुटुंबांना रोजगाराचे हक्काचे साधन मिळावे यासाठी महाराष्ट्र मत्स्य व्यवसाय विभागाने ठोस कार्यक्रम निश्चित केला. प्रकल्प क्षेत्रातील जलसाठ्यांमध्ये मत्स्यशेती करण्यात येत आहे. कटला, रावस, वांब, रघुकोटला, पंकज, मृगल हे मासे पाळले जातात. हा हक्काचा रोजगार आहे. माशांच्या विक्रीतून पांजरे भागातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळणे वश्यक आहे. मात्र मासेमारीचे ठेके अनेक वेळा पुढारीच घेत असल्याने सामान्य शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत नाही, असे काहींचे म्हणणे आहे.

इथल्या सहा वाड्या मिळून पांजरे गाव वसले आहे. गावातील सुमारे १०० माणसे रोजगारासाठी भटकंती करायचे. मात्र आम्ही गावातील काही तरुण शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गटशेती सुरू केली. आता रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबले आहे. गाव सुमारे ६० ते ८० टक्के बागायती झाले आहे. हे सगळे काम केवळ ग्रामस्थांनी आपल्या बळावर केले आहे. त्यासाठी अन्य कुणाची वा सरकारी मदत मिळालेली नाही. गावातील तरुण शेतकऱ्यांना एकत्र करीत पाण्याचे महत्त्व मी पटवून दिले. प्रथम मी माझी शेती विकसित केली. बंधारे, दोन विहिरी खोदल्या. ठिबकने पाणी देऊन शेती विकसित केली. आमच्या गावासोबतच शिंगणवाडी, उडदावणे  येथील शेतीचा विकासही याच प्रकारे करण्याचा मानस आहे 
- यशवंत उघडे, सरपंच, पांजरे

मी कृषी विषयात पदवी प्राप्त केली अाहे. कृषी अधिकारी होण्याचा मानस आहे. सुटीत माझ्या शेतीत काम करते. आमचा सारा गाव शेतीच्या विकासासाठी अखंड राबतो. आमच्या जिरायती गावची अोळख आता बागायती झाली आहे, याचा अभिमान आहे. 
- मुऱ्हाबाई उघडे 

सामुदायिक शेतीतूनच आमच्या गावाचा खऱ्या अर्थाने विकास झाला आहे. 
- गिरिजाबाई उघडे, महिला शेतकरी 

पूरक व्यवसायातून बळकटी
शेतीला पूरक व्यवसाय म्हणून डांगी जनावरे, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या पाळून आपला आर्थिक स्तर उंचविण्याचा यशस्वी प्रयत्न इथे दिसतो आहे.

धारवाडीमध्ये तीन बंधारे स्वखर्चातून तयार झाले असून त्यात मासळी बीज टाकण्यात आले आहे. त्यामुळे मत्स्यव्यवसायही बळकटी धरू लागला आहे. भाऊराव उघडे, बारकू उघडे, गोविंद उघडे, संजय उघडे, नवसू उघडे, सखाराम उघडे, मारुती उघडे, सुनीता उघडे, गंगुबाई उघडे आदी मजुरीसाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांची जमीन आता अथक परिश्रमातून ओलिताखाली अाली आहे. त्यांचा आदर्श परिसरातील खेडी घेऊ लागली आहेत. 

यशवंत उघडे, सरपंच, ९३२५९८८२७५  
सुरेश हंबीर, ८३९०२७२४८३ 
प्रकाश उघडे, ९५५२०३६३५२

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com