शास्त्रीय पद्धतीने करा फळबाग लागवड

शास्त्रीय पद्धतीने करा फळबाग लागवड

फळबाग लागवडीसाठी उत्तम निचऱ्याची ६.५ ते ७.५ च्या दरम्यान सामू असणारी जमीन निवडावी. जमिनीच्या खोलीनुसार फळपिकांची निवड करावी. ३० ते ४५ सेंमी खोली असणाऱ्या जमिनीत बोर, सीताफळ, काजू या पिकांची लागवड करावी. ७.५ सेंमीपेक्षा कमी खोलीच्या जमिनीत कोणतीही फळझाडे लावू नयेत. 

४५ ते ९० सेंमी मध्यम खोल जमिनीत पेरू, डाळिंब, अंजीर, पपई ही फळझाडे लावावीत.

आंबा, चिकू, चिंच, जांभूळ, लिंबूवर्गीय फळझाडांना एक मीटरपेक्षा जास्त खोलीच्या जमिनी लागतात.

जमीन शक्यतो सपाट असावी. उतार २ किंवा ३ टक्क्यांपेक्षा अधिक नसावा. ज्या जमिनीचा उतार १५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे, त्या ठिकाणी टप्पे करून ठिबक सिंचन पद्धत वापरून लागवड करावी.

लागवडीच्या पद्धती 

फळझाडांची लागवड करताना योग्य लागवड पद्धत निवडावी. कारण याच गोष्टीवर फळझाडांचे उत्पादन, रोग आणि किडींचा प्रादुर्भाव अवलंबून असतो. दोन झाडांतील अंतर शिफारशीनुसार जर ठेवले नाही, तर फळबागेतील आर्द्रता वाढते. हवा खेळती राहत नाही, रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढतो. 

चौरस मांडणी पद्धत 

बागेची जमीन चौरसामध्ये विभागून चौरसाच्या चारही कोपऱ्यांवर फळझाडे लावतात, त्यामुळे दोन ओळींतील आणि झाडांतील अंतर समान राहते. 

फळझाडांच्या दोन ओळी परस्परांना काटकोनात छेदतात. बागेची उभी- आडवी मशागत करणे सोपे जाते. 

दोन्ही दिशांना झाडांना पाणी देता येते. 

या पद्धतीनुसार आंबा, पेरू, चिकू या फळपिकांची लागवड करणे सोपे जाते. 

आयत मांडणी पद्धत 

या पद्धतीमध्ये चौरस पद्धतीपेक्षा थोडा बदल केलेला आहे. कारण दोन झाडांतील अंतरापेक्षा दोन ओळींतील अंतर काही फळझाडांच्या बाबतीत जास्त ठेवावे लागते. उदा. फळझाडांच्या दोन ओळींमध्ये ६ ते ८ फूट अंतर, तर ओळींतील दोन फळझाडांमध्ये ३ ते ४ फूट अंतर असते. डाळिंब व द्राक्षाची लागवड कमी अंतर ठेवून आयताकृती पद्धतीने करावी लागते. 

या पद्धतीत चौरस पद्धतीचे सर्व फायदे मिळतात. मात्र, बागेमध्ये मशागत करणे जरा अवघड जाते. 

समभुज त्रिकोणी मांडणी पद्धत
समभुज त्रिकोणी मांडणी पद्धत ही चौरस पद्धतीप्रमाणे असते. परंतु पाचवे झाड हे चौरसाच्या मध्यभागी लावतात. त्या झाडाचे आयुष्य कमी कालावधीचे असते. 
चौरसातील झाडे मोठी झाल्यानंतर हे पाचवे झाड काढून टाकतात. आंबा, चिकू, लिची अशा सावकाश वाढणाऱ्या झाडांमध्ये हे वेगळ्या प्रकारचे पाचवे झाड लावतात.
या पद्धतीत झाडांची संख्या जवळजवळ दुप्पट वाढते, त्यामुळे झाडांची गर्दी वाढते आणि बागेच्या मशागतीला अडथळा येतो. म्हणून काही वर्षांनी मधले झाड काढून टाकावे लागते.

षटकोन पद्धत
षटकोन पद्धतीमध्ये समभुज त्रिकोणाच्या कोपऱ्यावर झाडे लावतात, त्यामुळे षटकोनाच्या सहा कोपऱ्यांवर सहा झाडे आणि मध्यभागी एक झाड बसते. या पद्धतीत सर्व झाडांमध्ये समान अंतर असते. 
मशागत कर्णरेषेवर उभी- आडवी करता येते. या पद्धतीत सुमारे १५ टक्के अधिक झाडे बसतात. चौरस पद्धतीमध्ये झाडांची दाटी वाढून मशागतीचे काम अवघड जाते. 

समपातळी रेषा मांडणी पद्धत
डोंगराळ भागामध्ये ज्या ठिकाणी जमीन सपाट नसते, अशा ठिकाणी फळबाग लागवड करण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. 
जमिनीचा उतार जास्त असला, की मशागत करणे आणि पाणी देणे अवघड असते. मातीची धूप होते. अशा परिस्थितीत फळझाडांची लागवड सरळ रेषेत न करता समतल रेषेवर करावी. 
बागेत समतल रेषेप्रमाणे मशागत करावी लागते. पाण्याचे पाट किंवा ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करावा. झाडांतील अंतर समान नसते. 
दर एकरी झाडांची संख्या इतर पद्धतीपेक्षा कमी असते.
०२११२ - २५५२०७/२२७ 

(लेखक कृषी विज्ञान केंद्र, बारामती, जि. पुणे येथे कार्यरत अाहेत.)

लागवडीचे नियोजन 
मे महिन्यात खड्डे खणावेत. खड्डे कमीत कमी २० दिवस उन्हात तापू द्यावेत.
खड्डे खणताना आंबा, चिकू, पेरू व नारळ यासारख्या झाडांसाठी ९० x ९० सेंमी आकाराचे लांब, रुंद व खोल खड्डे खणावेत.
कागदी लिंबू, डाळिंब, आवळा, सीताफळ यांसारख्या फळझाडांना ७५ x ७५ सेंमी किंवा ६० x ६० सेंमी आकाराचे लांब, रुंद व खोल खड्डे खणावेत व नंतर जैविक खते व सेंद्रिय खते या खड्ड्यांमधील माती मिसळून लागवड करावी.

सघन लागवड पद्धत 
ही पद्धत आंबा व पेरू लागवडीसाठी वापरली जाते. आंबा कलमांची १० x १० मीटर अंतरावर, तर पेरूची ६ x ६ मीटर अंतरावर लागवड करतात. सघन लागवड करताना दोन्ही पिकांमध्ये ३ x २ मीटर अंतर ठेवून लागवड करतात.
या लागवड पद्धतीमध्ये एकरी झाडांची संख्या वाढते; पण या पद्धतीमुळे झाडांची छाटणी व वळण देणे हे दोन्ही मुद्दे जर शास्त्रोक्त पद्धतीनुसार व्यवस्थित झाले, तरच झाडांची फळधारणा लवकर आणि भरपूर होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com