परभणी जिल्ह्यात चाराटंचाई 

परभणी जिल्ह्यात चाराटंचाई 

परभणी - जिल्ह्यातील अवर्षणाच्या स्थितीमुळे गवत सुकून गेले आहे. अनेक तालुक्यांत चाराटंचाई जाणवत आहे. कडबा, हिरव्या चाऱ्याचे दर मार्च-एप्रिल महिन्याच्या तुलनेत दुप्पट झाले आहेत. गतवर्षीच्या रब्बी हंगामात जिल्ह्यात १,३३,६७३ हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली होती. सिंचनासाठी पाणी उपलब्ध असल्यामुळे धान्य तसेच कडब्याचे चांगले उत्पादन मिळाले होते. ज्वारीच्या सुगीनंतर मार्च-एप्रिल महिन्यात ज्वारीच्या कडब्याच्या पेंढ्यांचे दर प्रतिशेकडा ८०० ते ९०० रुपये, तर कडूळ १२०० ते १५०० रुपये प्रतिशेकडा, मका ८०० ते १००० रुपये शेकडा होते.

जिल्ह्यात यंदाच्या खरिपात ज्वारी १०,४५३ हेक्टर (१४.९० टक्के), बाजरी १,७६९ हेक्टर (२६.७०टक्के), मका १,३२१ हेक्टर पेरणी झाली आहे. अपुऱ्या पावसामुळे या अन्नधान्य तसेच चारा पिकांची वाढ खुंटली. मंडाळामध्ये पावसाअभावी पीक होरपळून गेले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा ओढा कापूस, सोयाबीन, तूर या पिकांकडे वाढला आहे. त्यामुळे तृणधान्य पिकाखालील क्षेत्रात दरवर्षी घट येत आहे. 

यंदा जून महिन्यात पेरणी झाली. पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. दीर्घ खंडामुळे शेतातील बांध, मोकळ्या जमिनीवर उगवू लागलेले हलक्या, बरड, माळरानावरील जमिनीवरील गवत लवकरच वाळून गले. त्यामुळे जनावरांना चरण्यासाठी गवत राहिले नाही. साठवून ठेवलेला कडबा, विविध पिकांचा भुसा संपत चालला आहे. जिंतूर, गंगाखेड, पालम, पाथरी तसेच अन्य तालुक्यातील अल्प पाऊस झालेल्या मंडळातील गावशिवारात पाणी तसेच चाराटंचाई जाणवत असल्यामुळे शेतकरी चिंतित झाले आहेत. चाऱ्याची मागणी वाढली आहे; परंतु दुष्काळ परिस्थितीमुळे चारा उपलब्ध होण्याची चिन्हे दिसत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी कडबा विक्री थांबविली आहे.

परभणी येथील खंडोबा बाजार येथील जनावरांच्या बाजारात बुधवारी (ता. १६) ज्वारीचा कडबा १५०० ते १७०० रुपये प्रतिशेकडा, कडूळ १६०० ते १८०० रुपये प्रतिशेकडा, मका १२०० ते १५०० रुपये प्रतिशेकडा असे होते. मार्च एप्रिलच्या तुलनेत सर्वच प्रकारच्या चाऱ्याचे दर दुप्पट झाले आहेत. सध्या स्थानिक परिसरातील शेतकऱ्यांकडून कडबा विक्रीसाठी आणला जात आहे. चाऱ्यास मागणी आहे; परंतु उपलब्धता कमी झाली आहे, असे कडब्याचे व्यापारी चांदखान पठाण यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com