डाळींचे दर निम्याने घटले

डाळींचे दर निम्याने घटले

तूर, हरभरा उत्पादक अडचणीत

जळगाव (प्रतिनिधी) ः कडधान्य उत्पादन वाढ आणि परदेशातून डाळ आयातीला मिळालेली चालना, या कारणांमुळे गेल्या दोन महिन्यांत सर्वच प्रकारच्या डाळींचे दर निम्म्याने घटले आहेत. डाळींच्या घटत्या दराचा परिणाम प्रामुख्याने नवीन हंगामाच्या तुरीवर झाला असून, व्यापाऱ्यांकडून खुल्या बाजारात तुरीची किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने सर्रास खरेदी सुरू झाली आहे. परिणामी, उत्पादकांच्या तोंडाचे पाणी पळाले आहे.

सततची दुष्काळी स्थिती, साठेबाजीमुळे डाळींचे दर वाढल्याची कारणे आतापर्यंत व्यापाऱ्यांकडून सांगितली जात होती. मात्र यंदा परिस्थिती पूर्णतः बदलली आहे. एकट्या तूरडाळीचे उदाहरण लक्षात घेतल्यास साधारण दिवाळीपूर्वी 150 रुपये किलो असलेली तूरडाळ आजच्या घडीला जेमतेम 80 रुपये किलो प्रमाणे बाजारात विक्री होत आहे. मूग, उडीद आणि चणा (हरभरा) डाळीचे दरही निम्म्याने घटले आहेत.

हरभरा अजून शेतात उभा आहे, तोपर्यंत चणाडाळीचे दर खालावल्याने नवीन आवकेच्या हरभऱ्याला व्यापारी हमीभावापेक्षा कमी दरानेच खरेदी करतील, हे स्पष्ट झाले आहे. दुसरी गोष्ट तुरीचे पीक सध्या काढणी अवस्थेत असून, शेतकऱ्यांनी कमी अधिक प्रमाणात त्याची विक्रीसुद्धा सुरू केली आहे. दुर्दैवाने एकमेव आधारभूत खरेदी केंद्र केवळ नावालाच सुरू असल्याने शेतकऱ्यांसमोर तुरीच्या विक्रीसाठी खुल्या बाजाराशिवाय दुसरा कोणता पर्याय शिल्लक राहिलेला नाही. अर्थात, बाजारात डाळींचे दर निम्म्याने कमी झाल्यामुळे व्यापारी तुरीच्या कच्च्या मालाची खरेदी हमीभावापेक्षा कमी दराने करण्यासाठी मागेपुढे पाहत नसल्याचेही दिसून येत आहे. कधी नव्हे ती यंदा तुरीचे मोठ्या प्रमाणात पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची त्यामुळे चांगलीच कोंडी झालेली आहे.

व्यापाऱ्यांकडून उत्पादनवाढीचे कारण...
गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा पाऊस चांगला झालेला असल्याने सर्वच धान्याचे उत्पादन वाढले आहे. त्यातही कडधान्याच्या उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे कच्चा माल स्वस्त आणि मुबलक उपलब्ध होत आहे. तसेच आयात होणाऱ्या डाळींचे दरही यंदा अत्यंत माफक आहेत. त्याचा एकूण परिणाम डाळींचे दर घटण्यावर झालेला असल्याची कारणे डाळ उद्योजक, तसेच किरकोळ व ठोक व्यापारी देत आहेत.

डाळींचे दर दृष्टिक्षेपात
प्रकार ---- होलसेल--------किरकोळ------ दोन महिन्यांपूर्वी दर (रुपये/किलो)
तूर --------74 ते 80-------80 ते 85------ 140 ते 150
मूग -------60 ते 65-------70 ते 75------ 90 ते 100
उडीद ------80 ते 85------ 90 ते 95------140 ते 150
चणाडाळ---85 ते 90-------90 ते 95 -----125 ते 135

-------------------------------------------------------------
यंदा चांगला पाऊस झाल्याने कडधान्याचे उत्पादन वाढले आहे. त्यामुळे डाळ उद्योगासाठी लागणारा कच्चा माल स्वस्त व चांगल्या दर्जाचा मिळत आहे. त्यावर प्रक्रिया करणे सोपे जात असल्याने डाळींचे भाव कमी झाले आहेत. आणखी काही महिने ही आदर्श स्थिती राहिली, तर बंद डाळ उद्योग सुरू होतील.
- प्रेम कोगटा, अध्यक्ष, डाळमिल ओनर्स असोसिएशन, जळगाव
-------------------------------------------------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com