ग्रामपंचायत विकासाचे मंदिर व्हावे

ग्रामपंचायत विकासाचे मंदिर व्हावे

नागपूर (प्रतिनिधी) : ‘सरपंचाने कायद्याचा सखोल अभ्यास करून विकासकामांचे नियोजन केल्यास ग्रामपंचायत विकासाचे मंदिर होईल. मात्र, त्याचवेळी गावातील वंचित घटक या मंदिरातील देव असायला हवेत, हेही लक्षात ठेवा,’ असे प्रतिपादन हिवरेबाजारचे सरपंच तसेच आदर्श गाव समितीचे कार्यकारी संचालक पोपटराव पवार यांनी आज (रविवार) येथे केले. सरपंच महापरिषदेच्या प्रारंभ सत्रात ‘ग्रामविकास आणि सरपंच’ या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार आशिष देशमुख, अॅग्रोवन संपादक आदिनाथ चव्हाण आणि ‘सकाळ’च्या विदर्भ आवृत्तीचे कार्यकारी संपादक शैलेश पांडे यांची उपस्थिती होती. 


पोपटराव पवार म्हणाले, ‘सरपंचांनी गावे बदलण्याचा संकल्प स्वतःपासून केल्यास गावांचा कायापालट होण्यास वेळ लागणार नाही. सुरू केलेल्या कामात सातत्य ठेवून त्याचे योग्य नियोजन केल्यास आदर्श गाव निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. सरपंच झाल्यानंतर सुरवातीलाच गावाची संपूर्ण कुंडली जाणून घेतली पाहिजे. ग्रामसभेपासून ते ग्रामपंचायतीच्या अधिनियमांपर्यंत अभ्यास केला तर विकासकामांना वाव मिळेल. सुरवातीला मीसुद्धा असाच अभ्यास केला. माझ्या गावाला बालपणातील गावाचे स्वरूप कसे प्राप्त होईल या एकाच ध्येयाने १९९० पासून कामाला सुरवात केली. 

गावाच्या विकासाची प्रेरणा घेऊन कृतीची जोड दिली. त्यामुळेच हिवरेबाजारसारखे आदर्श गाव निर्माण झाले.’ ‘गावात घडणाऱ्या नकारात्मक गोष्टींतूनच बरेच काही शिकायला मिळते. अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. त्यासाठी गावाची मानसिकता आधी समजून घ्या. जवळच्या माणसाला ओळखायला शिका. ग्रामपंचायतीच्या कामांवर बारीक लक्ष ठेवा. ग्रामपंचायती डिजिटल करताना गावातील संस्कारांचे मात्र जतन करा,’ असा महत्त्वपूर्ण सल्ला त्यांनी दिला. 
देशात सध्या सरपंचांना एकही व्यासपीठ नाही. ‘सकाळ माध्यम समूहा’कडून ॲग्रोवन सरपंच महापरिषद हे एकमेव व्यासपीठ सरपंचांसाठी उपलब्ध आहे, असा गौरवपूर्ण उल्लेख श्री. पवार यांनी केला. 

ग्रामपंचायतीत काम करण्याचे सूत्र 
सरपंच म्हणून निवडून आल्यानंतर तुमची जबाबदारी फार मोठी आहे. निवडून येणे ही इतकीच जबाबदारी नसून लोकसहभाग, कामाचे नियोजन, प्राप्त निधीचा विनियोग, केलेल्या खर्चाची ग्रामसभेसमोर मांडणी, त्याचे सामाजिक परिणाम काय झाले हेदेखील प्रत्येक सरपंचाने गावाला समजावून सांगितले पाहिजे. हे सूत्र बाळगल्यास गावकरी आपोआप तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील, असा सल्ला पोपटराव पवार यांनी दिला. 

छोट्या ग्रामपंचायतींना निधी वाढवा 
राज्यात २८ हजार ग्रामपंचायती असून, त्यापैकी ७ हजार ग्रामपंचायती छोट्या आहेत. चौदाव्या वित्त आयोगामुळे ग्रामपंचायतींना मोठ्या प्रमाणात निधी मिळाला असला तरी या निधीचे वितरण लोकसंख्येच्या आधारावर असते. परिणामी छोट्या ग्रामपंचायतींवर अन्याय झाला आहे. छोट्या ग्रामपंचायतीला १५ लाखांपेक्षा जादा निधी मिळाला पाहिजे. तशी सूचना राज्य शासनाला करणार असल्याचे पवार यांनी नमूद केले. 

