मूग उत्पादकांच्या पदरी कडधान्य वर्षात निराशाच 

मूग उत्पादकांच्या पदरी कडधान्य वर्षात निराशाच 

अकोला : संयुक्त राष्ट्रसंघाने २०१६ हे अांतरराष्ट्रीय कडधान्य वर्ष जाहीर केले. या वर्षात कडधान्यवर्गीय पिकांना शासनाने जाणीवपूर्वक प्रोत्साहन देण्याची भूमिका ठेवली. यामुळे लागवड क्षेत्रात वाढही झाली. मात्र, जेव्हा शेतमालाला भाव मिळण्याची वेळ अाली त्या वेळी शेतकऱ्यांना निराशेशिवाय दुसरे काहीही मिळाले नाही. हमीभावाइतकाही दर मिळाला नाही. शिवाय उत्पादकतासुद्धा गाठता अाली नाही. तसेच बाजारपेठेत दर मिळवतानाही संघर्ष करावा लागला. मूग उत्पादनात या भागात प्रमुख भूमिका निभावणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यात मुगाची या वर्षी हेक्टरी ८०९ किलो उत्पादकता दर्शविण्यात अाली अाहे; परंतु किती शेतकऱ्यांना एवढे उत्पादन झाले याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत अाहे. 

कडधान्यवर्गीय पिकांमध्ये मुगाचा समावेश अाहे. देशात मूग पिकविणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा क्षेत्र व उत्पादनात अव्वल क्रमांक लागतो. मुगाचे पीक विदर्भ, मराठवाडा, खानदेश व कोकणातील काही भागात प्रामुख्याने खरिपात अधिक घेतले जाते. अांतरपिक किंवा मिश्रपीक म्हणून शेतकरी याला पसंती देतात. अमरावती विभागात अकोला, बुलडाणा, अमरावती हे प्रमुख उत्पादक जिल्हे अाहेत. विभागात दीड लाख हेक्टरपेक्षा अधिक मुगाचे क्षेत्र अाहे. बदलते हवामान, पावसाचे असमतोल प्रमाण, होणारे अागमन यामुळे मुगाच्या लागवडीवर त्याचा थेट परिणाम होताना दिसतो अाहे. दरवर्षी सरासरी इतकी लागवडसुद्धा होताना दिसत नाही. या हंगामात वऱ्हाडातील तीनही जिल्ह्यांचा विचार केला असता ५१ ते ७५ टक्क्यांपर्यंत लागवड क्षेत्र राहिले. 

या पिकाचे वऱ्हाडात अकोला जिल्ह्याचे खरिपात लागवड क्षेत्र साधारणतः ४२ हजार हेक्टर एवढे अाहे. या वर्षी ३१ हजार हेक्टरपर्यंत लागवड झाली होती. बुलडाण्याचे ३९ हजार हेक्टर क्षेत्र असताना २६ हजार हेक्टरवर कशीबशी मुगाची लागवड झाली होती. हे क्षेत्र सरासरीच्या ६७ टक्के एवढे होते. वाशीम जिल्ह्यात मुगाचे क्षेत्र मात्र जेमतेम ५१ टक्क्यांवर पोचविण्यात यश अाले. सरासरी २४ हजार हेक्टरच्या तुलनेत १२ हजार ६०० हेक्टरवर मुगाची पेरणी करण्यात अाली होती.

एेन पीक काढणीच्या काळात झालेल्या अतिपावसामुळे शेंगामध्ये काही ठिकाणी कोंब फुटले होते. उत्पादनाचा दर्जाही घसरला होता. अनेक कोरडवाहू शेतकऱ्यांना एकरी क्विंटलपासून उतारा लागला. पिकवलेला मूग जेव्हा शेतकऱ्यांनी दिवाळीदरम्यान बाजारात विक्रीला नेला तेव्हा ४२०० रुपयांपासून ४५०० पर्यंत दर मिळाला. हा भाव हमीभावापेक्षाही कमी होता. डिसेंबर महिन्यातही एवढाच सरासरी दर मिळाला. फेब्रुवारीमध्ये हा दर घसरून ४००० रुपयांपर्यंत अालेला अाहे. 

प्रक्रियेशिवाय पर्याय नाही 
मी कपाशीमध्ये १५ गुंठ्यांत अांतरपिक म्हणून मूग घेतला. त्यात एक क्विंटल ८० किलो मूग झाला. अाताच्या भावाने विकला असता तर मला काहीच परवडले नसते. मी सेंद्रिय पद्धतीने मूग पिकवल्याने त्याची दाळ तयार केली. माझ्याकडे दरवर्षी या डाळीची मागणी राहते. अाता तयार केलेली डाळ १२० रुपये किलो दराने विकत अाहे. या हंगामात अाॅगस्ट-सप्टेंबरमध्ये अाठ ते नऊ हजारांचे भाव होते. तसे भाव मिळाले असते तर मुगाचे पीक परवडले असते. मात्र, अाताच्या भावात हे पीक सर्वसामान्य शेतकऱ्यांना तोट्यात टाकत अाहे, असे डिग्रस बुद्रुक (जि. अकोला) येथील मूग उत्पादक राजेंद्र टाले यांनी स्पष्ट केले. 

दराची स्थिती 
मुगाचा हमीदर : ५२२५ रुपये (यामध्ये ४२५ रुपये बोनस) 
प्रत्यक्षात मिळालेला भाव- ४२०० ते ४५०० रुपये क्विंटल 

मूग पिकाचा एकरी उत्पादन खर्च व उत्पन्नाचे गणित 
- खर्च 

पेरणीपूर्व मशागत -१००० 
बियाणे -१२०० ते १५०० 
बीजप्रक्रिया -१०० 
खत - ६०० 
पेरणी -४०० 
निंदण -१००० 
डवरणी -४०० 
फवारणी-५०० 
शेंगा तोडणी-३००० 
मळणी-६०० 
इतर -१००० 
एकूण -१० हजार १०० रुपये 

उत्पन्न 
एकरी उत्पादन सरासरी तीन ते चार क्विंटल 
मिळालेला सर्वसाधारण भाव- ४५०० रुपये क्विंटल 
एकूण उत्पादन- १८००० रुपये 
खर्च- १० हजार १०० 
निव्वळ नफ- ७९०० 
 

हंगामात पाऊस चांगला झाल्याने पीक ठीकठाक झाले. मी चार एकर लागवड केली होती. एकरी चार क्विंटल मूग झाला. हंगामाच्या सुरवातीला असलेला अाठ हजारांचा दर मिळाला असता, तर पीक फायदेशीर राहिले असते. अाजच्या कमी भावात हे पीक परवडत नाही. 
- भीमराव सदांशिव, गुडधी, जि. अकोला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com