मृग बहार धरण्यासाठी  डाळिंब शेतातील कामांना वेग

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 मे 2017

सलगर बुद्रूक, जि. सोलापूर - दुष्काळामुळे सलगर बुद्रूक परिसरातील डाळिंबाची शेती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. यंदा वेळेच्या आधी येणारा मॉन्सून चांगला बरसेल, असा अंदाज व्यक्त केली जात असल्यामुळे कर्जाबाजारी झालेल्या डाळिंब उत्पादकांना हंगामात खात्रीलायक उत्पादन निघेल अशी आशा आहे. मोठ्या उमेदी व पावसाच्या आशेने सलगर परिसरातील खेड्यांमध्ये डाळिंबाचा मृग बहार धरण्यासाठी कामे सुरू आहेत.

मुख्यतः दक्षिण मंगळवेढ्यातील डाळिंबाचे आगर म्हणून सलगर बुद्रूक व परिसरातील गावांकडे पाहिले जाते. या गावांमध्ये जलसिंचनाच्या शाश्‍वत स्वरूपाच्या कोणत्याही सुविधा नाहीत. त्यामुळे हा परिसर कमी पाण्याचा म्हणून ओळखला जातो. साहजिकच कमी पाण्यावर जास्त उत्पन्न देणाऱ्या डाळिंबची शेती केली जाते. गेल्या काही वर्षांत पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे कमी पाण्यावर येणारे डाळिंब जमिनीत पाणीच न उरल्याने शेवटच्या घटका मोजत आहे. प्रत्येक गावात हजार-पाचशे एकरांवर असलेली डाळिंब शेती आता शे-दोनशे एकरावरच उरली आहे. यंदाच्या पावसाळ्यात दुष्काळाचे सावट दूर सारुन चांगला हंगाम येईल, या आशेने मृग बहार धरण्यासाठी डाळिंब उत्पादक शेतकरी मोठ्या जिद्दीने डाळिंब शेतीची कामे उरकून घेत आहेत.

शेतमजुरांच्या हाताला काम
दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीवर आधारित मजुरांच्या हाताला काम मिळणे बंद झाले होते. त्यामुळे या भागातील शेतमजूर सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांत जात आहेत. आता डाळिंब बागेची कामे चालू झाल्याने शेतमजूरांच्या हाताला गावातच काम मिळत असल्याचे आशादायक चित्र पाहावयास मिळत आहे. दिवसाला ३५० ते ४०० रुपये इतकी रोजंदारी त्यांना मिळत अाहे. शेतमजुरांना आपल्या गावातच हाताला काम आणि चांगाला मोबदला मिळू लागल्याने त्यांना दिलासा मिळत आहे.