सरपंचांची निवड थेट जनतेतून करावी 
अलीकडेच शासनाने नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर सरपंचसुद्धा थेट जनतेतून निवडून देण्याचा निर्णय घ्यावा. गावातील सर्व समित्या बरखास्त करून सर्व समित्यांचे अध्यक्षपद सरपंचांना द्यावे. सरपंचांनी चुकीचे काम केल्यास किंवा अयोग्य निर्णय घेतल्यास त्याला परत पाठविण्याचे अधिकार ग्रामसभेला द्या. म्हणजे सरपंचावर ग्रामसभेचा वचक राहील. सरपंचाने केवळ पदावरच समाधान न मानता मिळालेल्या जबाबदारीची जाणीव ठेवून काम करावे. आपले काम हीच आपली गुणवत्ता असे धोरण ठेवत, कामामध्ये पारदर्शकता राखण्याचा प्रयत्न करावा, अशी सूचनाही त्यांनी दिली. 

पोपटराव पवार यांचे सरपंचांना सल्ले... 

  • प्रथम ग्रामपंचायतीचे कामकाज समजावून घेण्यासाठी प्रशिक्षण घ्या. 
  • ग्रामपंचायतीच्या कामांचे लेखापरीक्षण करण्यासाठी १ ते ३३ नमुन्यांचा अभ्यास करा. 
  • गावाची बारीकसारीक माहिती जाणून घ्या. 
  • नियमित ग्रामपंचायत कार्यालय उघडेल जाईल याची काळजी घ्या. 
  • शासनाच्या प्रत्येक निर्णयाची माहिती ठेवा. 
  • शासनाकडून मिळणाऱ्या विविध निधींची माहिती मिळवून तो निधी गावात खेचून आणावा. 
     

शिवारातील तलाव जलमंदिरेच : आ. आशिष देशमुख 
गावातील मंदिरांप्रमाणेच शिवारातील तलाव, बांध, बंधाऱ्यांना जलमंदिरे समजून त्यांचे जतन करा. पाण्याचा प्रत्येक थेंब जिरविल्याशिवाय राज्याचा दुष्काळ हटणार नाही. दुष्काळ हाच ग्रामविकासातील मोठा अडथळा आहे, असे मत आमदार आशिष देशमुख यांनी व्यक्त केले. जलयुक्त शिवारामुळे बऱ्याच प्रमाणात दुष्काळावर मात करणे शक्य झाल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले. ‘आज मातीचे रस्ते कॉंक्रिटचे होत आहेत. मात्र, मातीच्या गावातील ममता, प्रामाणिकता संपत चालली आहे. गावाचा तो जिव्हाळा, आपुलकी पुन्हा आणण्यासाठी सरपंचांना पुढाकार घ्यावा लागेल,’ असे आशिष देशमुख यांनी सांगितले. सकाळ माध्यम समूह आणि अॅग्रोवनच्या  या विधायक कार्याला पाठिंबा असून, राज्यात चांगले काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना ‘ग्रामविकासाचे पासवर्ड’ हे पुस्तक उपलब्ध करून देण्याची घोषणा आशिष देशमुख यांनी यावेळी केली. 

स्थलांतर थांबवा, शेती सुधारा : आदिनाथ चव्हाण 
‘महात्मा गांधी यांनी जरी खेड्याकडे चला, असा संदेश दिला असला तरी आता शहरे वेगाने वाढत असून, गावांमधून मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे. राज्यात २८ हजार ग्रामपंचायती आहेत. शेतीवर ६० टक्के लोकसंख्या अवलंबून असून, शेतीचा विकास झाला नाही तर ग्रामीण विकासही साधला जाणार नाही. पोपटराव पवार यांनी हिवरेबाजाराचा कायापालट केवळ स्थलांतर थांबवून केला. पाण्याला विकासाचं इंजिन समजून, त्यांनी पाण्याचा योग्य वापर करून घेतला. तेथील शेतीत सुधारणा व ग्रामरोजगाराला संधी दिली,’ असे अॅग्रोवन संपादक आदिनाथ चव्हाण म्हणाले. अॅग्रोवनची वाटचाल आता एका तपाची होत आहे. पेपर वाचून शेती करता येते का, असा सवाल अॅग्रोवन बाबतीत प्रारंभी उपस्थित केला गेला. मात्र, अॅग्रोवनमधील  ज्ञानगंगेचा फायदा घेत या राज्यातील दुष्काळी भागातील शेतकरी किंवा बागायती भागातील उच्चशिक्षित शेतकरी पैसे कमावू लागला. राज्यातील एका शेतकऱ्याने तर अॅग्रोवनमधून  ज्ञान मिळवून बंगला बांधला. त्याला अॅग्रोवन नाव दिले. जगाच्या पाठीवर असे उदाहरण सापडणार नाही.’ सकाळच्या विदर्भ आवृत्तीचे संपादक शैलेश पांडे यांनी आभार मानले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com